Thursday, May 1, 2014

नंतर....

 
    महाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (तुळसाबाई या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.

    भिमाबाईचा विवाह यशवंतरावांनी धारच्या जहागिरदाराशी लावुन दिला होता. पण दुर्दैवाने तिच्या पतीचा लग्नानंतर काही वर्षांतच मृत्यू झाल्याने ती परत माहेरी आली होती. तिची स्वता:ची पेटलवाड येथे जहागिरी होती. भिमाबाईला यशवंतरावांनी घोडेस्वारी व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले होते तसेच लिहिण्यावाचण्याचेही शिक्षण तिला मिळालेले होते. भालाफेक व बंदुक चालवण्यात ती पटाईत होतीच पण त्या कालातील उत्कृष्ठ अश्वपरिक्षक अशी तिची ख्याती होती. यशवंतराव अत्यंत पुढारलेल्या विचारांचे असल्यानेच त्या काळात त्यांनी मुलीला शिक्षण दिले, जेंव्हा स्त्रीयांना जनान्याबाहेरही पडायची परवानगी नव्हती. (Female Indian Freedom Fighters- article in Sunday Tribune by Rajesh Chopra) भिमाबाई मात्र आपल्या सावत्र आईच्या पाठीशी ठामपणे उभी होती.

    तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.

धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १८१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. त्याच वेळीस इंग्रजांचे सैन्य महिदपूरच्या दिशेने निघाले. तुळसाबाई व मल्हारराव (२) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.

    त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुलसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना पुढे ढकलावी लागली.

    दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने मल्हारराव व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. कट पुरता शिजला होता.

    महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १८१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.

        यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.

    आणि नीतिहीन लोलुपांची कमी कधी असते काय?
           
    महिदपुरचे युद्ध

    सर थोमस हिस्लोप हा इंग्रज सैन्याचे नेत्रुत्व करत होता. त्याने आधी मल्हाररावांना शरण येण्याचा आदेश पाठवला. मल्हाररावांचे वय तेंव्हा होते ११ वर्ष. पण या कोवळ्या मुलाने जबाब दिला कि "होळकरांचे सैन्य कसे असते हे तुला रणांगणावर दाखवु." त्या रात्री सर्व सेनानींनी आपापसातील मतभेद दुर ठेवुन इंग्रजांना धुळ चारायची प्रतिज्ञा केली. नंतर गफुरखानही त्यांना येउन सामील झाला. तुळसाबाईचे काय झाले हे तेंव्हा गफुरखान सोडता कोणालाच माहित नव्हते.सर्वांच्या डोळ्यासमोर फक्त इंग्रज दिसत होता...यशवंतरावांचा कट्टर वैरी...ते त्याला सीमेपार धाडनार होते. पण इंग्रजांची कुटनीति कोणत्या स्तराला जावु शकते हे त्यांना अद्याप माहित नव्हते.
     दुस-या दिवशी युद्ध सुरु झाले. इंग्रज अधिका-यांनीही नंतर नवलाने लिहिले आहे कि ११ वर्षाचा मल्हारराव हत्तीवरुन रणभुमीवरुन फिरत होता...आपल्या सैन्याला उत्तेजन देत होता. त्याला कसलीही भिती वाटतांना दिसत नव्हती. भिमाबाईही स्वत: या युद्धात घोडदळाचे नेत्रुत्व करत लढत होती. विठोजीरावांचा २० वर्षीय मुलगा हरीरावही या युद्धात सामाल झाला होता.
    दुपारपर्यंत या युद्धाचा कल होळकरांकडे होता. इंग्रजांची या युद्धात खुपच हानी झाली. हिस्लोपला वाटले आता माघार घ्यावी लागणार...पण गफुरखानाने अचानक आपल्या सैन्यासह पळ काढला. त्यामुळे होळकरी सैन्यात एकाएकी संभ्रम माजला...गोंधळाचा फायदा घेवुन हिस्लोपने तोफांचा मारा वाढवला...होळकरी सैन्यातही फाटाफुट झाली.
    होळकरांचा प्रथमच इंग्रजांनी पराभव केला.
    याची परिणती मंदसोर येथील ६ जानेवारी १८१८ च्या तहात झाली. होळकरांना आपले अनेक प्रांत गमवावे लागले. या युद्धातील पराजयामुळे शेवटचे स्वतंत्र सार्वभौम राज्य नष्ट झाले. १८०३ ला यशवंतरावांनी सुरु केलेला भारतभुमीच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा अशा रितीने श्रांत झाला. विश्वासघातकी, देशद्रोही, निमकहराम मित्रद्रोही मात्र पारतंत्र्यातील सुखासीन जीवन जगायला सोकावत गेले. भारतभुमीवर पारतंत्र्याचा अंध:कार पसरला.....

    फक्त भिमाबाईच्या रुपाने एक ठिणगी अजुनही जिवित होती...

1 comment:

  1. Pendhari helped and betrayed !! Till now backstabbing crooks are everywhere , I think its a gift in the form of curse which will live forever with Indians.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...