Monday, April 28, 2014

रणजित सिंहाची गद्दारी!


जनरल लेकवर अंतिम आणि संपुर्ण विजय मिळवुनही भरतपुरच्या जाट राजाला अवदसा सुचली. त्याने नेमक्या त्याच वेळीस इंग्रजांशी तह केला. यशवंतरावांना जी भिती होती तिच खरी ठरली. युद्धात जिंकता येत नाही...येणार नाही हे लक्षात आलेल्या इंग्रजांनी राजकीय पटावर विजय मिळवला होता. यशवंतरावांच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसण्यात आला होता.

जाटाने तह करुन यशवंतरावांना अडचणीत आणले होते.

इंग्रजांनी हा जाटाला २२ फ़ेब्रुवारीलाच...म्हणजे ज्या दिवशी आपला संपुर्ण पराभव झाला आहे आणि जर जाटाला वश केले नाही तर एक सैनिकही येथुन परत जावु शकणार नाही हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी रणजितसिंहाशी तात्काळ वाताघाटी केल्या. भीति, आमिषे, आश्वासनांच्या खैराती केल्या. यशवंतराव जरी जिंकला असला तरी तो येथुन जाताच आम्ही भरतपुरचे राज्य उध्वस्त करु अशी भिती त्यांनी दाखवली. आज ना उद्या आम्ही यशवंतरावांना पराजित करणारच, मग भरतपुरचे भविष्य काय होईल याचे चित्र उभे केले. यशवंतरावांना अन्य कोणीही राजा समर्थन देत नाहीय हेही रनजितसिंहाच्या लक्षात आणुन दिले गेले. यशवंतरावांची साथ सोडली तर मात्र इंग्रज त्यांच्याशी मित्रत्वाचा व भरतपुरचे राज्य इंग्रजांच्या रक्षनाखाली ठेवण्याचा करार करायला तयार होते. रणजितसिंह त्यांच्या आमिषांना बळी पडला. त्याने इंग्रजांची साथ द्यायचे ठरवले.

हे कळताच रणजितसिंहाला पकडुन धडा शिकवणे यशवंतरावांना सहज शक्य होते...पण त्याच्या भुमीवर त्याच्याशी असा व्यवहार करणे यशवंतरावांच्या नैतिकतेत बसत नव्हते. त्याने इंग्रजांची बाजु घेतल्याने व त्याने यशवंतरावांना आपल्या भुमीवर युद्ध न करण्याची विनंती केल्याने त्यांनी भरतपुर सोडण्याचा निर्णय घेतला. शिख राजे तरी या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होतील अशी अशा त्यांना वाटत होती, कारण भरतपुरच्या विजयाचा अनुकुल परिणाम शिखांवर झाला होता.

त्यांनी भरतपुर सोडण्याचा निर्र्णय घेतला.

पुढे ईंग्रजांनी १७ एप्रिल १८०५ रोजी रणजितसिंहाशी लेखी करार केला. डीगचा किल्लाही त्याला परत दिला. कागदावर रणजितसिंहाने २० लक्ष रुपयांची खंडनी दिली असे दाखवुन प्रत्यक्षात तीन लाखच घेतले. ही लबाडी होती. इंग्रजांनी त्याची भरतपुर राज्यावरची सार्वभौमता मान्य केली. ही सार्वभौमता किती काळासाठी असेल याचा विचार त्याने केला असता तर? अर्थात इंग्रजांनी नंतर रणजितसिंहांशी केलेला करार पाळला नाही हे ओघाने आलेच.

रणजितसिंहाचे हे क्रुत्य देशद्रोहाचे होते. यशवंतराव आता जिंकला असला तरी तो सतत येथे राहणार नाही, तो दुसरीकडे गेला कि इंग्रज आपला सुड उगवतील ही भिती या तहामागे होती असे इतिहासकार म्हणतात आणि ते खरेही आहे. पण तो तटुन राहिला असता तर इंग्रजांना पुढच्या हालचालींना वाव मिळाला नसता हे त्याच्या लक्षात आले नाही हे देशाचे दुर्दैव आहे.  .

भरतपुरच्या युद्धातील जय हा अद्भुत आहे. वाटर्लुदेखील त्यामानाने सोपे होते असे नंतर या युद्धात सहभागी झालेल्या व पुढे १८१५ मद्धे वाटर्लु युद्धातही लढलेल्या सेनानींनी नमुद करुन ठेवले आहे. खरे तर यशवंतराव अत्यंत प्रतिकुल स्थितीत होते. खत्रीने त्यांचा विश्वासघात करुन त्यांना सोडले होते. अमिरखान इंग्रजांचा हस्तक बनलेला होता. डीगच्या लढाईत त्यांच्या अनेक तोफा शत्रुहाती पडलेल्या होत्या. जनरल लेक सर्व शक्तीनिशी त्यांच्यावर तुटुन पडलेला होता. त्यांच्या होळकरी संस्थानांत कर्नल मरेने धुमाकुळ सुरु केलेला होता. पुरेसे धन नव्हते. कोणी मित्र नव्हता. आणि तरीही त्यांनी लेकलाही धुळ चारली होती.

या युद्धानंतर वेलस्लीला हिंदुस्तानातुन परत बोलावले गेले. खरे तर वेलस्लीचा भारतातुन फ्रेंचांचा अंमल पुरता उठवणे, पेशव्याला मांडलिक करुन व शिंदे-भोसलेंचा सहज पराजय करुन इंग्रजी सत्ता वाढवण्यात मोठा हातभार होता. त्यामुळे वेलस्ली व लेक साम्राज्याचे नायक (Hero) बनले होते. ब्रिटिश जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते. पण यशवंतराव होळकरांविरुद्ध मात्र त्या दोघांनाही सतत अपयश आल्याने त्यांची प्रतिमा भंग पावली होती. भरतपुरला पराभव स्विकारावा लागल्यानंतर कंपनी सरकारने तातडीने हालचाली सुरु केल्या. जर मराठा राजमंडळाचे या पराभवानंतर पुनरुज्जीवन झाले तर आपण घोर परिस्थितीत सापडु याची त्यांना जाणीव होती. त्यात तेंव्हा इंग्रज नेपोलियनशी युद्धांत चांगलेच अडकुन पडले होते. त्यात भारतात इंग्रजविरोधी हवा तयार झाली तर जो पेचप्रसंग निर्माण होईल तो सोडवायचा कसा हा प्रश्न होता. वेलस्ली ही स्थिती हाताळु शकत नाही हे स्पष्ट झाले होते.

इंग्रजांनी वेलस्लीला परत इंग्लंडला बोलावुन घेतले आणि लार्ड कार्नवालिसची गवर्नर जनरल म्हणुन ३० जुलै १८०५ ला नियुक्ती केली. पण इंग्रजांच्या दुर्दैवाने कार्नवालिसचा ५ आक्टोबर १८०५ ला गाझीपुर येथे अचानक म्रुत्यु पावला. त्याच्या जागेवर मग सरकारने जोर्ज बार्लो याची नियुक्ती केली.

अशा रितीने यशवंतरावांनी इंग्रज सरकार हादरवुन सोडले होते. त्यांना भारताबाबतची सर्वच धोरणे बदलायला भाग पाडले होते.

भरतपुरहुन निघालेले यशवंतराव मग जिंद, पतियाला येथील राजांना भेटले. अनेक शिख राजा-रजवाड्यांनाही एकत्र लढ्याचे आवाहन केले. भारतात अन्य राजे-नबाब-संस्थानिकांनाही पत्रे पाठवण्याचा उपक्रम सुरुच होता. शिख राजे मानसिंह व लाहोरचे महाराजा रनजित सिंह यांनी त्यांच्या लढ्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. ही सध्या जमेची बाजु होती. सर्वांनी एकत्र येवुन उठाव केल्याखेरीज इंग्रजांचे पुर्ण पारिपत्य होणे शक्य नव्हते. इंग्रज देशभर पसरला होता. काही युद्धे जिंक्ल्याने इंग्रज पळेल असे वाटुन घेण्याएवढे अपरिपक्व नव्हते ते. त्यामुळे त्यांनी आपले प्रयत्न अथकपणे सुरुच ठेवले. लेक अंतर ठेवुन त्यांचा पाठलाग करत राहीला पण एकदाही त्याने यशवंतरावांशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही.

कार्नवालिसने गवर्नर होताच पहिला निर्णय घेतला तो म्हणजे काय वाट्टेल त्या किमतीवर यशवंतरावांशी शांततेचा तह करायचा. त्याखेरीज इंग्रजांना येथे भविष्य नाही याची त्याला पक्की जाणीव होती. यशवंतराव पतियाळाला असतांनाच इंग्रजांचे प्रतिनिधी त्यांच्याकडे शांततेचा तह घेवुन पोहोचले. इंग्रजांना यशवंतरावांशी युद्ध नको होते. होळकरांचे सर्व राज्य स्वतंत्र व सार्वभौम मानायला ते तयार होते. होळकरी राज्यात वा होळकर-शिंदे संघर्षात हस्तक्षेप करणार नाही असे लेखी वचन द्यायला ते तयार होते. एवढेच नव्हे तर एकही इंग्रज होळकरांच्या भुमीवर यशवंतरावांच्या अनुमतीखेरीज पाय ठवणार नाही असेही ते कबुल; करत होते. त्यांना होळकरांकडुन कसलाही युद्धखर्च नको होता. उलट ते यशवंतरावांचा जयपुरवरील चौथाईचा हक्क कबुल करायला तयार होते.

खरे तर असा सन्मानपुर्वक तह तत्कालीन कोनत्याही राज्यकर्त्याने हसत केला असता. अन्य सर्वच राज्यकर्त्यांना मानहानीकारक अटींवर तह करावे लागले होते. इंग्रजांच्या तैनाती फौजा ठेवाव्या लागल्या होत्या. कोणतेही राजकीय धोरण ते इंग्रजांच्या परवानगीखेरीज ठरवु शकत नव्हते. ते गुलाम बनलेले होते. यशवंतराव हे एकमेव महाराजा होते ज्यांच्याशी इंग्रज शांतीचा तह करु इछ्छित होते...मांडलिकत्वाचा नाही.

पण यशवंतरावांना स्वातंत्र्य फक्त स्वत:च्या राज्यापुरते नको होते. त्यांना इंग्रज फक्त स्वत:च्या राज्याबाहेर नव्हे तर देशाबाहेर पाहिजे होता. त्यांनी इंग्रजांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

तेवढ्यात दौलतराव शिंद्यांनीही आता होळकरांना साथ देण्याचा निर्नय घेतला. यशवंतरावांना तसे कलवलेही व सैन्य घेवुन तो यशवंतरावांना सामील व्हायला निघाला. पण इंग्रजांना हे समजताच त्यांनी यशवंतरावांना वाटेतच गाठले. त्याचे मन वळवले. २३ नोव्हेंबर १८०५ रोजी दौलतरावाशी पुन्हा नवा करार करुन त्याला अधिकचा प्रदेश दिला. दौलतरावाचा होळकरांना मदत करण्याचा उत्साह मावळला. यशवंतरावांना त्याने पुन्हा एकदा निराश केले.

यशवंतराव लाहोरला जायला निघाले. तोवर मानसिंगांची फौज त्यांना येवुन मिळालेली होती. जनरल लेक पाठलागावर होताच, पण त्याने कोठेही यशवंतरावांशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही.

लाहोरला यशवंतराव जात आहेत आणि शिख राजे त्यांना मिळु लागले आहेत हे लक्षात येताच इंग्रजांनी पुन्हा त्यांची कुटनीति वापरली. जनरल लेकने महाराजा रणजित सिंहांना तातडीने एक खलिता पाठवला आणि यशवंतरावांना सामील न होण्याची ताकीद दिली. रणजितसिंगांनी आपल्या राज्यातील व शेजारील राज्यातील शिख नेत्यांची बैठक भरवली. फत्तेहसिह अहलुवालिया आणि अन्य प्रमुखांनी रणजित सिंगांना यशवंतरावांना सामील न होण्याचा सल्ला दिला. इंग्रजांनी तोवर बाग सिंग या रणजित सिंगाच्या चुलत्याला रणजितसिंगाकडे पाठवले व त्याचा प्रभाव वापरुन रणजितसिंगाचे मन इंग्रजांच्या बाजुने वळवायला लावले. तोवर ईंग्रजांचे वकीलही लाहोरला पोहोचले आणि त्यांनाही आमिषे दाखवुन शिखांशी नवीन मित्रत्वचा करार करुन घेतला. या करारानुसार मैत्रीच्या बदल्यात त्यांनी यशवंतरावांना कसलेही सहकार्य करायचे नाही असे कबुल करुन घेतले होते. यशवंतरावांना हे कळताच त्यांनी जे संतप्त उद्गार काढले ते आजही पंजाबमद्धे म्हण बनुन बसले आहेत. त्या करारामुळे यशवंतरावांचा अखेरचा मार्गही बंद झाला. मान सिंहानेही आपला विचार बदलला. त्याची सेना आल्या वाटेने निघुन गेली. अवघ्या देशात ते एकाकी पडले. त्यांची स्वातंत्र्याची आस, देशाच्या भवितव्याची कालजी कोणाही शासकाला समजली नाही. यशवंतराव खिन्न होणे स्वाभाविक आहे.
.
तेंव्हा यशवंतराव बियास नदीच्या काठी होते. आता परत आपल्या राज्याकडे परतण्याखेरीज व पुढील नवीन दिशा शोधण्याशिवाय व नवा मार्ग आखण्याखेरीज त्यांच्यासमोर कोणताही मार्ग उरला नव्हता. खरेच सारे मार्ग बंद झाले होते, पण तरीही हताश न होता नवीन मार्ग शोधायची जिद्द त्यांच्यात होती आणि हीच त्यांच्या व्यक्तिमत्वातील खरी शक्ती होती.

यशवंतरावांना एकाकी पाडन्यात इंग्रजांना यश आले होते. पण यशवंतरावांची धास्ती त्यांच्या मनात कायम होती. लेकवर कोणत्याही अटींवर यशवंतरावांशी शांततेचा तह करावा यासाठी दबाव वाढत होता. यशवंतराव युद्धायमान आहेत तोवर आपल्याला शांततेने येथे कारभार करता येणे अशक्य आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. खरे तर कोणीही मित्र वा समर्थक नसलेल्या यशवंतरावांशी युद्ध करुन त्यांना नमवने लेकसारख्या सेनानीला कधीही आवडले असते...

पण त्याने यशवंतरावांचा धसका घेतलेला होता. तो भरतपुरपासुन यशवंतरावांच्या पाठीशीच होता, पण कोठेही त्यांच्याशी युद्धाची हिम्मत केली नव्हती. अम्रुतसरला तर ते एकदा समोरासमोरही आले होते, पण त्याने यशवंतरावांना मार्ग मोकळा करुन दिला होता. यशवंतरावांशी लढायची अजुनही त्याची हिम्मत होत नव्हती.

यशवंतरावांना इंग्रजांचे वकील भेटले. त्यांना यशवंतरावांच्या अटींवर शांततेचा तह करण्याचे अधिकार देण्यात आले होते. आपल्याला भविष्यात लढायचे असेल तर त्यांनाही खरोखर काही काळ सैन्य व शस्त्रास्त्रांची जमवाजमव करण्यासाठी वेळ हवा होता. भारतातुन फ्रेंचांचे आस्तित्व संपल्याने त्यांच्याकडुन तोफा मिलवण्याचा मार्ग बंद झाला होता आणि इंग्रजांनी आता तोफ सोडा एक बंदुकही त्यांना विकली नसती. आपली शस्त्रास्त्रे आपल्यालाच बनवावी लागतील याची त्यांना जाणीव होती. त्यांचे एकुण सैन्यही खत्रीच्या दगाबाजीमुळे कमी झाले होते. अमीरखान आज बरोबर असला तरी नसल्यात जमा होता त्यामुळे त्याचे घोददळ आपले आहे असे ते मानत नव्हते. त्यांना वेळ हवा होता. यशवंतरावांनी इंग्रजांनी दिलेला शांततेच्या तहाचा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरवले.

यशवंतरावांनी चर्चांच्या अनेक फे-यांत इंग्रजांच्या प्रस्तावापेक्षा अधिक अटी घातल्या. २४ डिसेंबर १८०५ रोजी त्यांच्यात बहुतेक मुद्द्यांवर सहमती झाली, पण यशवंतरावांनी जाचक अटी घातल्याने तो मसुदा गवर्नर जनरल बार्लोकडे अनुमतीसाठी पाठवण्यात आला. त्याने काही दुरुस्त्या सुचवून कराराचा मसुदा ६ जानेवारी १८०६ ला परत पाठवला. यशवंतरावांनीही मग त्यात अधिकच्या दुरुस्त्या सुचवुन शिंदे-होलकरांच्या प्रश्नात इंग्रज लक्ष घालणार नाहीत असेही कबुल करुन घेतले.

या तहानुसार इंग्रजांनी होळकरांना त्यांचे सारे प्रांत परत देवुन त्यावरील त्यांची सार्वभौम सत्ता मान्य केली. जयपुर, उदयपुर, कोटा आणि बुंदीवरील त्यांचा चौथाई वसुलीचा हक्क मान्य केला. होळकरी राज्यांतर्गतच्या कोनत्याही प्रश्नात ईंग्रज लक्ष घालणार नाहीत वा हस्तक्षेप करणार नाहीत हेही मान्य केले. बदल्यात होळकरांनी इंग्रजांशी फक्त युद्धबंदी जाहीर केली. हा करार ६ फेब्रुवारी १८०६ रोजी राजघाट येथे झाला. हे राजघाट म्हनजे आता जेथे महात्मा गांधींची समाधी आहे तेच स्थान होय.

इंग्रजानी स्वता:हुन सामोरे येवुन, सर्व अटी मान्य करुन केलेला हा एकमेव तह. या तहाने होळकरांची सार्वभौमता अखंडित राहिली आणि यशवंतरावांना आपल्या पुढील योजना अंमलात आनण्यासाठी उसंत लाभली.

इंग्रज करार पाळनार नाहीत हे त्यांना चांगलेच माहित होते...

पण ते तरी कोठे करार पाळणार होते?

त्यांच्या डोक्यात पुढील योजना तयार होत्याच.

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...