Monday, November 19, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (६)



जात-भावनेने कळस कसा गाठला?



औद्योगिकरण हे कोणत्याही, त्यातल्या त्यात भारतासारख्या देशाला, अभिशाप आहे असे गांधीजी म्हणत. स्वयंपुर्ण ग्रामव्यवस्था, जी भारतीय अर्थव्यवस्थेचा हजारो वर्ष कणा राहिली आहे तीच स्वातंत्र्यानंतर राबवली जाईल असा विश्वास लोकांना गांधीजींमुळे होता. देशभर उठलेले स्वातंत्र्याचे आंदोलन हे जनसामान्यांसाठी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा परंपरागत उद्योगपद्धतीच्या/अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी होते हेही वास्तव आतातरी येथे समजावून घ्यायला हवे. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात तसे काही झाले नाही हा भाग वेगळा. तसे होणे अशक्यही होते हेही खरे.



जातिव्यवस्था जन्माधारीत कशी बनत गेली व त्यात कोण-कोणते घटक मूख्य अथवा अंशत: का होईना सहभागी होते हे आपण गेल्या भागापर्यंत पाहिले आहे. जातिव्यवस्था मुळची जन्माधारीत नव्हती. दहाव्या शतकानंतर अनेक कारणांनी ती जन्माधारीत बनू लागली. एका अर्थाने एका विशिष्ट परिस्थितीत तगून राहण्यासाठी बनवलेली ती एक तात्पुरती व्यवस्था होती. परिस्थिती बदलताच अशा व्यवस्था आपसूक तुटतात व नव्या सामाजिक व्यवस्था आकार घेत असतात. हे प्रवाहीपण साधारणतया सर्व समाज जपत असतात. परंतू भारतात तसे घडले नाही.

सतरावे शतक ते जवळपास १८१८ पर्यंत भारताने राजकीय उलथापालथींचा अत्यंत धामधुमीचा काळ पाहिला. हा काळ सामान्यांसाठी लुटारुंचाच काळ होता असे म्हटले तरी फारसे वावगे ठरणार नाही. परस्पर प्रांतांची जाळपोळ करणे, खंडण्यांसाठी खणत्या लावणे अथवा गांवेच्या गांवे, शेतेच्या शेते जाळुन टाकणे हे नियमीत कृत्य बनलेले होते. एतद्देशीय सत्ताही त्यात मागे नव्हत्या. त्यामुळे सुलतानी आपत्तीत अडकलेले शोषित त्यांची सत्ता पुरेपूर स्थिर होण्याच्या आतच नव्या संकटात सापडले. भारत हा कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार होवू शकतो म्हणुन औद्योगिक क्रांतीनंतर युरोपियनांनीही आपला मोहरा भारताकडे वळवला होताच. इंग्रज त्या स्पर्धेत विजेते ठरले. १८१८ नंतर त्यांचे सत्ता स्थिर झाली. १८५७ च्या बंडाने थोडा झटका दिला असला तरी एक नवी पण स्थिर व त्यातल्यात्यात प्रशासकीय दृष्ट्या समर्थ अशी सत्ता स्थापित झाली.

हे खरे असले तरी जातीसंस्था परिवर्तीत होत नवे रूप धारण करण्याची संभावना उरली नाही कारण युरोपातील औद्योगिकरणामुळे येथील सर्वच निर्माणकर्ते घटक आहे तेच व्यवसाय गमावून बसू लागले. हर्बर्ट रिश्लेच्या अनुमानानुसार जवळपास ५०% लोकांनी आपले पारंपारिक व्यवसाय गमावले. म्हणजे पारंपारिक व्यवसाय वाढणे तर दूर पण आहे ते व्यवसाय गमावून लोकांना जगण्याची अन्य साधने शोधावी लागली. म्हणजे समाजव्यवस्थेला बदलाची संधीच उरली नाही. काही गुन्हेगारीकडे वळाले तर काही शेतमजुरीकडे. काही सरकारी मिलतील त्या नोक-या, अगदी सैनिकीही, स्वीकारु लागले. फ्रांक डी. झ्वार्टच्या मते इंग्रजी व्यवस्थेत जातीव्यवस्था कधी नव्हे इतकी कठोर बनली. हे मत विवादास्पद मानले जात असले तरी इंग्रजी अंमलात असंख्य लोकांना आहे तेही पारंपारिक व्यवसाय सोडुन अन्य उपजिविका शोधाव्या लागल्या व त्यांच्या हालांत भरच पडली हे तर उघड आहे. असे असले तरी भारतीय लोक जातीय उच्च-नीच भावनेने ग्रस्त असल्याने रेल्वेतून एकत्र प्रवास करणार नाहीत असा इंग्रजांचा प्राथमिक कयास भारतियांनी चुकीचा ठरवला हेही एक वास्तव आहे.

तरीही जातीभेद, उच्चनिच्चता हा भारतीय जातीसंस्थेचा एक अपरिहार्य भाग मानला जातो. तसे वास्तव नाही असे म्हणने चुकीचे ठरेल. आजही आपण त्याचा अत्यंत कटु अनुभव घेतच असतो. ही मानसिकता कशी विकसीत झाली हेही पहाणे आवश्यक आहे.

जातीसंस्थेकडे पहाण्याचे प्राय: चार दृष्टीकोण आहेत. पहिला म्हणजे ब्राह्मणी दृष्टीकोन जो जातिसंस्थेचा धर्माच्या पायावर विचार करतो व त्याचे समर्थन करतो. आधुनिक युगात याला अनेक अपवाद असले तरी जातिसंस्था ही आज कालबाह्य असली तरी ती मुलत: धर्माधिष्ठितच होती असा त्यांचा एकुणातील निर्वाळा असतो. दुसरा दृष्टीकोण म्हणजे पाश्चात्यांचा. हर्बर्ट रिश्ली हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो कि भारतिय जातीव्यवस्थेत खुपच उच्च-निच्चता पाळतात ही एक अंधश्रद्धा आहे. प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृष्यांचा अपवाद केला तर अन्य उच्च ते निम्नस्तरीय जाती यांत रोटीबंदी नाही. यूल अर्थात याविपरित मत मांडतो. रिश्लेच्याच सर्व्हे नुसार जातनिहाय व्यवसाय बंधने पाळली जात नसुन विणकर-लोहार-धनगरादि आता शेतकरी बनलेले दिसतात तर चर्मोद्योगात आता फक्त (तेच नियत उद्योग आहेत असे) फक्त ८% लोक उरले असून अन्य शेती अथवा शेतमजुरीत गेले आहेत. तीच बाब अन्य व्यवसायांची झाली असल्याचे निरिक्षणही तो नोंदवतो. तिसरा दृष्टीकोण निर्माणकर्त्यांचा (म्हणजे उत्पादक घटकांतुन आलेले, परंपरेने शूद्र मानले गेलेले) असून या दृष्टीकोनाचे प्रवर्तक महान समाजनेते म. फुले होत. त्यांच्या मते विजित आर्यांनी बळीदेशावर आक्रमण करून, त्यांना पराजित करून दास-दस्यु बनवुन त्यांना शूद्रातिशूद्र बनवून दास्यात लोटले आहे व ते मूख्य शोषक आहेत. चवथा दृष्टीकोण हा बाबासाहेब प्रणित असून "शूद्र पुर्वी कोण होते?" या ग्रंथांतुन त्यांनी आपले मत सुस्पष्ट केलेले आहेच. जातिव्यवस्थेचे निर्माते ब्राह्मण अथवा मनू नव्हे हेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

ही मतमतांतरे अनेक बाबतीत परस्परविरोधी आहेत हे उघड आहे, आणि ते जातीसंस्थेची गुंतागुंत व विशिष्ट भुमिकेतून इतिहासाचे केलेले अवगाहन पाहता स्वाभाविकही आहे. यातून उच्चनीचतेची भावना अथवा मानसिकता नेमकी कोणत्या तत्वांनी जन्माला येते याचा उलगडा होत नाही. व्यवस्थेचा फायदा फक्त उच्चवर्णीयांना झाला व शुद्रातिशुद्रच दरिद्र होत गेले हे अर्धसत्य आहे. प्रशासनासाठी सत्तांना जे घटक आवश्यक वाटले त्यांचा आर्थिक स्तर उंचावला असला तरी ते सर्वांसाठीचेच वास्तव नव्हते. बहुसंख्य घटकांच्या दारिद्र्याचे कारण बदलत्या अर्थव्यवस्थेत होते आणि त्याला जबाबदार अधिकाधिक उत्पन्न कमीत कमी खर्चात मिळवू पाहणा-या सत्ता होत्या. इंग्रजांच्या दृष्टीने भारत ही कच्च्या मालाची स्वस्त पुरवठादार आणि पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ होती. एतद्देशीय व्यवसाय व कला यांचा प्रवास वेगाने अधोगतीकडे सुरु झाला होता. यामुळे एकुणातील समाजव्यवस्थेला समूळ हादरा बसणे स्वाभाविक होते. या स्थितीत जातींची भूमिका काय होती? समाजमानसशास्त्र अशा स्थितीत कसे वागू शकते?

जाती जन्माधारीत बनून साताठशे वर्ष होवून गेल्याने व ज्या अवस्थेत त्या जन्माधारित बनल्या त्या स्थितीत समुळ बदल होत त्याआधीची एतद्देशियांची मूक्त बाजारपेठ पुन्हा आलीच नसल्याने जातीय बंध घट्ट होत जाणे स्वाभाविक होते. नवपरिवर्तनाची दिशा मिळेल अशी अनुकूल स्थिती आलीच नाही. विवाहसंस्थेमुळे स्वजातीतच विवाह करण्याची पद्धत रूढ झाली असल्याने भावकीचे भावात्मक बंधही तेवढेच दृढमूल होत जाणे स्वाभाविक होते. जगण्याचा संघर्ष जसजसा तीव्र होत जातो तसतसा समान प्रश्नांनी ग्रसित विभिन्न समाजघटक आकुंचित होत आपल्या जगण्याचा आधार बनवणारी भावनिक व व्यावहारिक अशी संघटने बनवतात. स्व-जातींबाबत, व त्यातल्या त्यात पोटजातींबाबत असे संघटन होणे सोपे होते. हे संघटन घटनाविरहित नसते. अलिखित असली तरी या संघटनाची एक घटना बनतेच व तीच जातपंचायतींमार्फत भारतात वापरली गेली. तेराव्या शतकानंतर ती क्रमश: अधिक बंधयुक्त होत गेली. इंग्रजकाळात तिने कळस गाठला.

धर्ममार्तंडांची यात नेमकी काय भुमिका होती? भारतात राजव्यवस्थेने अथवा धर्मसत्तेने जातपंचायतींच्या निर्णयांत हस्तक्षेप केल्याची उदाहरणे अपवादात्मक आहेत. ब्राह्मनांच्या गोतसभा असत व त्यांचेही निर्णय धर्ममार्तंड व राजसत्ता स्वीकारत. इंग्रजपुर्व काळापर्यंत ही पद्धत सर्रास होती. राजसत्तेने जातीसंस्थेस उत्तेजनही दिले नाही कि ती संपावी असेही प्रयत्न केले नाहीत. छ. शिवाजी महाराजांनीही रुढीप्रमाणे चालत आलेल्या सामाजिक रुढींत हस्तक्षेप टाळला. या एकुणातील स्थितीमुळे प्रत्येक जात ही एक स्वतंत्र व्यवस्था बनत गेली. जातपंचायतींचे अधिकारही अमर्याद म्हणता येतील एवढे वाढत गेले. एवढेच नव्हे तर ब्राह्मणांना प्रत्युत्तर म्हणुन अनेक जातींनी आपापल्या स्वतंत्र उत्पत्तीकथा बनवायला सुरुवात केली. काहींनी स्वतंत्र जातिनिहाय पुराणेही लिहुन घेतली. शिव हा सर्वांचा पुर्वज...कोणी शिवाच्या जीभेतून तर कोणी अश्रुतून...व जातीनियमावली वेगळी, यामुळे प्रत्येक जात स्वतंत्र पातळीवर एक स्वतंत्र धर्मही बनत गेली. चाली-रिती, कुलप्रथा व कूलदैवत अनेक जातींचे एकच असले तरी तत्संबंधी वेगवेगळ्या प्रथांचे निर्माण करण्यात आले. मित्थके बनवली गेली. यात ऐतिहासिकतेचा भाग क्वचितच होता. वर्णव्यवस्थेचा पगडा पोथ्या-पुराणकारांनी वाढवल्याने प्रत्येक जात आपापले जातीय मूळ क्षत्रियत्व अथवा ब्राह्मणत्वात शोधु लागली...मग ते धनगर-गवळी असोत कि पुर्वास्पृष्य. सोनारांनी व कोष्ट्यांनी आपले मूळ ब्राह्मणत्वात शोधले. वर्तमान जातीय अवनतीला कोणाला परशुराम कामी आला तर कोणाला कोणत्यातरी दैवताचा शाप! या सर्वांतून प्रत्येक जात आपापला अंतर्गत जातीअभिमान वाढवत राहिली. बाहेरही त्याची अभिव्यक्ति होत राहिली. परस्पर-हीणभाव यातून वाढत गेला. अस्पृष्य मानले गेलेले घटकही परस्परांना हीण मानू लागले. ही सारी समाजमनाची एक वेगळीच अभिव्यक्ती होती. आपले मूळ प्रत्येक जातीने स्वतंत्रपणे शोधायला सुरुवात केली. हे एकार्थाने एकाच समाजाचे विघटन होत प्रत्येक जातीसमुहाचे स्वतंत्र बेट बनण्यासारखे होते.

एकार्थाने प्रत्येक जात ही एक राष्ट्र बनली असे म्हणने येथे वावगे होणार नाही. भटक्या-विमूक्त जाती-जमातीही या तत्वाला अपवाद राहिल्या नाहीत. जातभावनेने कोणत्याही जातीचे आर्थिक उत्थान केले नसले तरी एकात्म जात-सामाजिक भाव आणि सहवेदना दिली. अन्य जातींशीचा सहयोग हा फक्त सामाजिक गरजांपुरताच उरला. मनाने मात्र तो आपल्या जातीचा व म्हणुन आपल्या राष्ट्राचा राहिला. जातीविरुद्ध वर्तन हा भयंकर सामाजिक गुन्हा ठरला असल्याने तसे वर्तन करण्याचे धाडस कोणातही उरले नाही. प्राप्त स्थितीत ज्याही रोजगाराच्या संध्या होत्या त्या प्रत्येकाने मिळवल्या, जीवनशैलीतील बदलही स्वीकारले, परंतू जातीय भावना दृढमुलच राहिल्या यामागे जात ही एकार्थाने संरक्षक कवच म्हणुन काम करत होती हे मूख्य कारण आहे. ते कवच तोडणे अथवा झुगारुन देणे फायद्याचे नव्हते. किमान असल्याने नुकसान तरी नव्हते. कारण व्यापक धर्मापेक्षा जातीधर्म कालौघात सर्वोपरि बनला होता.

पुर्वी व्यवसायावर आधारित जाती बनल्या हे आपण पाहिलेच आहे. इंग्रजकाळ येईपर्यंत त्या व्यवसायाधिष्ठित स्थिर बनल्या हेही आपण पाहिले. पण इंग्रजकाळात मात्र असंख्य लोकांना आपापले परंपरागत व्यवसाय सोडावे लागले असले व अगदी नवीन असेही व्यवसाय स्वीकारावे लागले असले तरी जातिनिष्ठ लवचिकता पुन्हा आलीच नाही, जाती कायमच राहिल्या. याचे कारण आहे ही (इंग्रजी) सत्ताही किती काळ टिकेल व नवी व्यवस्था कशी असेल याबाबत समाजमन साशंक असने स्वाभाविक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात डोकावले व त्यात जनमानसाचे असे प्रतिबिंब नोंदवले गेले नसले तरी ज्या पद्धतीने घडामोडी घडत होत्या त्या आशा आणि साशंकतेच्या हिंदोळ्यावर दोलायमान होत्या असेच म्हणावे लागते. भारतीय जनमानसाने गांधीजींना का स्वीकारले याचे खरे उत्तर त्यांच्या चरख्यात आहे. स्वातंत्र्य मिळाले कि भारत औद्योगिकरणाचा नव्हे तर परंपरागत उत्पादनपद्धतीचा मार्ग चोखाळेल व आपले व्यवसाय पुन्हा बरकतीस येतील ही आशा त्यांना वाटणे स्वाभाविक होते. औद्योगिकरण हे कोणत्याही, त्यातल्या त्यात भारतासारख्या देशाला, अभिशाप आहे असे गांधीजी म्हणत. स्वयंपुर्ण ग्रामव्यवस्था, जी भारतीय अर्थव्यवस्थेचा हजारो वर्ष कणा राहिली आहे तीच स्वातंत्र्यानंतर राबवली जाईल असा विश्वास लोकांना गांधीजींमुळे होता. देशभर उठलेले स्वातंत्र्याचे आंदोलन हे जनसामान्यांसाठी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा परंपरागत उद्योगपद्धतीच्या/अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी होते हेही वास्तव आतातरी येथे समजावून घ्यायला हवे. स्वातंत्र्यानंतर प्रत्यक्षात तसे काही झाले नाही हा भाग वेगळा. तसे होणे अशक्यही होते हेही खरे.

खरे तर सुरुवातीच्या काळातच नवे भारतीय अर्थशास्त्र विकसीत व्हायला हवे होते. भारतीय मानसिकतेला आधारभूत अशीच त्याची रचना केली जायला हवी होती. अर्थव्यवस्थेची रचना समूळ बदलल्याखेरीज जातीची बेटे विरघळनार नाहीत याचे भान यायला हवे होते. हे सारे मध्ययुग ते ब्रिटिशकाळ येईपर्यंतच्या काळात घडणे शक्य होते, पण आपले त्या काळातील विचारवंत/संत इहलोकीक ध्येयांपेक्षा पारलौकिकतेकडे डोळा लावून बसल्याने त्यांनी जातीभेदाबाबत कितीही विरोध दर्शवला असला, तीवर कठोर प्रहार केले असले तरी प्रत्यक्षात त्याचे अनुसरण अशक्य होते. आर्थिक प्रेरणाच नेहमी संस्कृती घडवत असतात याचे आपले भान सुटले. आजही या स्थितीत फारसा बदल घडलेला नाही. जो बदल दिसतो तो फक्त ४-५% लोकांपर्यंत मर्यादित आहे. साताठशे वर्ष ज्यांच्या अविरत आर्थिक वाताहतीच होत राहिल्यात, आजही पायावर हिम्मतीने व स्वाभिमानाने उभे राहता येईल अशी मानसिक स्थिती निर्माण होईल असे सबळ वातावरण नाही म्हणुन आजही जातच बव्हंशी लोकांना मानसिक आधार वाटते, जातीची अपरिहार्यता म्हणुन नव्हे हेही एक वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे.

जातीसंस्थेचा हा विलक्षण प्रवास आपण पाहिला. ती उध्वस्त करायची असेल तर नेमके काय करावे लागेल यावरही आपल्याला विचार करायला हवा...त्यावर पुढील भागात...



(क्रमश:)



-संजय सोनवणी

९८६०९९१२०५

2 comments:

  1. This is something new...I mean...a main cause behind unity of the Indian people for freedom struggle...entirely new angle...must think over this...

    ReplyDelete
  2. Great analysis, thank you for writing this article.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...