Thursday, March 17, 2016

राष्ट्रवाद

भारतात राष्ट्रवादाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यात भारतात सांस्कृतिक अथवा धर्मवादी राष्ट्रवाद कि घटनात्मक राष्ट्रवाद असा वाद जास्त चर्चेत राहिलेला आहे. र्त्यासठी आपण आधी या दोन राष्ट्रवादांची चर्चा करु.

सांस्कृतिक राष्ट्रवाद:

एक संस्कृती व त्या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व भुगोल व तीत राहणारी माणसे यांचे मिळून राष्ट्र अशी थोडक्यात ही संकल्पना आहे. यात हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) धर्माचे प्राबल्य मुळ केंद्रबिंदू असून हा राष्ट्रवाद हिंदुत्ववादी राष्ट्रवाद बनतो. यात अन्य धर्मियांना दुय्यम स्थान द्यावे असे गोळवलकरवादी विचार जसे आहेत तसे वेळोवेळी बदललेले सावरकरी विचारही आहेत. हे दुय्यम स्थान कायद्याने अथवा वर्तनातून द्यावे असे सूचन यात आहे. किंबहुना सांस्कृतिक राष्ट्रवादाची ती पुर्वअट आहे.
सांस्कृतिक एराजकारणातील मोठी खोट ही आहे कि जीही कोणती संस्कृती केंद्रबिंदू मानायची, मग ती वैदिक असो कि हिंदू, ती नेमकी कोणती? करण दोन्ही धर्मात कालौघात चढौतार आलेले आहेत...उत्थाने व अध:पतनेही झाली आहेत. कोणत्या काळातील संस्कृती अणि कोणती संस्कृती आदर्श मानायची?
बरे, भारत हा खंडप्राय देश आहे. येथे प्रत्येक प्रांतात स्वत:ची स्वतंत्र छाप असणारी संस्कृती आहे, भाषा आहे. तीची स्वतंत्र अनेक वैशिष्ट्येही आहेत. धर्मापुरते बोलायचे तर उत्तरेतील वैदिक धर्म दक्षीणेपेक्षा वेगळा तर हिंदू धर्मही वेगळा. मग कोणत्या प्रदेशातील, नेमक्या कोणत्या काळातील संस्कृती आदर्श मानत त्यावर आधारित "समरस" राष्ट्रवाद आणयचा?
कशी समरसता येईल?
बरे संस्कृती बदलत असते. प्रवाही असते. या प्रवाहीपणाचे भान सांस्कृतिक अथवा धार्मिक राष्ट्रवादात आहे काय? संस्कृती अथवा धर्म हे शब्द राष्ट्रवादाशी भाबडेपणे संलग्न करणे सोपे आहे व तशाच भाबड्यांनी "गौरवशाली संस्कृती" च्या नांवाखाली ती डोक्यावर घेणेही सोपे असते. पण त्यातील मुख्य समस्या ही आहे कि तिच्या अंमलबजावणीत लोकशाही हाच मुख्य अडथळा असतो. आपली लोकशाही असे राष्ट्रवाद मान्य करत नाही. त्यासाठी राष्ट्रघटनाच बदलणे अपरिहार्य ठरते. सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवादाचा हा एक अपरिहार्य भाग आहे. त्याखेरीज विशिष्ट संस्कृती, ती कोणती हे ठरवणार कोण हे माहित नाही, लादण्याची शक्यताच निर्माण होत नाही. सध्या शक्षणिक अभ्यासक्रमात कोणती संस्कृती घुसवायचे प्रयत्न होत आहेत हे पाहिले कि सांस्कृतिक वैदिककेंद्री राष्ट्रवाद हाच सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे असे ठळकपणे दिसते.

घटनात्मक राष्ट्रवाद:

आपली घटना इहवादी आहे. स्वातंत्र्य-समता-बंधुता या तत्वांना उदात्त मानणारी आहे. कोणताही धर्म मानणे अथवा न मानणे हे ती नागरिकांवर सोडुन देते व वर्तन मात्र घटनात्मक व कायद्यांच्या चौकटीतच असेल असे स्पष्ट करते. ती मानवी स्वातंत्र्य मानते त्याच वेळेस ते अनिर्बंध होणार नाही याचीही काळजी घेते. घटना प्रवाही असून कालसुसंगत असे आवश्यक बदलही ती लोकशाही पद्धतीने स्विकारते. अनेक दुरुस्त्या झाल्या आहेत. अनेक नवे कायदे बनले आहेत तर अनेक रद्दबातलही झालेले आहेत.
घटनेला मानवी चेहरा आहे, विशिष्ट संस्कृती अथवा धर्मलोलुपांचा लालसी चेहरा तिला नाही. ती इहवादी आहे. माणसाचे लौकिक जीवन सुखकर व्हावे हा तिचा उद्देश आहे, पारलौकिक नाही, व सरकार, प्रशासन, न्यायव्यवस्था ते सामान्य नागरिक त्यासाठी कटीबद्ध रहावेत अशी रास्त अपेक्षा त्यात आहे. जे नाहीत त्यांसाठी कायद्याचा आसुड आहे.
सांस्कृतिक राष्ट्रवाद हा पक्षपाती असणार हे उघड आहे. कोण संस्कृतीप्रमाने वागतो आणि कोण नाही हे कोण ठरवणार? उदाहरणार्थ गोमांस. वैदिक संस्कृतेत एके काळी ते त्याज्ज्य नव्हते. नंतर त्यांनी मांसभक्षणच (काही वैदिक समाज अपवाद) सोडून दिले. पण गोमांस खाणा-या अनेक हिंदू जाती/जमाती आजही आहेत. अन्य धर्मीयही आहेत. गोमांसावर बंदी आणने हा कोणता सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे? कोणत्या काळातील व कोठली आणि कोणाची संस्कृती याला प्रमाण मानली गेली? एखाद्या प्राण्याल, तो दुर्मिळ होत आहे हे लक्षात आले तर त्याच्या हत्येवर अणि त्याचे मांस खाण्यावर बंदी घालणे वेगळे आणि सांस्कृतिक कारणासाठी बंदी घालणे वेगळे.
हे एक उदाहरण झाले. अशी अनेक देता येतील. सांस्कृतिक राष्ट्रवाद तुम्हाला तुमचा धर्म - संस्कृती पाळू देत नाही तर जेही कोणी सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रणेते असतील त्यांचीच इच्छित संस्कृतीच पाळण्याची हुकुमशाही आणली जाते. नव्हे तिची चुणूक आम्ही पाहिलेलीच अहे...पाहत आहोत.
आम्हा नागरिकांना पुन्हा एकदा विचार करायला हवा...तो हा कि आम्ही आमचे राष्ट्र कसे घडवू इच्छितो. आम्हाला नेमका कोणता राष्ट्रवाद हवा आहे हे आम्हीच ठरवायचे आहे. आम्हाला परिवर्तनशील राहणारी इहवादी (सेक्क्युलर) घटनात्मक राष्ट्रवाद हवा कि माणसाच्या आशा-आकांक्षांचा बट्ट्याबोळ करत त्याला माथेफिरु बनवणारी सांस्कृतिक/धर्मवादी राष्ट्रवाद यावर सर्वांनीच गंभीरपणे आणि सातत्याने विचार करायला हवा.

5 comments:

  1. संस्कृती सुद्धा प्रवाही असू शकतेच कि, उदा एकत्र कुटुंबे लयाला गेलीत, हम दो हमारे दो असे चालू झालेले आहे, उलट मुस्लीम लोक हम दो हमारे दो ला सुरुंग लावत आहेत आणि त्यात संपूर्ण विश्व इस्लाममय करून टाकायची धार्मिक महत्वाकांक्षा आहे, अशावेळी घटना काय करते? आपली घटना हि बहुसंख्य हिंदूंच्या सद्सदविवेकबुद्धीचे फलित आहे त्याच्या उलट पाकिस्तानी राज्यपद्धती धर्मवादाचे फलित आहे म्हणून त्यांनी भारतावर हल्ले करावेत, देशात दंगली करून बोंब फोडावेत हे योग्य आहे का? हिंदू आणि वैदिक हे विचार तात्पुरता बाजूला ठेवला तर मुस्लिमेतर जनतेच्या अस्तित्वाचा जिथे प्रश्न तयार होतो तिथे घटनेची कलमे कितपत सर्वसामान्यांचे रक्षण करू शकतात? शेवटी घटनेच्या पडद्याआडून भारतमाता कि जय म्हणायला विरोध असणे म्हणजे इस्लामचा धार्मिक अजेंडा रेटायचे उद्योग आहेत, कारण इस्लाम धर्म सांगतो कि फक्त अल्लाह हाच देव आहे आई-वडील हे सुद्धा देव मानने पाप आहे. असो. संभाव्य धोके लक्षात घेतले पाहिजेत.

    ReplyDelete
  2. दोन्ही बाजूंची पडताळणी करणे येथे आवश्यक वाटते.
    मुसलमान हा धार्मिकतेच्या बाबतीत हिंदूंपेक्षा अधिक कट्टर आणि असहिष्णु आहे यात वादच नाही.
    प्रथम राष्ट्र कि धर्म? प्राधान्य कशाला?
    असा प्रश्न निर्माण केल्यास मुसलमानांचे उत्तर संतुलित असते.
    मात्र हिंदूंमध्ये राष्ट्राला प्रथम प्राधान्य आहे,
    अज्ञेयवादी आणि नास्तिक लोकांचा भरणा हा हिंदूंमध्येच जास्त आहे,ते चिकित्सक आहेत,पण बहुधा 99.99 टक्के मुसलमान आस्तिक असतात,ते बहुधा धार्मिकता सोडत नाहीत.आणि इथेच खरी गोची आहे.

    ReplyDelete
  3. कन्हैय्या किती उड्या मारतो आहे ते बघून डाव्या प्रभावाखाली आलेल्या तरुण वर्गाची काळजी वाटते
    कारण हे डावे लोकजेंव्हा आपलीच मते खरी करण्याच्या नादात राष्ट्रवादालाही मूठमाती देतात ,तेंव्हा आपल्या या लेखात ते कुठे बसतात ? उमर खालिद सारखे लोक काहीच चुकीचे वागले नाहीत असे म्हणणे सत्याशी प्रतारणा करणारे ठरेल
    अशी भाषा त्यांच्या प्रिय चीन आणि रशियात चालेल का ?
    काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रविरोधी घोषणा याबाबत इंडियाटुडे च्यानेलवरच्या राहुल कंवल ने कन्हैयाचे पितळ उघडे पाडले आहे मुस्लिम समाजात सुद्धा काही कट्टर आहेत आणि बोहरी जातीतले अतिशय सहिष्णू आहेत हेही सांगितले पाहिजे शिया अहमदिया तांबोळी कसर अशा जातीपण आहेत
    वैदिक आणि ब्राह्मण असतात तसेच शैव ब्राह्मण असतात का असा एक प्रश्न मनात येतो त्याचे उत्तर संजय सर देतील का ?
    आरएसेस पेक्षाही कन्हैय्यानेच काही गोष्टी ऐरणीवर आणल्या असे म्हटले पाहिजे !
    जगात भारत सोडून कोणीही सेक्युलर नसावे असे वाटते नेहरूंच्या हट्टापायी हा सेक्युलर नावाचा खेळ मांडला गेला समाज हा एकजिनसी नसतो त्यामुळे सेक्युलारीझाम कधीही यशस्वी होणार नाही सेक्युलारीझाम हे वांझोटे तत्वज्ञान आहे
    अवघ्या २०० वर्षाचा इतिहास असलेली आजची अमेरिका सेक्युलर नाही !
    आपल्या इतकाच पुरातन इतिहास असलेले चीन आणि इजिप्त सेक्युलर नाहीत
    आणि हो , महत्वाचे म्हणजे संजय सर आम्हाला सांगतील का कि भारतात हिंदू म्हणवणारे कोण गोमांस खातात ? कारण हि माहिती मलातरी नवीन आहे , सर प्लीज सांगा !

    ReplyDelete
  4. देव, धर्म आणि देश
    फडफडणारी तुमची बुजगावणी
    अक्कल हुशारीने रचलेत साफळे
    बोला माणूस चिरडला की नाही?

    ReplyDelete
  5. जयहिंद म्हणणे सूध्दा राष्ट्रप्रेमाचेच प्रतिक आहे .भारत माता असं संबोधण्याचा अट्टाहास चुकीचा . पण त्यामागची भुमिका आपण व्यवस्थित मांडली .

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...