Friday, November 13, 2015

टिपू सुलतानाबद्दल





टिपू सुलतानाबद्दल इतिहासातून जे दिसते ते असे:

१) १७८० मद्ध्ये पोल्लिलुरच्या युद्धात टिपूने इस्ट ईंडिया कंपनीच्या कर्नल बेलीचा निर्णायक पराभव करून युद्धात जवळपास २०० इंग्रज तर २८०० नेटिव्ह सैनिक ठार मारले. हा पराभव एवढा भिषण होता की बेलीला मदत करायला निघालेल्या सर मन्रोला आपला तोफखाना आहे तिथेच सोडून मद्रासला परत फिरावे लागले.

२) डिसेंबर १७८१ मद्ध्ये त्याने ब्रिटिशांकडून कित्तूर जिंकुन घेतले.

२) १७८२ मद्ध्ये कर्नल ब्रेथवेटचा तंजावरजवळ पराभव केला. टिपुने त्यांच्या सा-या तोफा ताब्यात घेतल्या व जिवित सर्व सैनिक व अधिका-यांना कैद केले. हा इंग्रजांचा भिषण पराभव मानला जातो.

४) ६ डिसेंबर १७८२ ला त्याचे वडिल हैदर अली वारले. टिपू हा म्हैसुरच्या गादीवर आरुढ झाला. यानंतर त्याने इंग्रजांना रोखण्यासाठे मराठे व मोगलांशी आघाडी बांधायचा प्रयत्न सुरु केला.

५) १७८३ मद्ध्ये इंग्रजांनी कोईमतूर जिंकून घेतले तर टिपुने त्यांच्यापासुन मंगलोर जिंकून घेतले. या दिर्घकाळ चाललेल्या युद्धात कोणाच्याही पदरी फारसे पडले नसले तरी मंगलोर तह झाल्याने टिपुची सरशी झाल्याचे मानले गेले व त्याचे महत्वही वाढले. या तहाने इस्ट इंडिया कंपनीचे दिवाळे वाजेल या भितीने या कंपनीचे शेयर्स लंडनमद्ध्ये कोसळले. या मंगलोर स्वारीनंतर टिपुने या भागातील सुमारे साठ हजार सिरियन ख्रिश्चनांना मुस्लिम बनवले असे ब्रिटिश रेकार्ड सांगते.

६) तंजावरच्या युद्धात टिपू व हैदर अलीने त्या प्रदेशात अनन्वित अत्याचार केले असे ब्रिटिश नोंदवतात. या दोघंनी तो प्रदेश दरिद्री करून सोडला. अर्थव्यवस्था कोसळवली. कल्लान (अथवा कल्लार) या जमातीच्या लोकांनीही याच काळात स्थितीचा फायदा घेत या भागात खूप लुट केली होती हे मात्र सहसा सांगितले जात नाही.

७) हैदर अलीने सुरू केलेली सार्वजनिक बांधकमे (उदा. लालबाग) टिपुने पुर्ण करत अनेक रस्ते, नव्या वसाहती व सार्वजनिक इमारतींचे बांधकम हती घेतले. व्यापार वाढीसाठी प्रयत्न करत कर्नाटकाला एक औद्योगिक राज्य म्हनून उभे करायचे प्रयत्न सुरू केले. श्रीलंका, ओमान, फ्रांस ते इराणपर्यंत व्यापार पसरवला.

८) तो रोकेट तंत्रज्ञानाचा जनक तर मानला जातोच पण अनेक यांत्रिक क्लुप्त्या असलेल्या वस्तू त्यांने बनवून घेतल्या. त्यात ब्रिटिशावर आरुढ झालेला यांत्रिक संगीत-वाघही आहे. व्यवस्थापन, शेतसारा वगरेतही त्याने सुधारणा घडवल्या व म्हैसूर रेशीम उद्योग भरभराटीला आणला.

९) मराठे आणि हैदर अलीमद्ध्ये १७६७ पासून संघर्ष होताच. मराठ्यांनी त्याचा पराभवही केला होता. हैदर अलीला "नबाब" ही पदवी माधवराव पेशव्यानेच दिली होती. पण पुणे-म्हैसुरमधील करार उभयक्षी पाळला गेला नाही. टिपुने मराठ्यांचे दक्षीणेकडील किल्ले ताब्यात घेतले. याचा परिणाम म्हणून त्याच्यावर मराठ्यांची स्वारी झाली व तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत १७८६ मद्ध्ये मराठ्यांच्य ताब्यात गेला. त्यांच्यत मग पुन्हा करार होऊन मराठ्यांना त्यांच्या पुर्वी ताब्यात असलेला प्रदेश देवून खंडनीही देण्याचे टिपुने मान्य केले.

१०) मोगल दरबार आणि निजामाशी त्याने आधी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण १७८८ मद्ध्ये बादशहाला आंधळे केले गेल्याने तोच दुर्बळ झाला, मराठ्यांकडुनही त्याला धोका दिसू लागला. इंग्रज त्याच्याविरुद्ध नव्या आघाड्या उघडायच्या प्रयत्नांत होतेच. निजामाशी त्याचे संबंध कधी चांगले तर कधी वाईट असे तळ्यात-मळ्यात राहिले. त्यानंतर त्याने झमानशहा दुर्रानी या अफगानी शासकाशी ब्रिटिश व मराठ्यांविरुद्ध मदत मागणारी पत्रे पाठवायला सुरुवात केली. पण दुर्रानी स्वत:च पर्शियनांशी संघर्षात गुंतला असल्याने त्याला मदत केली नाही. इस्तंबूल येथे वकिलात स्थापन करुन ओटोमन सुलतानला त्याने इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सैनिकी तुकड्या पाठवायची विनंती केली. पण रशियाविरुद्धच्या युद्धात खुद्द ओटोमन साम्राज्यालाच ब्रिटिशांची गरज असल्याने तेथुनही त्याला मदत झाली नाही.

१०) १७८९ मद्ध्ये टिपुने मलबारवर स्वारी केली. पण त्रावणकोरने कडवा प्रतिकार केला. पुरांनीही टिपुला अडचणीत आणले. त्यात त्रावणकोरच्या राजाने इंग्रजांचे मदत मागितल्याने इंग्रजांनी श्रीरंगपटनमवर स्वारी केली. टिपू श्रीरंगपटनमच्या दिशेने रवाना झाला. पण मलबारमद्ध्ये मुळात टिपुला निर्णायक विजय मिळाल्याचे दिसत नाही. तरीही त्याने या स्वारीच्या काळात त्याने मलबारी प्रजेवर अनन्वित अत्याचार केल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. नायर या लढवैय्या जमातीवर विशेष करुन जास्त अत्याचार झाले. किमान चार लाख हिंदूंना मुस्लिम बनवल्याची माहिती स्वत: टिपुच आपल्या १९ जानेवारी १७९० च्या पत्रात देतो. येथेच तिसरे Anglo-Mysore युद्धाची सुरुवात झाली. लोर्ड कार्नवालिसने निजाम व माराठ्यांसोबत टिपुविरुद्ध आघाडी उघडली. १७९० मद्ध्ये कोईमतुर पर्यंत आघाडीने ताबा मिळवत आणला. १७९१ मद्ध्ये बंगलोरही त्यंच्या ताब्यात गेले व श्रीरंगपटनमच्या दिशेने प्रस्थान ठेवले. टिपुने या सर्व बाजुने घेरल्या गेलेल्या आघाड्यांपासून प्रतिकार करण्यासाठी दग्दभू धोरण स्विकारले. या धोरणामुळे कार्नवालिसने संत्रस्त होऊन बेंगलोरचा ताबा सोडला. पण मराठ्यांचे अन्यत्र हल्ले चालुच होते.

याच काळात (१७९१) परशुराम भाऊने म्हैसुर लुटत शृंगेरी मठावरही हल्ला चढवला. मठाची संपत्ती लुटली आणि आदि शंकराचार्यांच्या मंदिरालाही क्षती पोचवली. टिपुची शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांना पाठवलेली कन्नड भाषेतील ३० पत्रे उपलब्ध आहेत. त्याने दिलेल्या देणग्यांचाही तपशिल उपलब्ध आहे.

या युद्धात पराभव दिसू लागताच टिपुने तहाच्या वाटाघाटी सुरु केल्या. अर्धे राज्य सोडून देण्याच्या व तीन कोटी रुपयांच्या खंडणीच्या अटीवर हा तह झाला. खंडणे जोवर देत नाहे तोवर आपले दोन मुलगे ओलीस म्हणून ठेवायलाही तो तयार झाला. पुढे त्याने दोन हप्त्यात ही रक्कम भरली व आपल्या मुलांना सोडवले.

११) शेवटी टिपुने १७९४ पासून फ्रेंचांशी संधान बांधायला सुरुवात केली. इंग्रज हे त्यांचेही शत्रू होते. त्यामुळे ही युती झाली तरच इंग्रजांशी लढता येईल असा त्याचा कयास असावा. नेपोलियन (तेंव्हा हा सम्राट बनला नव्हता) पण त्यानेही टिपुला १७९८ मद्ध्ये पत्र पाठवले व दोघांचा एकच शत्रु असल्याने आघाडी करायला मान्यता दिली. त्याने इंग्रजांशी लढायलाही, इजिप्त मोहिम संपल्यावर १५००० चे सैन्य टिपुला मदत करायला पाठवण्याचे ठरवले. पण हे पत्र मस्कत येथेच ब्रिटिश हेराच्या हाती लागले. ते टिपुपर्यंत पोहोचले नसले तरी नेपोलियन आणि टिपुमधील संभाव्य मैत्रीचा धोका दिसल्याने ते जास्तच काळजीत पडले व त्यांनी टिपुविरुद्ध आजवरची सर्वात मोठी मोहिम हाती घेतली.

१२) १७९९ मध्ये आर्थर वेलस्ली सहित तीन इंग्रज सेनाधिक-यांनी २६०००, निजामाचे १६,००० आणि मराठ्यांचे ७-८००० सैन्य श्रीरंगपटनवर चालून गेले. या युद्धात टिपुचा अंत झाला.

१३) टिपुने ७०० अय्यंगारांना दिवाळीच्या दिवशी निर्दयतेने मारले असे मानले जाते. मांद्यन अय्यंगार आजही दिवाळी त्यामुळे साजरी करत नाहेत असे म्हणतात. खरे तर इतिहासात कोठेही ही घटना अथवा तिची तारिख अथवा वर्ष नोंदले गेलेले नाही. डा. एम ए जयश्री व डा. एम ए नरसिंहन यांनी अलीकडेच एक पेपर प्रसिद्ध करून या दंतकथेवर, ज्याला इतिहासात कोठेही स्थान मिळालेले नाही, प्रकाश टाकला तेंव्हा टिपुवरील या आरोपाने उचल खाल्ली. या पेपरमध्ये उभय संशोधकांनी म्हटले आहे कि हे अय्यंगार म्हैसुरचे प्रधान तिरुमलैंगार यांचे नातेसंबंधी होते. हे घटना काल्पनिक नसून सत्य आहे. म्हैसुरची राणी लक्ष्मीअम्मा हिने आपले राज्य परत मिळवण्यासाठी हैदर अलीशी संघर्ष सुरु ठेवला. त्यासाठी १७६० मद्ध्ये तिने इंग्रजांशी संधान बांधायला सुरुवात केली. त्यात वोडेयार राजांचा माजी प्रधान तिरुमलैंगार (याचे नांव इतिहासात कोठेही येत नाही. हैदर अलीशी संघर्ष खंडेरावाने केला! त्याचा पराभव केल्यानंतरच हैदर अली शासक बनला!) याने तिला मदत केली म्हणून हे अय्यंगारांचे हत्याकांड टिपुने केले असे लेखकद्वय म्हणते. याबाबत इतिहासात कसलाही पुरावा नाही, हे प्रकरण दडवले गेले असाही आरोप आहे. आपण तरीही घटकाभर हे प्रकरण खरे मानुन चालू.

टिपुचा जन्म १७५० सालचा. वरील घटना १७६० किंवा ६१ ची. म्हणजे ही घटना घडली तेंव्हा टिपू १०-११ वर्षांचा होता. हे हत्याकांड त्याने कसे केले? शिवाय याच वर्षी हैदर अली स्वत:च्या अस्तित्वासाठी वोडियारांशी लढाया करत होता. वोडियारांचा सेनापती खंडेरावाचा पराभव केल्यानंतर हैदर अलीने म्हैसुरवर आपली सत्ता कायम केली व सर्वच विरोधकांना, त्यात खंडेराव व राजघराण्यातील लोकही आले, कैदेत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले.
अय्यंगार हत्याकांडाची घटना इतिहासात अथवा कोणत्याही साधनात नोंदली गेलेली नसून एका दंतकथेला काल्पनिक आवरणे चढवत का पेश करावे यावर वाचकांनीच वरील सर्व घटनाक्रमावरुन विचार करायचा आहे व टिपुचे मुल्यमापन करायचे आहे.

मराठी विश्वकोश टिपुचे मुल्यमापन करतांना म्हणतो, "काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता; परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे." इंग्रजांनी त्यांचे जेही शत्रू होते त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली नाही. आणि त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविक आहे.

शासकाचा धर्म, त्याचे शत्रू आणि राज्यविस्ताराची धोरणे पाहुन तत्कालीन राजांचा विचार करावा लागतो. अन्यायाच्या व लुटालुटीच्या बाबतीत कोणी मागे नव्हते. धर्मांतराचा इतिहास खूप जुना आहे. तसाच सौहार्दाचाही इतिहास आहेच. शुजाने पानिपत युद्धानंतर स्वत: खंडण्या भरुन असंख्य हिंदू सैनिक व सरदार कैद्यांना सोडवले होते. अशी सौहार्दाची असंख्य उदाहरणे देता येतील. निजाम मुस्लिम असुनहे हातात हात घालून टिपुवर चालून जातच होता, ते सत्तेपायी. टिपुने सरसकट हिंदूंवर अत्याचार केलेले नाहीत. तशा नोंदी उपलब्ध नाहीत. ब्रिटिशांशी त्याचा संघर्ष सत्तेत ते स्पर्धक झाल्याने होता. त्यामुळे तो स्वातंत्र्य लढा होता असे काही म्हणतात तेही चुकीचे आहे. तो एक चांगला, प्रशासनावर पकड असलेल्या, काही प्रमानात सुधारणावाद जपणारा महत्वाकांक्षी योद्धा राजा होता एवढेच!

खरे तर शासनाने कोणत्याही विगतातील राजा-महाराजांच्या जयंत्या सरकारी पातळीवर साज-या करू नयेत. एका राज्याचा हिरो दुस-या राज्यांचा खलनायक असण्याचीच शक्यता अधिक. लोकांना त्यांनी कोणाचे उत्सव साजरे करायचेत याचे स्वातंत्र्य द्यावे. स्वत: त्यात पडू नये. टिपू मुस्लिम होता म्हणून हा वाद जास्त चिघळला हे तर वास्तवच अहे. धर्मांध शक्तींचे सध्याचे उमदळून येणेही तेवढेच विघातक आहे.


4 comments:

  1. टिपूच्या धार्मिक अत्याचारां सोबत मुद्दाम लक्षात घेण्याजोग्या काही गोष्टी :-
    (१) टिपूचे राज्य दक्षिण हिंदुस्थानात असून तत्कालीन देशातील सर्वात बलिष्ठ हिंदू सत्ता त्याच्या शेजारी होती. टिपूने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले म्हणून हि हिंदू सत्ता त्याविरोधात तातडीने चालून गेल्याचे कधीच दिसून येत नाही.
    (२) इंग्रज – निजामासोबत पेशव्यांनी जी टिपूवर पहिली स्वारी केली त्या स्वारीला पुणे दरबारातील बडा सरदार, महादजी शिंदेचा तीव्र विरोध होता. तसेच या मोहिमेत जर इंग्रज टिपूला समूळ उखडू पाहतील तर त्यांना रोखण्याविषयीचा गुप्त तह देखील निजाम – पेशव्यामध्ये झाला होता.
    (३) टिपूचे राज्य व जीवित्व ज्या स्वारीत गेले त्या मोहिमेत पेशवा आपले सैन्य पाठवण्यास नाखूषच होता. पुणे दरबारच्या काही सरदारांचा टिपूशी यावेळी गुप्त पत्रव्यवहार देखील चालला होता.
    सारांश, टिपू धर्माध होता यात शंकाच नाही. परंतु त्याची धर्मांधता अभ्यासताना तत्कालीन समकालीन हिंदू सत्तांशी असलेले त्याचे संबंध लक्षात घेऊनच त्या धर्मांधतेचे मूल्यमापन करावे लागेल.

    ReplyDelete
  2. Sanjay, you write: "धर्मांतरे मलबार मद्ध्ये केली गेली ती तेथील प्रबळ नायक जमातीची. त्याच्या दृष्टीने ते शत्रू राष्ट्र होते." So you approve forced conversions of people of enemy country? It seems that you are in favor of this idea.

    ReplyDelete
  3. TIPU NE NARGUND AANI JAMKHINDI LA JE AATYACHAR KELE TYACH ULLEKH NAHI. PLEASE READ SETU MADHAVRAO PAGDI( NOTED HISTORIAN) NOT A WIKIPEDIA HISTORIAN... .
    TIPU WAS RELIGIOUS BIGOT AND IT IS PROVED BEYOND DOUBT BY HE HIMSELF, SO NO QUESTION ABOUT HIS SECULAR CHARACTER..

    ReplyDelete
  4. टिपूच्या आधी मलिक अंबरने रॉकेट चा वापर केला होता असे तर्वेनो नावाचा प्रवासी लिहितो.
    संदर्भ..राजा शिवाजी
    ले मेहंदळे

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...