Saturday, May 28, 2011

आद्य शिवचरित्रकार केळुस्कर गुरुजी आणि होळकर

२० आगष्ट १८६० साली केळुस या वेंगुर्ले गावी जन्मलेल्या क्रुष्णराव अर्जुन केळुस्कर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत हे सहसा सामान्य वाचकांना माहित नसते. तत्पुर्वी महात्मा फुलेंचा महाराजांवरील पोवाडा आणि राजारामशस्त्री भागवतलिखित एक लहानसे चरित्र एवढेच काय ते मराठीत प्रसिद्ध झाले होते. तत्पुर्वीच लोक. टिळक १८९५ पासून शिवस्मारकासाठी देणग्या गोळा करण्याच्या प्रयत्नात होते व त्यातुनच एक समग्र शिवाजी महाराजांचे साक्षेपी, संशोधनात्मक असे चरित्रही प्रसिद्ध करण्याचा केसरीकारांचा उद्देश होता. परंतू तरीही महाराष्ट्रातील विद्वानांकडुन शिवचरित्र लिहिण्याचे काम झाले नाही.

याबद्दल "छत्रपती शिवाजी महाराज" या आपल्या ग्रंथाच्या १९०७ च्या प्रथमाव्रुत्तीच्या प्रस्तावनेत केळुस्कर गुरुजी म्हणतात-" मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणा-या ह्या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुल पराक्रमांचे विस्त्रुत वर्णन स्वतंत्र चरित्रलेखनाच्या रुपाने करण्याच्या कामी महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वान ग्रंथकारांकडुन आळस अथवा अनास्था का झाली हे कळत नाही. .............आधुनिक विद्याचारसंप्पंनतेच्या काळी स्वदेश,, स्वराज्य इत्यादिकांविषयी सदोदित विचार प्रकट करणा-या पंडितांकडुन नुसता तोंडाने अभिमान प्रकट करण्यापलीकडे काहीच होउ नये हे चमत्कारिक दिसते. दुस-यांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणा-या किंवा स्वदेशाचा नाश करण्यास प्रव्रुत्त होणा-या अनेक पुरुषांची चरित्रे मराठी भाषेत प्रसिद्ध व्हावीत, आणि ज्या प्रौढ्प्रताप वीरमणीने स्वदेशास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सुयश संपादिले त्याचे सविस्तर चरित्र लिहिण्याची स्फुर्ती कोणासही होवू नये यास काय म्हणावे?"

या खंतीवरून शिवचरित्राबाबत केवढी अनास्था होती हे कळुन येते. कोणीही अन्य विद्वान पुढे न आल्याने १९०३ च्या दरम्यान केळुस्करांनी "छत्रपती शिवाजी महाराज" हे चरित्र लिहिण्यास घेतले. संशोधकाची शिस्त पाळत त्यांनी तत्कालीन उपलब्ध सारी कागदपत्त्रे, बखरी, पत्रव्यवहार तपासत त्यांनी मोठ्या कष्टाने प्रस्तुन चरित्र संपन्न केले. आपले संशोधन/चरित्र हे तरीही परिपुर्ण आहे, अंतिम आहे असा त्यांचा, ख-या इतिहाससंशोधकाप्रमाणे दावा नव्हता. त्यांनी याच प्रस्तावनेत स्पष्टपणे म्हटले आहे कि-

"(लेखकाला) ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे."

या चरित्रग्रंथाची पहिली आव्रुत्ती १९०७ साली मराठा प्राविडंड फंडातर्फे प्रसिद्ध झाली. या आव्रुत्तीला शाहु महाराज यांनी मदत केली. कागल, बडोदा संस्थानांनी पारितोषिके दिली. वाचकांनीही या आव्रुत्तीचे उदार स्वागत केले. जवळपास ६०० प्रुष्ठांचा हा शिवेतिहास होता. यात केळुस्करांनी अत्यंत समतोल आणि प्रवाही भाषेत, प्रत्येक ठिकाणी उपलब्ध पुरावे देत, घटनांचे विश्लेषन करत हा ग्रंथ सिद्ध केला आहे. इतिहास-चरित्र कसे लिहिले जावे याचा हा एक आदर्ष वस्तूपाठच होय. त्यामुळे विद्वत्जनांतही या ग्रंथास एक अपरंपार असे महत्व निर्माण झाले.

तत्पुर्वी केळुस्करांनी "फ्रांसचा जुना इतिहास", ग्रीक तत्वद्न्य "सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचने" हे प्रसिद्ध ग्रंथ लिहिले तर होतेच पण गौतम बुद्ध आणि तुकाराम महाराजांचे विस्त्रुत चरित्रही लिहिलेले होते. डा. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गौतम बुद्ध समजले आणि अनिवार आकर्षण निर्माण झाले ते केळुस्करांच्या गौतम बुद्धाच्या चरित्रामुळेच. याशिवाय त्यांनी "आध्यात्मिक द्न्यानरत्नावली" या १८९४ साली लक्ष्मण पांडुरंग नागवेकर यांनी सुरू केलेल्या मासिकात गीतेवर असंख्य ग्रंथांचा आधार घेत तत्वद्न्यानात्मक टीकाही लिहिली. पुढे ही टीका पुस्तकरुपानेही प्रसिद्ध झाली.

यावरून केळुस्करांचे प्रकांड पांडित्य आणि अविरत संशोधन सिद्ध होते. परंतु "छत्रपती शिवाजी महाराज" हे शिवचरित्र त्यांच्या प्रकांड जिद्न्यासेचे, साक्षेपी संशोधनाचे मुर्तीमंत प्रतीक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

हे चरित्र आधी हिंदी व गुजराती भाषेत अनुवादित होवुन प्रसिद्ध झाले. इंग्रजी आव्रुत्तीमुळे शिवरायांना जगभर पसरवण्याचा त्यांनी ध्यास घेतला. शिवाय शिवाजी महाराजांची नवी उपलब्ध माहिती घेवुन मुळ ग्रंथात सुधारणा करून नवी आव्रुत्तीही प्रसिद्ध करायला घेतली. मनोरंजनकार कै. का. र. मित्र यांच्या छापखान्यात दोन्ही ग्रंथांची छपाईही झाली. पण या उद्योगात त्यांना प्रचंड कर्ज झाले. दोन्ही ग्रंथ छापुन झाले खरे पण ते कर्जाच्या विळ्ख्यात अडकले. त्यांच्या मित्रांनी हे कर्ज फेडण्यासाठी धडपड सुरू केली.

ही वार्ता इंदोर संस्थानचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांच्या कानी गेली. त्यांनी तत्कालीन रु. २४०००/- (आज ही रक्कम ८० लाख रुपयांच्या आसपास जाईल) देवून केलूस्करांना कर्जमुक्त तर केलेच पण इंग्रजी आव्रुत्तीच्या ४००० प्रती घेवून जगभरच्या मुख्य इंग्रजी ग्रंथालयांना मोफत वाटल्या व शिवराय चरित्र जगभर पसरवले. याच होळकरांनी शिवस्मारकालाहे देणगी दिली व स्मारकावर खर्चलेल्या रक्कमेतुन शिल्लक राहिलेल्या धनातुन सध्या वादात अडकवला गेलेल्या वाघ्या कुत्राचेही स्मारक करवून घेतले. ज्या काळात एकही तोंडाळ शिवप्रेमी/वंशज केळुस्करांना वा स्मारकाला मदत करायला पुढे सरसावले नाही त्या काळात जवळपास आजच्या भाषेत कोटभर रुपये होलकरांनी खर्च केले यात त्यांचे शिवप्रेम दिसून येते. आताचे शिवप्रेमी मात्र तो वाघ्याचा पुतळा हतवण्याच्या मागे आहेत हा एक दुर्दैवविलास आहे असेच म्हणावे लागते.

या ग्रंथाच्या आजवर ७ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्या असुन एक आव्रुत्ती बामसेफनेही संपादित प्रसिद्ध केली आहे. वरदा प्रकाशनाने १९९१ ते २०१० या काळात ४ आवुत्त्या प्रसिद्ध केल्या असून मुळ स्वरुप जपले आहे.

परंतु प्रा, विलास खरात संपादित, मुलनिवासी पब्लिकेशन ट्रुस्ट प्रकाशित केळुस्करांच्या शिवचरित्राने मात्र अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत हेही येथे नमुद करणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्रंथाची आव्रुत्ती प्रसिद्ध करतांना त्याचे मुळ नाव बदता कामा नये हा एक संकेत असतो तो येथे पार पाडला गेलेला नाही. "छत्रपती शिवाजी महाराज" या मुळ शिर्षकाचे नवे नामकरण "नागवंशीय छत्रपती शिवाजी महाराज" केले गेले आहे आणि हे सर्वच संकेतांना धुडकावुन लावणारे आहे. हे "नागवंशीय" का तर प्रा. खरात यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे नागवंशीय असल्याने सारे मराठा हेही नागवंशीय आहेत आणि ही बाब केळुस्कर गुरुजींनाही मान्य आहे. कारण का तर..."विजयादशमीचा सण मराठे लोक किती उत्साहाने आणि थाटाने पाळतात हे सर्वविदित आहे" असे केळुस्कर गुरुजींनी नोंदवले आहे....सारांश असा कि शिवाजी महाराज नागवंशीय होते...सबब सर्व मराठे मार्शल रेसचे आहेत. याला संपादन म्हणायचे असेल/संशोधन म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे!

लेखक/संशोधक/तत्वद्न्यांना जात नसते. केळुस्कर गुरुजींबद्दल तत्कालीन विद्वानांना केवढा आदर होता हे वरदा प्रकाशनाच्या आव्रुत्तीत प्रसिद्ध झालेल्या (मुलनिवासीने वगळलेल्या) पुरुषोत्तम बाळक्रुष्ण कुलकर्णी यांनी करुन दिलेल्या १२-१०-१९३४ च्या लेखक परिचयातुन स्पष्ट होते. परंतु दुर्दैवाने शिवाजी महाराजांनाच जातींत अडकावु पाहणा-यांना आणि केळुस्करांच्या इतिहासलेखनपद्धतीकडे ढळढळीत दुर्लक्ष करत वाट्टेल ते खोटे रेटुन सांगणा-या, झटपट प्रसिद्धीसाठी हपापलेल्या नव्य इतिहासकारांसाठी (?) हे सांगावे लागत आहे कि केळुस्कर हे मराठा समातीलच होते. त्यांना स्वबांधवांनी कसलीही मदत केली नाही. त्यांचा इतिहास त्यांचे लेखन घरोघर पोहोचवले नाही. मदत केली ती होळकरांनी. शिवस्मारक आणि वाघ्याला उदार देणगी दिली ती होळकरांनी. हे ऋण मान्य न करता, केळुस्करांना त्यांचे उचित श्रेय मिळण्यासाठी कसलेही प्रयत्न न करणा-यांना, त्यांना जवळपास विस्म्रुतीत ढकलना-यांना इतिहास क्षमा करेल काय?

4 comments:

  1. आपण खूप छान लेख लिहिला आहात. गेले काही दिवस माझी गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांच्या जीवनावर लेख लिहिण्याची इच्छा होती. आज तुम्ही ती पूर्ण केलीत. आपल्या जीवनात गुरुवर्य कृष्णराव केळूसकर यांनी अनेक पुस्तके लिहिली, समाजकार्य केलं, अनेक लोकांना मदतीचा हात दिला. १९२६ ला त्यांनी नाईक मराठा मंडळाची स्थापना केली आणि समाजकार्य हे एका समाजापुरत मर्यादित न ठेवता इतर लोकांनाही त्यांनी मदत केली. परंतु त्यानी केलेल्या कार्याची दखल फारशी कोणी घेतली नाही. याची खंत वाटते. तुम्ही जो लेख लिहिला त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी व माझे सहयोगी "कोकणस्थ मराठा समाज महासंघ" ही ब्लॉगसाईट आणि संघटना चालवतो. ही संघटना गोमंतक मराठा, नाईक मराठा , नूतन मराठा ,कोकणी मराठा आणि कारवार नाईक मराठा समाज अशा विखुरल्या गेलेल्या समाजाच्या प्रगतीशील विचारांच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आपला हा लेख आमच्या साईटवर पुनर्प्रकाशित व्हावा ही आमची इच्छा आहे. आपण परवानगी दिलीत तर आम्ही आपला लेख पुनर्प्रकाशित करू. आमच्या साईटला आपण भेट द्या ही विनंती .

    धन्यवाद

    http://kmsm.co.cc
    http://konkansthamaratha.blogspot.com

    ReplyDelete
  2. आद्य शिवचरित्रकार केळुस्कर गुरुजी आणि राजे तुकोजीराव होळकर यांचे आमच्यासारख्या शिव प्रेमिवर किती उपकार आहेत हे तुमच्या लेखामुले कळाले त्यामुले तुमचे शतश धन्यवाद.........

    ReplyDelete
  3. वामनजी, अवश्य हवा तेथे हा लेख प्रसिद्ध करा. या थोर इतिहासकाराची माहिती सर्वांपर्यंत पोहोचलीच पाहिजे.

    ReplyDelete
  4. great sanjay ji, so proud of u.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...