Sunday, June 25, 2017

मोहम्मद अयुबची निघृण हत्या


Ayub Pandith lynching


काश्मिरमध्ये गुरुवारी रात्री मोहम्मद अयुब पंडित या डीएसपीची कर्तव्य बजावत असतांना हिंसक जमावाने निघृण हत्या केली. श्रीनगरमधील ऐतिहासिक असलेल्या जामा मशिदीबाहेरच ही घटना घडली. ती शब-ए-कद्रची रात्र होती. ही रात्र मुस्लिम आपल्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनांत घालवतात. साध्या वेशातील मोहम्मद अयूब मशीदीबाहेर येणा-या लोकांची छायाचित्रे त्यांच्या ड्युटीचा एक भाग म्हणून काढत होते. लोकांनी त्याला नुसता आक्षेप घेतला नाही तर ते हिंसक बनू लागले. सर्व्हिस रिव्हाल्वर मधून चिडलेल्या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. लोकांनी तरीही त्यांच्यावर हल्ला करत त्यांना विवस्त्र करत पाशवी मारहाण करत दगडांनी ठेचायला सुरुवात केली. त्यात त्यांच मृत्यू झाला. त्यांचे प्रेत मखदूमसाहिब या सुफी संताच्या कबरीच्या चौकापर्यंत फरफटत नेण्यात आले.

ज्या सुफी संतांच्या शिकवणुकीवर आपण चालत आहोत असा अभिमान काश्मिरी मुस्लिम बाळगत होते त्या संताच्या कबरीच्या दारात अयुबचे प्रेत फरफटवत आणने हा सुफी तत्वज्ञानाचा खुनच नाही काय असा प्रश्न पडल्यास नवल नाही. मशिदीबाहेर येणारे लोक आपल्या जीवनातील पापाची क्षमा मागून आलेले होते. नवे पाप करायला आपण मोकळे झालो आहोत असे त्यांना वाटले असेल. या घटनेने काश्मिर समूळ हादरला. मुस्लिमांकरवी होणा-या मुस्लिम हत्या काश्मिरमध्ये गेली तीन वर्ष नव्या दमाने सुरु झालेल्या हिंसाचारात नवीन नाही. पण सरकारी अधिका-याची हत्या व तीही रमजानमधील एका पवित्र दिवशी ज्या पद्धतीने केली गेली आहे ती इस्लामियांना शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

या घटनेने १९९८ सालची अजून एक निघृण घटनेची आठवण काही पत्रकारांनी काढली आहे. शब्बे कद्रच्याच रात्री एका गांवात काश्मिरमध्ये २३ पंडितांची अशीच ठेचून निघृण हत्या केली गेली होती. या हत्याकांडाबद्दल खुद्द काश्मिरी मुस्लिमांत संतापाची लाट उसळली होती. पण आता झालेल्या शब्बे कद्रच्या रात्रीची हत्या राजकीय व सरकारी अधिका-यांच्या गोटातील संताप व निषेधात्मक प्रतिक्रियांपुरती उरलेली दिसते. याची शरम अन्य मुस्लिमांना वाटतेय असे काही अद्याप तरी दिसलेले नाही. 

प्रश्न केवळ पवित्र रमजानचा वा शब-ए-कद्रच्या दयावंत रात्रीचा नाही तर एकुणातच काश्मिरी मुस्लिमांत भडकत असलेल्या निघृणतेच्या भावनांचा आहे. सरकारवर त्यांचा विश्वास उरलेला दिसत नाही. सरकार विश्वास मिळवायचा प्रामाणिक प्रयत्न करते आहे असेही दिसत नाही. अनेक टाळता येवू शकणा-या बाबीही केल्या जातात व असुरक्षिततेला खतपाणी घातले जाते. अयुब साध्या वेशात असायला हवे होते काय? ड्रेसवर असते तर ते वाचू शकले असते काय? हे प्रश्न जरी पडले तरी प्रशासनाचीही चूक होते आहे. रात्रीच ही घटना घडली पण प्रेत पुरते ठेचलेले असल्याने ओळखही पटलेली नव्हती. सकाळी सहा वाजता अयुबच्या घरच्यांचा "मोहम्मद अयूब अजून घरी आलेले नाहीत..." हा फोन जाईपर्यंत ते प्रेत अनोळखीच राहिले. डीएसपी स्तरावरच्या अधिका-यासोबत दुसरे काही पोलिसही असायला हवे होते असे त्यांच्या वरिष्ठांना का वाटले नाही? एक रिपोर्ट सांगतो की त्यांच्यासोबत एक पोलिस होता, पण जमाव हिंसक झाल्यावर तो पळून गेला. तो पोलिस सांगतो की त्याला मोहम्मद अयुबनेच रिलीव्ह केले होते. खरे काय ते समजेल किंवा समजणारही नाही, पण झाली घटना ही प्रशासनालाही खाली मान घालायला लावणारी आहे.

काश्मिरमध्ये, विशेषत: दक्षीण भागात पुर्वी कधी न ऐकलेली "काश्मिरी तालीबान" ही नवीच संघटनाही उदयाला आली आहे. अल कायदा तर आहेच. फुटीरतावादी दहशतवादी हत्याकांडांना नागरिक व मुलांची दगडफेकही सामील झाली आहे. काश्मिर पुर्वी धुमसत होता, आता ज्वालामुखी फुटतो आहे. अयुबच्या हत्येकडे एक गंभीरतेचा इशारा म्हणून पहात तातडीने सामंजस्याचे व मनोमिलनाचे प्रामाणिक प्रयत्न करने ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. धार्मिक तेढ माजवणा-यांच्या मुजोरीला खपवून घेण्याचा तर आजीबात नाही. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. सर्वांनीच तो सुटण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे.