Sunday, August 13, 2017

नोटबंदी अपयशी, अखेर शिक्कामोर्तब!

नोटबंदी अपयशी, अखेर शिक्कामोर्तब!

अर्थव्यवस्था अशी एक गोष्ट आहे जी आश्वासने, भूलथापा आणि घोषणाबाजीवर चालत नाही. तो विकास असो की अवनती असो, अर्थव्यवस्थेचे चित्र प्रत्यक्ष जीवनात थेट दिसून येते. कोणत्याही अर्थव्यवस्थेत चढ-उतार येऊ शकतात हे मान्य. पण ज्या वेळी काही घसरणी आपण काहीतरी तरी क्रांती करत आहोत या थाटात अपरिपक्व निर्णय अकारण घेतल्याने होत असतील तर मात्र देशवासीयांनी चिंता करायला पाहिजे. शेवटी या घसरणीचा थेट संबंध त्यांच्या अर्थ-जीवनाशी निगडित असतो. ही चिंता वाढण्याचे कारण दोन घटनांत आहे व ते आपण समजावून घेणे गरजेचे आहे.
रिझर्व्ह बँकेने यंदा भारत सरकारला केवळ ३१ हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. गेल्या वर्षी हाच लाभांश ६६ हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजे यंदाच्या लाभांशात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. खरे तर यंदा सरकारने ७५ हजार कोटी रुपयांचा लाभांश येईल अशा अपेक्षेने तरतूद केलेली होती. अपेक्षेपेक्षा खूप कमी लाभांश आल्याने केंद्र सरकारला आधीच कपात केलेल्या वित्तीय खर्चात अजून कपात करावी लागेल किंवा बाजारातून कर्ज उभे करावे लागेल. पुढे काय करायचे हे सरकार ठरवेलच; पण या क्षणी तरी वित्तीय तुटीत भरच पडली आहे. या लाभांश कपातीमुळे वित्तीय विश्लेषकही गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. कारण चलनबंदीच्या धाडसी निर्णयामुळे उलट रिझर्व्ह बँकेला अपेक्षेपेक्षा मोठा फायदा होईल अशीच अटकळ बांधली जात होती. नोटबंदी केली तेव्हाची अतिउत्साही अटकळ होती की किमान ३ लाख कोटी रुपयांचे काळे चलन बँकांत जमा होणार नाही व तेवढा अतिरिक्त लाभ रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच केंद्र सरकारचा होईल. ती अटकळ विफल होत असल्याचे नोटबंदीनंतरच्या लगोलग काही महिन्यांतच दिसू लागले असले तरी गेलाबाजार ४० ते ५० हजार कोटी रु. तरी काळा पैसा चलनातून बाहेर पडेल हाही अंदाज या लाभांशाने फोल ठरवला आहे. सरकारला गेल्या वर्षी मिळवला त्याच्याही निम्म्याहून कमी लाभांशावर आता समाधान मानावे लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेचा लाभांश एवढेच सांगतोय की नोटबंदीमुळे कसलेही काळे चलन उजेडात आले नसून सारा पैसा बिनबोभाट अर्थव्यवस्थेत परत आला आहे. म्हणजेच नव्या नोटा छापायचा अतिरिक्त १५ हजार कोटी रुपयांचा बोजा तर रिझर्व्ह बँकेवर पडलाच, पण या काळात बँकांना द्यावे लागलेले व्याज, चलन-वितरणासाठी आलेला खर्चही तिला सहन करावा लागला आहे. साहजिकच केंद्रीय बँकेसाठी हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला आहे. नोटबंदीच्या काळात बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात चलन जमा झाल्याने व नंतर त्या प्रमाणात कर्जवाटपही होणे शक्य न झाल्याने त्यांचेही आर्थिक आरोग्य कसे बिघडले हे त्यांच्या वार्षिक ताळेबंदांमध्ये झळकते आहेच. अजूनही जमा झालेल्या नोटांची मोजणी चालूच आहे असे रिझर्व्ह बँक सांगत असली, तरी त्यात विशेष तथ्य नसावे असे जे तज्ज्ञ म्हणतात ते खरेच वाटावे अशी परिस्थिती या लाभांशाने आणली आहे.
दुसरी घटना आहे ती विकासदराचे उद्दिष्ट गाठणे अवघड आहे, उलट झाली तर त्यात घटच होईल, अशा केंद्र सरकारनेच दिलेल्या कबुलीची. हे उद्दिष्ट का गाठता येणार नाही याची केंद्र सरकारने दिलेली कारणे अत्यंत वरकरणीची आणि खरे तर दिशाभूल करणारी आहेत. संकटात पडलेली शेती, जीएसटीच्या अंमलबजावणीतील विस्कळीतपणा, डॉलरच्या तुलनेत मजबूत होणारा रुपया इत्यादी कारणे सरकारने दिली आहेत. खरे तर गेली तीन वर्षे पावसाने चांगली साथ दिली आहे. औद्योगिक क्षेत्रात नुसताच विस्कळीतपणा आला नाही तर एक कोसळण झाली ती नोटबंदीमुळे. अर्थव्यवस्थेतील जवळपास ८६% चलन एका रात्रीत काढून घेण्याच्या अतिउत्साही घोषणेने अर्थव्यवस्थेला लकवा मारला नसला तरच नवल. नोटबंदीनंतर सहा-सात महिने उलटूनही नवे चलन पुरेशा प्रमाणात बदलून देता न आल्याने स्थिती बिकट होत गेली. कॅशलेस इंडिया, डिजिटल इंडियाचे ढोल बडवत लोकांना या स्थितीकडे भ्रम निर्माण करीत दुर्लक्ष तर करायला लावले; पण अर्थव्यवस्था अशा ढोलताशांवर चालत नाही, याचे भान सरकारला आलेले आहे असे अजूनही दिसत नाही.
सरकार आता नोटबंदीचे नाव घ्यायलाही तयार नसले तरी त्यामुळे शेतीसह सर्वच असंघटित क्षेत्रांना सर्वात मोठा फटका बसला. आधीच मंदीचा सामना करणाऱ्या मोठ्या ते लघु औद्योगिक क्षेत्राने मान तर टाकलीच; पण त्यामुळे रोजगार वृद्धी होणे तर दूरच, होता तो रोजगारही धोक्यात आला. सेवा क्षेत्रही मोडकळीला आले. म्हणजेच एका अर्थाने अर्थव्यवस्थेचा कारण नसताना गळा घोटला गेला. पण सरकार आपल्या भ्रामक दाव्यांपासून ढळलेले व आत्मपरीक्षण करते आहे असे पाहण्यात येत नाही. नोटबंदीपासून काही धडा घेण्याऐवजी जीएसटीचे प्रारूपही गोंधळयुक्त बनवले गेले. त्यामुळे सामान्य ग्राहक, व्यापारी ते उत्पादक आणि सरकारी कर्मचाऱ्यांमधील गोंधळ अजून संपायला तयार नाही. त्याचाही अतिरिक्त फटका विकलांग झालेल्या अर्थव्यवस्थेला बसतो आहे व त्यातून कसे बाहेर पडणार, हा यक्षप्रश्न काही केल्या सुटायला तयार नाही.
याचा झालेला अजून एक विपरीत परिणाम म्हणजे बँकांकडे कर्जाची मागणीच घटलेली आहे. याचाच अर्थ असा की नवीन उद्योगधंदे उभे राहत नाहीत. याचाच अर्थ असा की नजीकच्या काळात नवा रोजगार निर्माण होण्याचे प्रमाण कमी राहणार आहे, तर आहे तो रोजगार टिकवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. सध्या सरकारनेच कबुली दिल्याप्रमाणे अर्थव्यवस्थेत वृद्धीही होणे शक्य नाही. कारण उद्योगधंद्यांच्या वृद्धीसाठी जे विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागते ते करण्यात या सरकारला आपल्या मनमानी धोरणांमुळे अपयश आले आहे. पाऊस चांगला होऊनही शेतीच्या समस्या वाढल्यात कारण सरकारचे शेती व शेतमालाबद्दलचेही काही निश्चित धोरणच नाही. सरकार कशी अनागोंदी माजवू शकते हे तूरडाळ खरेदी प्रकरणात महाराष्ट्राने पाहिले आहे. सेबीसारख्या वित्तीय नियामक संस्थाही गोंधळात भर घालणारे नुकसानकारक निर्णय घेत अर्थव्यवस्थेचा विकास कोणत्याही मार्गाने होऊच द्यायचा नाही, असाच निर्धार केला आहे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. याची जबाबदारी संपूर्णपणे मोदी सरकारकडे जाते हेही लक्षात घ्यायला हवे. कारण मुळात या अनागोंदीची सुरुवात त्यांच्याच नोटबंदीपासून झाली.
रिझर्व्ह बँकेलाही जेव्हा मोदींच्या निर्णयाचा फटका बसतो तर सामान्य माणसावर याचे किती दूरगामी परिणाम झाले असतील याची कल्पना न केलेली बरी. विकासदरातील संभाव्य घट तर सरकारनेच कबूल केलीय व ती प्रत्यक्षात अधिकच असणार. रिझर्व्ह बँकेने अपेक्षेपेक्षा निम्म्याहून कमी लाभांश दिल्याने केंद्राच्या वित्तीय तुटीत अधिकची भर पडली आहे. सरकार पायाभूत योजनांवरील खर्चात अजून घट करेल असे चित्र आताच दिसते आहे. जवळपास सर्व चलन बँकांत जमा झाल्याने काळा पैसा व दहशतवादविरोधी पाऊल ही निव्वळ वल्गनाच ठरली. अर्थव्यवस्थेच्या गळ्याला असह्य असा गळफास मात्र बसला. आणि त्यापासून सुटका होण्याऐवजी हा फास जास्त आवळलाच जातो आहे हे आजचे विदारक चित्र आहे. रिझर्व्ह बँकेने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे!

निर्माण होतोय नि:ष्फळ संस्कृतीचा वारसा!Image result for agitations for reservations

भारतात गेली काही दशके आरक्षणकेंद्रित जी आंदोलने झाली आहेत ती कोणत्याही समाजाची असो, त्यामागे काही प्रमाणात राजकारण असले तरी शिक्षण व रोजगारीची समस्या सगळ्या आंदोलनांच्या मुळाशी आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही. मागील लेखात आपण शोषित समाजांचे शोषण का होते यावर विचार केला होता. सध्या आंदोलनांत जे समाज सामील झाले आहेत ते शोषित समाजांच्या व्याख्येत बसतीलच असे नाही. असे असले तरी त्या त्या जातीघटकात वाढत चाललेले दारिद्र्य हे एक वास्तव आहेच. भारतातील शेतकरी हे कोणत्या ना कोणत्या जातीघटकाचेच भाग असल्याने शेतक-यांचे दारिद्र्य हे अनेक जातीघटकांच्या दारिद्र्याचा विषय बनला आहे हे उघड आहे. त्याच बरोबर नव्या रोजगारांच्या संध्या निर्माण करण्यात आलेले धोरणात्मक अपयश आणि निर्माण होणा-या अल्प रोजगार संधीचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याचा अभाव यामुळेही दारिद्र्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. याचा आपल्याला साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

अर्थव्यवस्था व समाजसंस्कृती यांचे नाते निकटचे असते हे आपण पाहिले आहेच. आपल्या आर्थिक प्रेरणा आपली आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे निर्धारित करत असतात. या प्रेरणांना पुरेसे मोकळे अवकाश निर्माण करणे एवढेच शासनाचे काम असते. सरकारने रोजगार निर्मिती होईल असे सहाय्यभूत निर्णय घ्यावेत पण स्वत: अनुत्पादक रोजगार वाढवत अंतत: नागरिकांच्याच धनाचा व्यर्थ खर्च करू नये अन्यथा रोजगार तर वाढतील पण अर्थव्यवस्थाच गडगडेल हे उघड आहे. किंबहुना भारतातील सरकारने चालवलेले बव्हंशी उद्योग हे देय वेतनाच्या ओझ्याखाली चिरडले जात कसे तोट्यात जातात हे आपण एयर इंडियासारख्या अनेक सरकारी संस्थानांच्या उदाहरणातून पहातच आहोत. त्यापेक्षा सरकारने उद्योग चालवणे खाजगी क्षेत्रावर सोडून द्यावे, उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी जे कायद्यांचे अनावश्यक तांत्रिक अडथळे आहेत ते समूळ मोडून काढावेत आणि प्रत्येक नागरिक एक सक्षम व्यावसायिक अथवा कुशल कर्मचारी बनण्यासाठी कसा सज्ज होईल हे वातावरण निर्माण करावे अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. तसेही सरकार हे रोजगार निर्मितीचे साधन म्हणून जागतिकीकरणानंतर कुचकामी ठरलेले आहे. एवढेच नव्हे तर खाजगी उद्योगक्षेत्रातील रोजगार निर्मिती सरकारच्याच नोटबंदीसारख्या व व्यवसायपुरक नसलेल्या धोरणांनी पुरती घटवली आहे हे वास्तव सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवा-यांवरून सिद्ध होते.

आरक्षणात शैक्षणिक आरक्षण हा एक कळीचा मुद्दा असतो. राजकीय आरक्षण नको पण किमान शिक्षण व नोक-यांत आरक्षण द्या ही मागणी केली जाते. आपण या लेखमालिकेच्या सुरुवातीसच आपल्या शिक्षणव्यवस्थेच्या दुर्दशेची चर्चा करत जगातील शिक्षण पद्धतीच मुळापासून कशी बदलत आहे याचा मुलगामी विचार केला आहे. आपली आजची शिक्षण पद्धत विद्यार्थ्याला ज्ञानार्थी न बनवता कसलेहे कौशल्य नसलेले पोटार्थी बनवते हे एक वास्तव आहे त्यामुळे आपली विद्यालये बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने बनले आहेत हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. अशा परिस्थितीत जे विद्यार्थी आरक्षणामुळे म्हणा की मनमानी फी भरून शिकत आहेत ते नेमके काय आणि कशासाठी शिकत आहेत याचा तपास त्यांनातरी लागला आहे काय हा गंभीर प्रश्न उद्भवतो. शिक्षण पद्धतीच आमुलाग्र बदलत आम्हाला आमच्या नैसर्गिक गुणवत्तेला वाव देऊ शकणारे सक्षम शिक्षण द्या अशी मागणी कोणत्याही आंदोलक समाजघटकाने केली आहे असे चित्र आपल्याला दिसलेले नाही. त्यामुळे या महत्वाच्या बाबतीत जनरेटा निर्माण होण्याची शक्यता नाही हे उघड आहे.

येथे आरक्षण आवश्यक की अनावश्यक ही चर्चा अभिप्रेत नाही. पण सध्या जे समाजघटक आरक्षण उपभोगत आहेत व ज्यांना ते नाही अशा सर्व घटकांत निर्माण होत चाललेली नवी विषमता मात्र चिंताजनक आहे. ज्या समाजघटकांना आरक्षण आहे ते त्यांनी फक्त दोन पिढ्या भोगावे व नंतर मात्र अशा परिवाराला आरक्षण देऊ नये अथवा स्वेच्छेनेच लोकांनी सोडावे या मागणीसाठी मी पाठपुरावा केला होता. उपोषणही केले होते. याचे कारण म्हणजे वंचित समाजातील जे शिक्षित लोक आरक्षणाच्या प्रवाहात आधी सामील होतात ते नंतर पिढ्यानुपिढ्या ते आरक्षण भोगत आपल्याच समाजातील लोकांना मात्र अवकाशच ठेवत नाहीत हा विदारक अनुभव आपल्याला येतो. ज्यांना आरक्षण नाही त्या समाजांतही अंतर्गत विषमता आहे. काही धनाढ्यांकडे बोट दाखवत "यांना काय आरक्षणाची गरज?" असेही प्रश्न विचारले जातातच. सामाजिक न्याय, मागासपणा हे विषय ’नेमेची येतो मग पावसाळा’ या नात्याने चर्चीले जातातच. पण या चर्चा प्रश्नाच्या मूळ अंगाला स्पर्ष करतात असे नाही. किंबहुना बौद्धिक दारिद्र्याचा हा परिपाक असू शकेल. आणि हेच बौद्धिक दारिद्र्य आपल्याला आर्थिक दारिद्र्यात ढकलत आहे याचे मात्र भान येत नाही.

सर्व जातीघटकांत अंतर्गत आर्थिक व म्हणून सामाजिक विषमता आहे हे वास्तव लक्षात घ्यावे लागेल. शेतकरी हाच समग्र व्यवसाय घटक दिवसेंदिवस दरिद्री बनत चालल्यामुळे दारिद्र्याचे लोनही शेतीनिगडित सर्वच जातीघटकांत पसरत चालले आहे हेही वास्तव आहे. शेतीला केंद्रबिंदु मानत शेतीव्यवसायाने लाभाच्या दिशेने वाट चालावी अशी मुलात सरकारी धोरणेच नसून उलट त्यांना समाजवादी बंधनांच्या जोखडाखाली जखडलेले आहे. शेतीपुरक उद्योग-व्यवसायांत संधी असुनही शासनाने त्यासाठी पुरक प्रोत्साहक धोरणे व त्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी काहीही केले आहे असे दिसत नाही. शेतमालाच्या भावांत शेयरबाजारापेक्षा मोठ्या गटांगळ्या खाल्ल्या जातात पण असे नेमके का होते व ते न होण्यासाठी नेमके कोणते धोरणात्मक बदल करायला हवेत याचे भान शासनाला स्वातंत्र्यानंतरही सात दशके जाऊनही आलेले नाही व त्यासाठी कोणी मागण्याही केल्या नाहीत. तरीही आंदोलने नित्य नियमाने होत राहतात. फुटकळ आश्वासनांनंतर विझतात. पण समस्या आहे तेथेच राहते. आपल्याला नेमके काय मागायचे आहे याचे भान नसले की असे होते. मग समाज निव्वळ आश्वासनांवर जगत जातो आणि समस्या होत्या तेथेच राहतात. आज सर्वच समाज वंचित बनत चालले आहेत ते समाजांच्या उथळ मागणी-केंद्रित सवयींमुळे व राज्यकर्त्यांना असाच समाज हवा असतो, स्वतंत्र बुद्धीने आपल्या प्रेरणा ठरवत मार्ग निर्माण करणारा समाज नको असतो. विकलांग व सरकारावलंबी बुद्धीचा समाज त्यांना हवा असतो आणि समाजही बौद्धिक लकवा मारल्याप्रमाणे त्यांना जसे हवे तसे आपल्याला घडवू देतो. समाजवादी राजकारणाचे हे मुलतत्वच आहे पण ते आम्हाला समजत नाही. यात आमच्या अर्थप्रेरणा दुर्बळ होत जातात आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता मारली जाते. 

समस्यांची मुळे शोधली तर आता बव्हंशी जातीघटकांच्या समस्या या सर्वच भारतीय समाजाच्या समस्या आहेत हे लक्षात येईल. मग ते आरक्षित असोत की नसोत. प्रत्येक घटकाच्या समस्यांची तीव्रता कमी-अधिक असू शकते, पण सर्वच समाज समस्यांच्या समुद्रात गटांगळ्या खातो आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. आम्ही त्या ओळखत त्या सोदवण्यासाठी आम्हाला नेमके काय व कसे हवे अहे हेच ठरवत नाही तोवर अजुनही सर्वच समाजघटकांची लाखों आंदोलने झाली तरी त्या स्थितीत फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. आमच्या शैक्षणिक, आर्थिक व म्हणूनच राजाकीय उद्धाराची सुतराम शक्यता नाही. भारतीय राजकारण आहे असेच उथळ आणि बोलभांड राहिल. दारिद्र्याच्या खाईत सर्वच समाज वेगाने कोसळतच राहतील. यात प्रगती तेच करतील जे स्वतंत्र प्रेरणांनी संधी शोधतात वा निर्माण करतात. त्यात सरकारी धोरण कामाला येईलच याची खात्री तुम्हाला देता येणार नाही कारण मुळात त्याची दिशाच चुकलेली आहे. ती दिशा समाजच आपल्या प्रेरणांना स्वतंत्रपणे जागवत देऊ शकतो. पण आजचे चित्र तरी हे आहे कि समाजप्रेरणाच उथळ भावनिक लाटांवर स्वार झालेल्या आहेत. भविष्याकडे डोळे उघडून आताच नीट पाहिले नाही तर भविष्यातील पिढ्यांना आम्ही निष्फळच होतील अशा हेतूने केलेल्या वांझ प्रयत्नांखेरीज कसलाही वारसा देऊ शकणार नाही. मग सांस्कृतिक उत्थान ते काय होणार?

(Published in Daily Sanchar, Indradhanu supplement)

Saturday, August 5, 2017

शोषित समाजांचे शोषण का होते?


Image result for dhangar poverty herdsसुख-दु:खे प्रत्येकालाच असतात. किंबहुना मानवी जीवनाचा तो अविभाज्ज्य हिस्सा आहे. माणूस जसा प्रगल्भ होत जातो तशा सुखदु:खाच्या व्याख्या मात्र बदलत जातात. काल ज्याचे दु:ख वाटत होते त्याचे आता दु:ख वाटत नाही. सुख-दु:ख हे शेवटी मानवी भावना व विचारांशी जोडले गेले असल्याने व्यक्तीनिहाय त्याच्या वेगळ्या व्याख्या असणे, प्रगल्भतेबरोबर त्या बदलत जाणे स्वाभाविक आहे. समाज व राष्ट्रांनाही हे लागू पडते कारण समाज हा व्यक्तींमुळेच बनतो. सामुहिक भावना व सामुहिक विचारांचे अस्तित्व हे सदासर्वकाळ असते. त्यामुळे माणसांत आपसूक विविध गटही पडत जातात व विविध गटांतील संघर्षही अविरत सुरु राहतो. हा संघर्ष जोवर विचारउन्नतीला सहाय्य करतो तोवर तो मानव जातीला उपकारक आहे असे म्हणता येते. पण अनेकदा हा संघर्ष द्वेष व हिंसेच्या दिशेने जाऊ लागतो आणि आपलेच खरे, पुरातन आणि श्रेय:स्कर या समजुतीच्या अट्टाहासातून सामाजिक, राष्ट्रीय व अनेकदा जागतिक शांतताही निखळून पडते हे आपण जगाच्या इतिहासावर नुसती नजर फिरवली तरी लक्षात येते.

या भावनांच्या खेळात अनेकदा मानवी मुल्यांचे खरे प्रश्न बाजूला पडतात. आपण येथे भारतातील शोषित वंचित समाजांचे उदाहरण घेतले तर हे लक्षात येईल की प्रत्येक विचारगट वरकरणी या समाजांबाबत सहानुभुती बाळगत असल्याचे दाखवतो. तो समाजवादी असेल, साम्यवादी असेल किंवा धर्मवादी. किंबहुना शोषित हा शोषितच नसून त्याच्या गतजन्माच्या पापांचे फळ आहे या मान्यतेचा प्रभाव धर्मवाद्यांच्या मस्तकातून अजुनही गेलेला नाही, भले ते वरकरणी काहीही म्हणत असोत. समाजवादी व साम्यवादी तर शोषितांचेच प्रतिनिधी असल्यासारखे वारंवार त्यांच्या बाबतच बोलत असतात, लिहित असतात व चर्चासत्रे घडवून आणत असतात. सत्तेत आले तरीही ही भाषणबाजी थांबत नाही. शोषित-वंचित समाजांसाठी असंख्य योजना जाहीर होतात, लक्षावधी कोटी रुपये खर्च केल्याचे दाखले व पुरावे दिले जातात. पण वास्तव हे आहे कि शोषितांचे शोषितपण थांबल्याचे चित्र मात्र आपल्याला दिसून येत नाही. उलट शोषितांच्या शोषणाचे नवनवे मार्ग शोधले जातात. समाजवादी या तत्वाला अपवाद नाहीत. किंबहुना शोषित वंचित हेच त्यांचे सत्तेत येण्याचे मुख्य भांडवल असल्याने शोषिताला थोडी मदत केल्याचे अवसान आणत त्यांना शोषितच ठेवण्याचे कट आखले जातात. व्यक्तीला आपल्या मगदुराने सुखदु:खाची व्याख्या करता येण्याऐवजी त्यांच्या सुखदु:खाचे एक मोठे कारण बनण्याचा प्रयत्न राजसत्ता व अर्थसत्ता करत जाते, कारण दु:खाचीच बाब तीव्र राहण्यात त्यांचे स्वार्थ अडकलेले असतात. शोषित वंचित मात्र भावनिक होत अनिवार आशेने कोणाचा तरी स्वीकार करतात वा कोणाच्या तरी विरुद्ध होतात.

यासाठी अगदी सोपी क्लुप्ती जगभर वापरली गेली आहे. धर्मवादी व वंशवादी दुस-या धर्माला अथवा वंशाला शत्रू घोषित करत, त्याचे काल्पनिक भय निर्माण करत आपल्या धर्मात एकजुट निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. कधी जातीही याच अजातीय कार्यासाठी वापरल्या जातात. समाजवादी/साम्यवादी भांडवलदारांना क्रमांक एकचा शत्रू घोषित करतात व श्रमिक मजदुरांची  एकजुट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे कोणतातरी खरा खोटा शत्रू अस्तित्वात असल्याखेरीज या गटांचे अस्तित्वच रहात नाही. पण यामुळे शोषण थांबलेले नसते.भांडवलशाहीला विरोध करणारे राष्ट्राची मक्तेदारीयुक्त भांडवलशाही मानत असतात. नेमके हे लोकांच्या लक्षात येवू दिले जात नाही. किंबहुना व्यक्तीचे स्वातंत्र्य अधिकाधिक संकोच कसे पावेल हेच राजसत्ता व अर्थसत्ता पहात असतात. स्पर्धेचे आवाहन ते करतात पण त्यांना स्पर्धाच संपवायची असते. शोषित वंचित घटक स्वप्रेरणेने व स्वसामर्थ्याने शोषिततेच्या, वंचिततेच्या बाहेर पडावेत यासाठी मात्र कसलाही कार्यक्रम त्यांच्याकडे नसतो. सुखदु:खे एकाच परिघात येवून साचतात आणि त्यात प्रवाहीपणा येण्याची शक्यताच पुरती मावळून जाते. भारतातील शोषित जाती जमातींच्या आजही असलेल्या दुखण्यांचे नेमके हेच कारण आहे आणि ते सांगणे अंगलट येणारे असल्याने या विचारधारांचे समर्थक मूग गिळून गप्प बसनार हे उघड आहे.

भटक्या विमूक्त समाजाचा अभ्यास करून त्यांच्या भल्यासाठी उपाययोजना सुचवायला सरकारने रेणके आयोग नेमला होता हे सर्वांच्या लक्षात असेलच. या आयोगाचा अहवाल अनेक वर्ष अभ्यास केल्याचे दाखवुनही अनेक त्रुटींनी भरलेला असल्याने तो अहवाल फेटाळला जाणार हे स्पष्टच होते. भाजप सरकार आल्यानंतर पुन्हा नव्याने इदाते आयोग नेमला गेला. त्यालाहीआता अडिच वर्षांच्या वर कालखंड उलटून गेला आहे व हा आयोग करतो तरी काय आहे हे कोणाला माहित नाही. म्हणजे आयोगाचे गाजर दाखवत एक दशक घालवले गेले आणि भटक्याविमुक्तांची स्थिती मात्र तीळमात्र बदललेली नाही. मुळात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यासाठी आयोगाची गरजच नाही. धोरण ठरवण्याची गरज आहे व त्यासाठी आवश्यक असलेला डाटा सरकारकडे आहेच. आपापल्या मागण्या भटक्या-विमूक्त समाजातील विचारवंत ते नेत्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेतच. शिक्षण, आरोग्य, आर्थिक उन्नतीसाठी नवीव्यावसायिक कौशल्ये देणारी विशेष व्यवस्था, वित्तसहाय्य आणि सामाजिक जीवनात त्यांना देण्यात येणारी वागणूक बदलण्यासाठी न्याय्य व्यवस्था या काही बाबी ठोसपणे प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला आयोगाची काय गरज आहे? आरक्षणविषयकचे प्रश्न सोडवायची इच्छा नसली समजा तरी अन्य प्रश्नांना हात का घालता येत नाही? त्यांच्यात स्वतंत्र अर्थप्रेरणा, समाजप्रेरणा निर्माण करण्यासाठी जे खुले वातावरण हवे ते का निर्माण केले जात नाही? किंबहुना अर्थसशक्त समाज निर्माण व्हावेत यासाठी नव्या दिशा दाखवण्यासाठी सरकार असो कि त्यांच्याबद्दल वरकरणी का होईना सहानुभुती बाळगणारे का पुढे येत नाही? आजही त्यांचे व्यवस्थाच शोषण करत असेल तर ती जबाबदारी सरकारांची व त्यांच्या विचारधारांची नाही काय?

आर्थिक प्रगती करण्यासाठी अनुकूल वातावरण व धोरण नसले की अर्थवंचितता येते आणि सामाजिक वंचिततेला खुले रान मिळते हे आपण समजावून घ्यायला हवे. हीच बाब भारतातील बव्हंशी समाजांना लागू आहे. शेतक-यांना लागू आहे. आज जर मुळची सशक्त ग्रामीण संस्कृती लयाला जात आत्महत्यांची संस्कृती उदयाला येत असेल तर मग भारताने राबवलेल्या अर्थ विचारधारांवरच संशय घेणे क्रमप्राप्त आहे. आम्ही कोठवर त्याच त्या नाडणा-या, वंचिततेला सहाय्य करणा-या विचारांना कवटाळुन बसत एकाच डबक्यात कुंठत राहणार आहोत?

आमची आजची व्यवस्था वंचितांचे वंचितत्व दूर करण्यासाठी नसून वंचितता जोपासण्यासाठी आहे हे आम्हीच नागरीक जोवर समजावून घेत नाही तोवर आमचे भवितव्य डबक्यातचराहणार. आमची सुख-दु:खे त्या मर्यादितच वर्तुळात फिरत राहणार कारण आम्हाला स्वातंत्र्याचे खुले अवकाश उपलब्धच नाही. ते आम्हालाच आमच्या विचारांच्या दिशा बदलत मिळवावे लागेल हे पक्के समजून असा! 

Sunday, July 30, 2017

चिनी ड्रॅगनला ट्रम्प यांचा धक्का?


चिनी ड्रॅगनला ट्रम्प यांचा धक्का?


सत्तेत आल्यापासून प्रथमच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारताचा समावेश आण्विक पुरवठा गटात (एनएसजी) करून घ्यावा यासाठी स्वत: तर पाठिंबा दिलाच आहे; पण अन्य देशांनीही भारताच्या प्रस्तावाचे समर्थन करावे, असे आवाहन केले आहे. भारताच्या या महत्त्वाच्या गटात शिरकाव होण्यात सर्वात मोठा अडथळा चीनचा आहे. या गटाचे सर्वच्या सर्व म्हणजे ४८ सदस्य देश अशा सहभागास एकमुखाने मान्यता देत नाहीत तोवर हा प्रवेश अशक्यच आहे. या गटाचे सदस्य बनल्यावर भारत आंतरराष्ट्रीय आण्विक व्यापाराच्या मोजक्या नियंत्रक देशांमध्ये मोडेल. भारत आणि चीन एकीकडे डोकलाम पठारावर एकमेकांविरुद्ध उभे असताना ट्रम्प प्रशासनाकडून हे ठोस आश्वासन व अन्य सदस्यांना आवाहन यावे याला निव्वळ योगायोग म्हणता येत नाही. या पाठिंब्याला अजून एक पार्श्वभूमी आहे, ती म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन हे लवकरच बीजिंगला भेट देत आहेत. या भेटीचा उद्देश चीनचा भारतविरोध मावळण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणूनही पाहण्यात येत आहे. ओबामा प्रशासनाची काही धोरणे ट्रम्प यांनी बासनात गुंडाळली असल्याने भारताच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाबाबत ट्रम्प काय भूमिका घेतील ही शंका होती. पण ट्रम्प यांनी तो पाठिंबा नुसता जिवंतच ठेवलेला नाही, तर अन्य सदस्य राष्ट्रांनाही आवाहन करून अमेरिका भारताच्या सदस्यत्वासाठी उत्सुक असल्याचे दाखवून दिले आहे. डोकलाम तणावाच्या पार्श्वभूमीवरील हा पाठिंबा सूचक आहे हे उघड आहे.
एनएसजीचे सदस्य होण्याचे भारताला अनेकविध फायदे आहेत. एनएसजीचे सदस्य झाल्यानंतर भारताला एनएसजीच्या सदस्य देशांकडून आधुनिक आण्विक तंत्रज्ञान मिळवणे सोपे जाईल. सध्या फक्त समृद्ध युरेनियमसाठी अमेरिकेवर अवलंबून असलेल्या भारताला कोठूनही, अगदी नामिबियासारख्या देशातूनही आण्विक इंधन आयात करता येईल. अणुऊर्जेसाठी लागणारी सामग्रीही भारताला उत्पादित करता येईल तसेच भारतातील आण्विक ऊर्जेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढण्यास हातभार लागेल. याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईलच, पण निर्यातीतही वाढ करता येईल. विशेष म्हणजे पाकिस्ताननेही एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दिला आहे. भारत सदस्य झाल्यावर अशा दहशतवाद समर्थक राष्ट्रांच्या एनएसजीमधील प्रवेशाला विरोध करू शकेल. आज भारतात आण्विक ऊर्जेला विरोध करणारे काही घटक प्रबळ असले तरी भारताची ऊर्जेची भविष्यातील मागणी पूर्ण करायला इतर अपारंपरिक साधनांबरोबरच आण्विक ऊर्जेचीही कास धरावीच लागणार आहे. याही दृष्टीने भारताचे एनएसजीमधील सदस्यत्व महत्त्वाचे आहे.
एनएसजीमधील भारताच्या सदस्यत्वाचे प्रयत्न माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुश प्रशासनाच्या कार्यकाळातच सुरू केले होते. अमेरिकेसोबतच्या अणुकराराबाबत मुत्सद्दी डॉ. मनमोहनसिंग यांनी आपले सरकारही पणाला लावले होते. त्या वेळी डावे आणि आज एनएसजीमधील सहभागासाठी आटापिटा करणाऱ्या भाजपने या कराराविरुद्ध मोठा गदारोळ केला होता. सरकारात आल्यानंतर मात्र देशाची म्हणून काही धोरणे असतात, त्यांना मुरड घालता येत नाही हे विद्यमान भाजप सरकार व ट्रम्प प्रशासनाने दाखवून दिले. अमेरिकेबरोबर झालेल्या अणुकरारामुळेच भारताच्या एनएसजीमधील समावेशाच्या आशा वाढल्या हे अमान्य करता येत नाही.
यातील मुख्य अडथळा उरला आहे व तो म्हणजे चीन. चीनचा वरकरणी विरोध आहे तो भारताने आण्विक अप्रसार करारावर (एनपीटी) सही केलेली नाही त्यामुळे भारत सदस्य बनण्यास अपात्र आहे या कारणामुळे. तसा विरोध अन्य काही सदस्यांचाही होताच, पण भारताने या करारावर सही करण्याचे प्रथमपासून टाळले. कारण अशा करारावर सही करणे भारतासाठी आत्मघातकी ठरले असते. एनपीटी करारानुसार १९७० पूर्वी ज्या देशांनी अणुचाचणी केली आहे तेच देश अण्वस्त्रसज्ज देश म्हणून ओळखले जातील व अन्य सदस्यांना अण्वस्त्रसज्ज राष्ट्राचा दर्जा गमवावा लागेल. चीन भारताची याबाबत स्पष्ट भूमिका आहे ती अशी की, एकतर सर्वच राष्ट्रांनी आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत, अन्यथा सर्वच सदस्य राष्ट्रांना अण्वस्त्रे ठेवण्याचा अधिकार असावा. चीन व पाकिस्तानसारखे अण्वस्त्रसज्ज आणि तेही शत्रू शेजारीच असताना भारताला अण्वस्त्रविरहित होणे परवडणारे नाही हे उघड आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका न्याय्य व समन्यायाची आहे व सार्वभौमता जपण्याची आहे. किंबहुना एनपीटी ही भेदभावाने भरलेली व वैश्विक निकडींची पर्वा न करणारी आहे अशी टीका सातत्याने भारताने केली आहे. अमेरिका व अन्य अनेक सदस्य राष्ट्रांना ही भूमिका पटवून देण्यात भारताला यश आले आहे. चीन मात्र एनपीटीवर भारताने सही करायचा हट्ट धरून आडमुठेपणा करत आहे.
असे असले तरी भारताने गेल्याच वर्षी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचे (एमटीसीआर) सदस्यत्व मिळवले. चीनला मात्र अद्यापही हे सदस्यत्व मिळालेले नाही. भारताने आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणात दिलेली ही मात आहे असे मानले जाते. एमटीसीआरच्या सदस्यत्वामुळे भारताला क्षेपणास्त्र विकासात इस्रायल, रशियासारख्या या तंत्रज्ञानात अग्रणी देशांबरोबर सहकार्य करणे शक्य झाले आहे. एनएसजीइतकेच एमटीसीआरचेही सदस्यत्व महत्त्वाचे आहे. एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यानंतर वेसेनर अरेंजमेंट व ऑस्ट्रेलिया समूहाचे सदस्यत्वही खुले होणार आहे. वेसेनर अरेंजमेंट पारंपरिक शस्त्रास्त्रांची निर्यात आणि तंत्रज्ञानांच्या दुहेरी वापरांवर प्रतिबंध घालते, तर ऑस्ट्रेलिया समूह रासायनिक/जैव अस्त्रांच्या निर्यातीवर प्रतिबंध घालतो. हे चारही समूह आजच्या जगात मुख्य नियंत्रक मानले जातात. यांचे सदस्य होणे म्हणजे उच्चभ्रू राष्ट्रांच्या गटात सामाविष्ट होणे. भारताने आण्विक अप्रसार करारावर सही केली नसली तरी भारताची बाजू या गटांना चीनचा अपवाद वगळता मान्य आहे असेच दिसते. अमेरिकेचा पाठिंबा हा त्याचे चीनशी कसे संबंध असतील यावर ठरतो. भारताला आशिया-प्रशांत महासागरी क्षेत्रात सबळ केल्याखेरीज चीनला शह देता येणार नाही हे अमेरिकेला माहीत आहे. ट्रम्प प्रशासनाने हे वास्तव लक्षात घेतल्याचेच त्याच्या भारताला दिलेल्या पाठिंब्यावरून दिसते. शिवाय भारताशी संरक्षण सामग्रीचा व्यापार वाढावा ही अमेरिकेची इच्छा आहे. किंबहुना अमेरिकन काँग्रेसला ट्रम्प प्रशासनाने सादर केलेल्या एनएसजीच्या भारतीय समावेशाला पाठिंबा देण्याबाबतच्या अहवालात ही बाब स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहे. थोडक्यात, आशिया खंडातील शक्ती समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे हे खरे असले तरी भारतालाही यामुळे कडवे आव्हान उभे करता येणार आहे आणि चीन नेमके हेच ओळखून असल्यामुळे भारताच्या एनएसजी गटात सामील व्हायला चीन विरोध करतो आहे. पण चीन किती काळ हा विरोध करत राहणार हा प्रश्नच आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर या एका मुद्द्यावरून एकाकी पडणे चीनलाही परवडणारे नाही. आण्विक प्रसारबंदी करारावर भारत सही करत नाही म्हणून आम्ही पाठिंबा देत नाही हा बहाणा फार काळ टिकण्याची शक्यता नाही. अमेरिकेने त्यासाठी आता पुन्हा एकदा सर्व सदस्य राष्ट्रांना भारताच्या समावेशासाठी होकार द्यावा हे आवाहन चीन किती काळ टाळू शकणार एवढाच काय तो प्रश्न आहे. डोकलाम भागात चीनने सुरू केलेल्या आक्रस्ताळेपणाला हीसुद्धा एक पार्श्वभूमी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. भारताचे वर्तन युद्धखोर, आक्रमक व अनैतिक आहे हे दाखवायचा प्रयत्न त्या सदस्यत्वाच्या विरोधापोटीही असू शकतो.
एनएसजीमधील भारताचा प्रवेश म्हटले तर तोंडावर येऊन ठेपला आहे. चीनही आंतरराष्ट्रीय दबाव अजून किती काळ झेलू शकेल याचीही शंका असली तरी भारताला चीनचे नाक अजून दाबण्याखेरीज पर्याय नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नुकत्याच झालेल्या चीन भेटीत हा तर सोडाच, पण डोकलामचाही विषय काढला गेला नाही. यामागील कारणे काहीही असोत, पण भारताला आपल्या मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवावी लागेल व हे महत्त्वाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी चीनचा विरोध स्वीकृतीमध्ये बदलावा लागेल.

(Published in Divya Marathi.) 
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sanjay-sonawani-writes-about-donald-trump-administration-5658638-PHO.html


Saturday, July 29, 2017

मानवाभिमूख अर्थ-तत्वज्ञान!

Image result for humanity paintings
आर्थिक प्रेरणा नेमक्या काय आहेत यावरुन मानवी संस्कृतीचे मापदंड ठरतात हे आपण मागील लेखात पाहिले. आजचा काळ हा जागतिकीकरणाचा आहे. यातून एक नवीन अर्थसंस्कृती निर्माण होत आहे व ती अर्थातच समाजसंस्कृतीवरही प्रभाव टाकत आहे. इतकी की मानवी नातेसंबंधांचीही पुनर्रचना होऊ लागली आहे. या नवीन रचनेला विरोध करणारे जसे परंपरावादी आहेत तसेच साम्यवादीही आहेत. मानवी स्वातंत्र्य आणि कायद्याची किमान बंधने या आधारावर जागतिकीकरण उभे असून त्यामुळे जगभर त्याचे लाभार्थी वाढत असले तरी अनेक राष्ट्रे मात्र समाजवादी नियंत्रकांच्या भुमिकेतून बाहेर पडत नसल्याने त्यांच्या विकासाचा दर तुलनात्मक दृष्ट्या वाढलेला नाही. पण साम्यवादी चीनने राजकीय धोरण व आर्थिक धोरणात फारकत केल्याने चीनचा अभुतपुर्व विकास झाला हेही आपण पहातो. चीनमधील मानवी स्वातंत्र्याची गळचेपी जगजाहीर आहे. म्हणजे एकीकडे आर्थिक विकास करत स्वातंत्र्याचा गळा मात्र पुरता दाबून टाकणे हे चीनचे धोरण आहे. अर्थात त्यामुळे चीनची समाज-संस्कृतीही या घटकाने बाधित आहे.
विविध प्रकारच्या राष्ट्रीय आर्थिक व राजकीय धोरणांच्या गलबल्यात आजचे जागतिकीकरण अडकले आहे. पण यावर गंभीर विचार अनेक आंतरराष्ट्रीय फोरम्सवर होत असतो. जागतिक मानवाचे हित कशा प्रकारे साध्य होईल यावर आज जगात अनेक तत्वज्ञाने आहेत. अगदी जागतिकीकरण नकोच ते संपुर्ण बंधनविरहित जागतिकीकरण हवे या टोकाच्या भुमिका मांडणारे जसे आहेत तसेच सुवर्णमध्य काय असू शकतो याचीही संगतवार मांडणी करणारे विचार आहेत व त्यांना एकत्र एका मंचावर आणत चर्चा घडवून आणणारेही आहेत. यातून किमान या विचारधारांचे उणे-अधिक लोकांना ठरवता येऊ शकते.
उदाहणार्थ गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय थिंक टॅंक मानल्या जाणा-या होरेसिस या संस्थेने स्वित्झरलँड येथे एक परिषद भरवली होती. या परिषदेत भारतातून फक्त तीन राजकीय पक्ष निमंत्रित करण्यात आले होते. यात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व स्वर्ण भारत पक्ष या तीन पक्षांचे प्रतिनिधी निमंत्रित होते. या पक्षांत स्वर्ण भारत पक्ष अगदीच नव्याने स्थापन झालेला असला तरी त्याचे अर्थ-राजकीय तत्वज्ञान हे वेगळे असल्याने त्याला निमंत्रित केले गेले. या परिषदेत भारताचे भविष्यातील अर्थ-तत्वज्ञान काय असावे यावर तिनही पक्षांनी आपापली मांडणी केली. त्याच पद्धतीने अन्य देशांतून आलेल्या विद्वानांनी व राजकीय पक्षांनीही आपापली भुमिका व तत्वज्ञान मांडले. भारतात तथाकथित उजवी व डावी मांडणी यापेक्षा स्वतंत्रतावादी मांडणी स्वर्ण भारत पक्षाचे संस्थापक संजीव सभ्लोक यांनी केली. या मांडणीत सरकारचे किमान नियंत्रण आणि नागरिकांना विकासाचे घटनात्मक चौकटीत स्वातंत्र्य हा त्यात महत्वाचा मुद्दा होता. बाबुशाहीचे प्रस्थ नष्ट करणे यावरही धमासान झाले. थोडक्यात भारताची व्यापक प्रगती व्हायची असेल नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य दिले गेले पाहिजे हा त्या मांडणीचा गाभा होता. भाजपने "मेक इन इंडिया" वर भर दिला. या चर्चा सत्रांतून होणारा फायदा एवढाच की भावी अर्थ-राजकीय तत्वज्ञान पुढे जायला मदत होते. प्रश्न हा आहे की मानवी संस्कृती ही अधिकाधिक प्रगल्भ आणि उन्नत होत "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।" या उदात्त ध्येयाकडे कशी वाटचाल करेल हा. मानवी स्वातंत्र्याची गळचेपी करत, त्याच्यावर अनेकविध बंधने लादत त्याच्या अर्थविकासात अडथळे निर्माण करून, शासनाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुलाम करून हे साध्य होणार नाही हे तर नक्कीच!
त्यासाठीच अर्थप्रेरणा आणि त्या प्रत्यक्ष अस्तित्वात आणण्यासाठी कोणते अर्थ व राजकीय तत्वज्ञान देश अंगिकारतो यावर त्या त्या देशाची संस्कृती ठरेल हे नक्कीच आहे. आणि सर्व देशांच्या संस्कृतींचा एकुणातील ताळेबंद म्हणजे आपल्या जगाची संस्कृती. कोठे प्रगती आहे पण स्वातंत्र्य नाही ते प्रगतीही नाही आणि स्वातंत्र्यही नाही अशा विरोधाभासी स्थितीत अनेक राष्ट्रे आज अडकलेली आहेत. नीट अर्थतत्वज्ञान नसल्यामुळेच आज व्हेनेझुएला हा देश कर्जबाजारीपणाच्या ओझ्याखाली कसा चिरडला गेला आहे आणि नागरी जीवन अस्ताव्यस्त होत गुन्हेगारीचा कसा विस्फोट झाला आहे हे आपल्याला पहायला मिळते. यातून आपण काही धडा शिकायला हवा. काही दशकांपुर्वीच समाजवादी बंधनांत अडकलेल्या भारतावर एवढी आर्थिक अवनती कोसळली होती की चंद्रशेखर सरकारवर सोने गहाण ठेवायची वेळ आली होती हे आजच्या स्थितीत कोणाला खरे वाटणार नाही. नरसिंहराव सरकारने समाजवादाला काही प्रमाणात मुरड घालत जागतिकीकरणाचे पर्व आणल्याने भारतात मोठी अर्थक्रांती झाली आणि त्यामुळे समाजक्रांतीही घडली हे वास्तव आहे. अर्थात नरसिंहरावांचे जागतिकीकरण केवळ उद्योग-धंद्यांपुरते मर्यादित राहिले, त्यांनी शेतीक्षेत्राला मात्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून वगळले यामुळे ’इंडिया विरुद्ध भारत’ यातील दरी संपायच्या ऐवजी रुंदावत गेली व ती काही प्रमाणत द्वेषपुर्णही झाली. अर्थात विकासाच्या वेगालाही मर्यादा बसली. एक पाय खुला आणि दुसरा पाय पोतड्यात घालून रेस जिंकता येणार नाही हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. भविष्यात राजकीय पक्ष आपापल्या अर्थविचारधारेत कालसुसंगत व न्याय्य बदल करतील आणि ही दरी बुजवत ख-या अर्थाने एकोप्याची संस्कृती निर्माण करतील एवढी आशा मात्र आपण नक्कीच करू शकतो. बंधनांची समाजवादी अर्थव्यवस्था आकर्षक वाटली तरी ती शोषित-वंचितांसह व्यापक हित करू शकत नाही हे आपण अनुभवले आहे. आजच्या शोषित-वंचितांना अधिक पंगू न बनवता मुळात त्यांनाच समर्थ करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. जागतिक अर्थव्यवस्थांनाही ते लागू आहे.
’एक जग: एक राष्ट्र’ या संकल्पनेकडे जायचा जागतिकीकरण हा एक महत्वाचा टप्पा आहे हे अमान्य करता येणार नाही. पण हा टप्पा न्याय्य पद्धतीने अंगिकारला जातो आहे काय या प्रश्नाचा विचार केला तर त्याचे उत्तर "नाही" असेच येते. काही मोजक्या बलाढ्य़ राष्ट्रांची आणि कार्पोरेट हाउसेसची अनिर्बंध मक्तेदारी या टप्प्याला गालबोट लावते आहे असेही चित्र आपल्याला पहायला मिलते. समाजात जशी विषमता आहे तशीच राष्ट्रा-राष्ट्रांतही आहे आणि ही दरी कशी बुजवायची यासाठी ठोस उपाय आजच्या जगाकडे आहेत असे दिसत नाही. राजकीय कुरघोड्या करून तणाव वाढवण्यावरच आजच्या जगाचा भर दिसतो. त्यासाठी कारण कोणतेही असू शकते. यामुळे मानवतावादाचे तत्व अद्याप तरी अर्थ-राजकीय साम्राज्यशाहीच्या दबावाखाली चिरडले गेल्याचे जागतिक चित्र आपल्याला दिसते. चीनची दादागिरी व विस्तारवाद आणि अमेरिकेची दादागिरी व नियंत्रणवाद यात तत्वत: फरक करता येत नाही तो यामुळेच. त्यामुळे जागतिक संस्कृतीचे म्हणाल तर ती आज मध्ययुगीन संस्कृतीपेक्षा फारशी वेगळी आहे असे ठामपणे म्हणता येणार नाही. आपल्याला आधी निकोप अर्थसंस्कृती निर्माण करायचे मार्ग शोधावे लागतील, उपलब्ध अर्थ-तत्वज्ञानांना अधिक मानवाभिमुख करावे लागेल. मानवाच्या अविरत जिज्ञासा व विकासाच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अवकाश द्यावे लागेल. कदाचित नव्या पिढ्या अत्यंत अभिनव असे अर्थ तत्वज्ञान नि म्हणूनच सामाजिक तत्वज्ञान शोधतील. मानवतेच्या व्यापक पायावर कदाचित आजवरच्या अवशेषग्रस्त संस्कृत्यांपेक्षा अधिक उन्नत मानवी संस्कुती आम्हाला निर्माण करता येईल. आणि यात जगातील सर्वच मानवी समुदायांनी हातभार लावत अधिक उज्वल भवितव्याकडे वाटचाल करत राहणे, पुराणपंथी मानसिकतेला तिलांजली देणे अर्थातच अभिप्रेत आहे.
(Published in Dainik Sanchar, Indradhanu supplement)

Saturday, July 22, 2017

आर्थिक प्रेरणा आणि संस्कृती

Image result for collapse of ancient civilizations

कोणत्याही समाजाचे आर्थिक तत्वज्ञान काय आहे, ते कसे राबवले जाते आणि त्या अर्थतत्वज्ञानाची उद्दिष्टे नेमकी काय आहेत यावरुन त्या समाजाची संस्कृती ठरत असते. किंबहुना जागतिक संस्कृत्यांचा पुरातन काळापसून ते आजतागायतपर्यंत अभ्यास केला तर धर्म नव्हे तर अर्थतत्वज्ञान व आर्थिक स्थितीचा फार मोठा प्रभाव मानवी संस्कृतीवर राहिला आहे असे आपल्याला दिसते. किंबहुना अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची हवी व ती कोणत्या प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय प्रणालीमार्फत राबवली जावी याबाबतचे संघर्ष जगभर आजही सुरु आहेत. प्रत्येक प्रबळ राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या अर्थतत्वज्ञानाचा प्रबळ समर्थक असतो तो यामुळेच. ज्यांना अर्थतत्वज्ञानच नाही अशा पक्षांना दिर्घकाळ राजकीय भवितव्य नसते हेही इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे. आपण सिंधू काळापर्यंत मागे गेलो तर ती व तिला समकालीन असलेली इजिप्त, असिरियन व चीनी संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भुभागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक परिस्थित्यांचा वापर करत बलाढ्य बनलेल्या आपल्याला दिसतात. प्रत्येक संस्कृतीचे सामाजिक, धार्मिक विचार वेगवेगळे असले तरी एकच महत्वाचा दुवा म्हणजे ती उत्पादक व व्यापा-यांची संस्कृती होती. त्यामुळे अर्थजीवन भरभराटीला आले व प्रत्येक संस्कृतीने जी ऐहिक झेप घेतली ती अवशेषांच्या रुपाने का होईना आज आपण पाहू शकतो. तज्ञांच्या मते युद्धे व पर्यावरणातील बदलामुळे सनपूर्व १७५० च्या दरम्यान या संस्कृत्यांना आहोटी लागली. सिंधू संस्कृतीचे लोक पाऊस कमी पडू लागल्याने शहरांकडून ग्रामीण भागांत सरकले. मध्यपुर्वेत सुरु असलेल्या युद्धांमुळे व्यापार थांबला हेही कारण आर्थिक पडझडीला होते. यामुळे झाले असे की तटबंदीयुक्त, सुबक नगरे होती तीच कंगाल होत शेवटी अवशेषग्रस्त झाली. मग नव्याची निर्मिती कोठून होणार? कला-संस्कृतीतही घसरण झाली. निर्माणकर्ते समाज नवनवीन शोध लावण्यापेक्षा जगण्यापुरते तरी कसे कमावता येईल या विवंचनेने ग्रासले. थोडक्यात संस्कृतीचे अध:पतन आर्थिक आरिष्टामुळे झाले. तत्कालीन ज्ञात संस्कृत्यांत जगभर थोड्याफार फरकाने असेच झाले. अर्थशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करत सिद्धांत मांडायची सुरुवात फार नंतर सुरु झाली असली तरी माणुस टोळ्या करुन रहात होता तेंव्हापासून अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे का होईना अलिखित अर्थशास्त्र विकसीत झालेले होते. त्या अर्थशास्त्राला अनुकूल अशी शेती, व्यापार, गुलाम व्यवस्था सर्वत्र आकाराला येत गेली. ग्रीक-रोमनांनी जरी आद्य लोकशाहीचा पाया घातला असे मानले जात असले तरी त्यांची अर्थव्यवस्था ही गुलाम केंद्रित होती. हा एक विरोधाभासच म्हणायला हवा! भारतातील शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेला व्यापार यंत्रणेने बळ पुरवले. पण शेती व व्यापार यावर राज्यसंस्थेचे आधी कडक निर्बंध होते असे दिसत नाही. श्रेणी संस्था अधिक प्रबळ होती. चर्मकारापासून ते सोनारांपर्यंत प्रत्येक कारागिरांच्या जशा श्रेण्या होत्या तशाच सेवा पुरवणा-यांच्याही श्रेण्या होत्या. या श्रेणीप्रमुखांच्या संमतीखेरीज राजा कोणतेही अधिकचे कर आकारू शकत नव्हता. कौटिल्याने अर्थशास्त्रात तर श्रेणीप्रमुखांना एकत्र येत राजाविरुद्ध कट करू नये यासाठी उपाय सुचवले आहेत. अर्थात तसे कट कधी घडल्याचा एकही दाखला नाही. उलट उत्पादक व व्यापारी श्रेण्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण चवथ्या शतकापर्यंत भारताची आर्थिक भरभराट झाल्याचेच पाहतो. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या आर्थिक अध:पतनापासून धडा घेत नवी अर्थरचना आकाराला आली व ती स्वतंत्रतावादी असल्याने व चार्वाक ते आगमिक शास्त्राने त्यांना तात्विक बळ पुरवल्याने देशाचे भरभराट झाली होती असे आपल्याला म्हणता येईल. पण मधल्या काळात कशीबशी टिकून असलेली व्यवस्था पुन्हा कोलमडली आणि नवी बलुतेदारी अर्थव्यवस्था स्विकारल्याने पुन्हा एकदा नवे आर्थिक आरिष्ट सुरु झाले. गुप्तकाळापासुनच सामंतशाही व मंदिरशाहीचे वाढलेले प्रस्थ, परकीय आक्रमणे आणि धर्मतत्वज्ञानांतील आंतरकलह यामुळे हे अध:पतन सुरु झाले असे मानले जाते. यामुळे भारत पुन्हा आर्थिक व म्हणुनच सामाजिक अंध:कार युगात फेकला गेला तो आजतागायत फारसा बाहेर पडलेला नाही. या झंजावातात श्रेणीव्यवस्था पार जमीनदोस्त झाली आणि अकराव्या शतकाच्या आसपास तिने शेवटचा आचका घेतला. या नव्या आर्थिक आरिष्टाने समाजव्यवस्थाच सैरभैर झाल्याने इहवादी भारतीय परलोकवादी बनत गेले. आगमशास्त्रांच्या स्वतंत्रतावादी तत्वज्ञानाची जागा सावकाश वैदिक स्मृतीप्रणित बंदिस्त समाजव्यवस्थेच्या तत्वज्ञानाने घेतली. आर्थिक व्यवस्था व समाजसंस्कृतीचे नाते असे परस्परावलंबी असल्याने जो सामाजिक मनोगोंधळ होत जातो त्यातून संस्कृतीचे अध:पतन होत नवनिर्माणाच्या उर्मी मारल्या जातात. कोणत्याही दरिद्र समाजात सामाजिक जाणीवा प्रगल्भपणे विकसित होण्याची क्षमता नसते. एका अवनतीतून सावरण्यासाठी दुस-या नव्या अर्थसिद्धांताची गरज असते. पण ब्रिटिशकाळाने तीही शक्यता संपवली व आम्ही आयात केलेल्या आर्थिक रचनाशास्त्राला प्राधान्य देत बसलो. खरे म्हणजे आर्थिक स्वतंत्रतावाद विरुद्ध कौटिल्याचा राज्य-नियंत्रित अर्थवाद यावर धमासान भारतात पुर्वीच होऊन गेले होते. कौटिल्याने अनेक उद्योग सरकारद्वारा चालवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात वस्त्रोद्योग, सुवर्ण, खाणी ते पार वेश्यालयेही सरकारने चालवावीत अशा सूचना दिल्या. सरकारी मालकीचे उद्योग ही संकल्पना भारतात समाजवाद अथवा साम्यवादाकडून आलेली नाही तर ती प्रथम कौटिल्याकडून आलेली होती. गुप्त काळात काही प्रमाणात तर नंतर मोठ्या प्रमाणात कौटिलिय अर्थतत्वज्ञान राजसंस्थेने वापरले. त्याची परिणती खाजगी व्यवसायांच्या स्वातंत्र्याचे हरण होण्यात झाली. नंतर तर मग अशी स्थिती आली की राज्यसंस्थाही उद्योग चालवू शकल्या नाहीत आणि खाजगी क्षेत्राचे कंबरडेच मोडले असल्याने चरितार्थापुरता व्यवसाय असे त्याचे स्वरूप बनले. त्यात दहाव्या शतकानंतर आलेल्या दुष्काळांच्या रांगेने तर होती तीही अर्थव्यवस्था पार धुतली गेली. बलुतेदारी पद्धतीचा उगम यातुनच झाला आणि त्यातून व्यवसायाधिष्ठित सामाजिक व्यवस्था नाहीशी होत तिचे जातिव्यवस्थेत रुपांतर झाले व ती कठोर बनायला हातभार लागला. थोडक्यात अर्थतत्वज्ञानातील ही फार मोही गफलत होती व तिचे परिणाम समाज-संस्कृतीवर होणे अपरिहार्य होते. तसा तो झालाही. पण आमच्या सामाजिक विचारवंतांनी आर्थिक इतिहासाकडे आणि आर्थिक प्रेरणा व संस्कृती यातील संबंध नीटसा न अभ्यासल्यामुळे आमचे नवे शास्त्रशुद्ध अर्थतत्वज्ञान जन्माला येणे शक्य नव्हते. म्हणजेच अर्थव्यवस्था समाजसंस्कृती कशी असेल हे ठरवते. कंगालांच्या आर्थिक प्रेरणा या नेहमी भ्रष्टतेकडे झुकतात हा जागतिक अर्थपर्यावरणाचा इतिहास आहे. त्यातून जी समाजसंस्कृती अस्तित्वात येते ती ना धड राजकीय, ना आर्थिक, ना धड प्रगल्भ समाजव्यवस्था साकारते. भारतीय परिप्रेक्षात विचार केला तर आपले सांस्कृतिक अध:पतन का झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. बौद्धिक क्षेत्रात मागास राहिलेले अर्थमागासच राहतात. आणि अर्थ-मागासांच्या सांस्कृतीक उत्थानाची शक्यता धुसर असते हे ओघाने आलेच. आर्थिक स्थिती व एकुणातील सांस्कृतिक स्थिती यातील अनुबंध तपासावा लागतो तो यामुळेच. विषमता, भेदभाव, गलिच्छ पातळीवर जाणारी आपापसातील स्पर्धा, झुंडशाही, सर्वोपरी होऊ पाहणारी धर्मशाही, विकासाचे घसरते मापदंड याची मुळे माणसाच्या अर्थप्रेरणा नेमक्या काय आहेत व कोणते अर्थतत्वज्ञान त्याला अभिप्रेत आहे यातही असतात. कारण मानवी संस्कृतीचे ते अविभाज्य अंग आहे. आज काय व्यवस्था आहे ते पाहिल्याखेरीज आम्हाला भविष्यात कोठे आंणि कसे जायचे आहे हे ठरवता येणार नाही हे उघड आहे. कोणती अर्थरचना आम्हाला उपकारक ठरेल आणि तशा प्रेरणा निर्माण व्हायला व स्विकारायला आमची मन:स्थिती तयार असेल काय याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे.

(Published in Daily Sanchar, Indradhanu supplement)

असूर "सूर्य" : असूर संस्कृतीImage result for ashur god mesopotamia
जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोती? देवांची का असुरांची? असूर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचीन. ब्राह्मण ग्रंथांतही असूर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असूर थोरले असे स्पष्ट निर्देशले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेदकाळात आदरार्थी देव नव्हे तर असूर हे संबोधन वापरलेले आहे. पण असूर संस्कृतीची पुरातनता पहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबुन राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागांतील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असूर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असूर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणांतील असूरांच्या मुळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असूर म्हटले कि दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात. पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुता: असूर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते. 

असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच "अस्सूर" (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किना-यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमद्ध्ये पहायला मिळतात. हे शहर इसपू २६०० मद्ध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नांवातही "असूर" हा शब्द सामाविष्ट असे, जसे असूर बनीपाल, पुझुर असूर, असूर उबालित, अशूर निरारी वगैरे. असूर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सुर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करतो अशी संकल्पना असिरियनांची होती. 

असूर म्हणजे सुर्यदेवता. किंबहुना सुर्यालाच असिरियन असूर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सुर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराकथांत देवांचा देव आहे , पर्वताचाही देव आहे आणि असूर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रि
श्चन काळातही असिरियनांनी असुरपुजा सोडली नाही. 

असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गांवाला व नगराला गांवदेव अथवा गांवदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतांत होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले. 

इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते, अगदी आपल्या शिवासारखीच. अस्सूर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भुमी किंवा सुर्यदेवता "रा"चे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे. 
असूर आणि सुर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असूर हा सुर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराकथांनुसार तो सुर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही "असूर" हे सुर्याचेच एक नांव आहे. फार नंतर प्राचीन इराणमध्ये जन्माला आलेल्या वैदिक धर्मातही असूर म्हणजे सूर्य असाच अर्थ खूप काळ घेतला जात होता. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. असूर म्हणजे महान (राजाप्रमाणे) प्रमूख, बलाढ्यही मानले जात. "माया" ज्यांना अवगत आहे असेही असूर वैदिकांनी चांगल्या अर्थाने उल्लेखले आहेत. झरथुस्ट्राच्या धर्मात तर असूर हीच मुख्य देवता होती. ऋग्वेदात काही ठिकाणी सुर्यालाच असूर म्हटले आहे. उदा. खालील ऋचा पहा:

पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि |
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि || ( ऋ. १०.१२४.३)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा |
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम ||  ( ऋ. १०.५६.६)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश |
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ || (ऋ. ५.४७.३) 
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः |
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः | (ऋ. १०.१७७.१)

या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते कि वैदिकांच्या दृष्टीनेही असूर ही मुळची सुर्यदेवताच होती किंवा सुर्यालाच ते असूरही म्हणत असत. असूर देवता निर्मितीचे कारण तर होतीच पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना स्वर्गाची मुले म्हटले गेले आहे.  असूर आणि सवितृ यांचे "सो्न्याच्या हातांचे" असे वर्णन १.३५.९-१० या ऋचांमध्ये करण्यात आला असून सवितृ हे सुर्याचेच एक नांव आहे हे आपल्याला माहित आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही "असूर" हे संबोधन वापरले गेलेले आहे. असूर हे सुर्यपुजक होते असे १०.१७७ या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असूर हे समाज म्हणून सूर्यपुजक व असूर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. "पतंग" हा शब्द येथे सूर्याचे नांव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सुर्याला अनेक नांवे असली तरी सुपर्ण असेही एक नांव आहे व ही नांवे असुरांकडेच निर्देश करतात असे डा. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शवले आहे.  अग्नी व प्रकाशालाही असूर म्हटले गेले ते मुळच्या असूर शब्दाच्या मूळ सूर्य अथवा त्यासम अर्थानेच हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

वैदिक साहित्यात सुर्यालाच असूर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे. पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहिम काढली असली त
री त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत. पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असूरकेंद्रितच होता हे वरुण -इंद्रादि देवतांना आरंभी "असूर" हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते. वैदिक साहित्यात नंतर मात्र असूर म्हणजे अंधार वा रात्र असा अर्थ होत होत शेवटी असूर म्हणजे दुष्ट असा अर्थ रुढ झाला. 

अहूर माझ्दा (सं. असूर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र 
श्वर. देव हे या धर्मात दुष्ट पापी मानले जातात. अहूर हे असूर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहूर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ "उच्चबुद्धीमत्तेचा शक्तीशाली" असा घेतला जातो.  अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू १५००) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पुर्वीही हा धर्म होताच परंतू त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भुमिकेत जात अहूर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सुर्याचेच एक नांव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सुर्याचेच एक रुप) किंवा सुर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सुर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सुर्याला "अऊरमाझ्दे" म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सुर्याला "ओर्मोझ्द" असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. ( Boyce, Mary (1983), "Ahura Mazdā", Encyclopaedia Iranica 1, New York: Routledge & Kegan Paul, pp. 684–687)


असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असूर आणि सुर्य यातील अन्योन्य संबंध वाच
कांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असूर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असूर हीच त्यांची मुख्य देवता होती. असूर हे सुर्याचेच संबोधन होते. सुर्य हा मानवी जगाचा अदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असूर संस्कृती होय.

सुर्य हा तत्कालीन जगाने अत्यंत गुढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाने स्वभाविक होते. असूर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती " असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला र हा प्रत्यय लागून असूर शब्द बनतो असे संस्कृतज्ञ म्हणतात. असूर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड १, पृ. ३३७) मद्ध्ये सांगितले आहे. परंतू ही व्युत्पत्ती कृत्रीम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असूर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहापैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. ड. आ. ह. साळूंखेही "असूर" शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे "बळीवंश"मद्ध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सुर्याला कोणीतरी अधी असूर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सुर्यकेंद्रित असूर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली कि ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असूर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असूर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असूर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहूरमाझ्दा धर्मात असूर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहित आहेच. 

किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मुळच्या असूर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असूर आणि सुर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सुर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असूरांच्या विरोधात "सुर" हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. "सुर" हा शब्द संस्कुतात कृत्रीम व नंतरचा असून असूर हाच मुळचा शब्द आहे, असुर शब्दातील "अ" हा नकारार्थी नसून "असू:" या शब्दाला र हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डा. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. ४३-४६) म्हणतात. सुर्य जर "सूर" या शब्दापासून बनवला गेला असेल तर असुर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सुर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. 
असूर्य आणि सुर्य हे शब्द सोबतच काही ऋचांमध्ये ऋग्वेदात वापरले गेले आहेत. म्हणजे नंतरच्या काळात असूर्याची जागा सूर्याने घेत असूर शब्द स्वतंत्र (देव वा दुष्ट) उपाधी म्हणून वापरला जाऊ लागल्याचेही आपल्याला दिसते. असुर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. ७.२१.७) वापरला गेला आहे हेही महत्वाचे आहे. ती ऋचा अशी- 

देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि |
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ || 

येथे देव हे "पुर्वीचे असूर" या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पुर्वी असूर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही "दिव" किंवा "द्यौस" या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणा-या गणांनी असूर हे नांव टाकत देव हे नांव स्विकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच 
येथे सुचित होते.

येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाने असूर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सुर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनि
ष्टालाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असूर अथवा सूर्य) मुळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहापैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाने वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मुळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डा. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डा. आ. ह. साळूंखे सुचवतात कि असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.

सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जस दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे ह शब्द एका ठिकाणावरुन दुसरेकडे गेला असा अंदाज बांधता येईल, पण कोठुन कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सुर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपुर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नांव दिले असणार व ते प्रचारित झले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मुळ शोधण्यापेक्षा असूर म्हणजे मुलत: सुर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पहायचा दृष्टीकोण आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सुर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मुळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या. 

असूर हे मानवही!


असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असूर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असूर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापर
ला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असूर हे सुर्याचे जसे नांव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असूर मुर्तीपुजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असूर म्हटलेले आहे. "त्वमग्ने रुद्रो असुर..." असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (३.११.२.२) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सुर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असूर मात्र लिंगपुजक अथवा शिव-शक्ती पुजक होते. परंतू सुर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सुर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.)  

या असुरांचा धर्म नेमका काय होता? 
वैदिक व  झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असूर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील "अकर्मन" (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रम्ह (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्वाचा उल्लेख आहे तो "शिस्नदेव", म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असूर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतू त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुष्ट्री धर्माची तत्वे व उपासनापद्धतीही माहित आहे. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असूर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असूर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राम्हण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे. पण याचा दुसरा अर्थ असाही होतो कि एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट झाली ते बहुदा झरथुस्ट्राने असूर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असूरविरोधी बनला. 

शतपथ ब्राम्हणात अजून एक कथा येते (१०.९.३.७-९) 
ती अशी- सौत्रामणी यज्ञ हा आधी असुरांचाच होता तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच  मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता. 

आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असूर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवांचेही नांव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे. 

येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ऋग्वेदातील असूर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराकथांतील असूर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादि जे असूर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असूर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असूरांचा त्यांच्याशी संबंध नाही. परंतू आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहतांना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असूर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतुन, महाभारतातुन व काही प्रमाणात ब्राम्हण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भुगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही. 

असे असले तरी असूर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही, पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असूरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो. 


झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खुप आधीपासून असूर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रु मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहूर माझ्दाचा मुख्य शत्रु. 

म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना माननारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणा-या जनसमुहांनी शत्रुत्वातुनही निर्माण केला असू शकेल. पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असूरतत्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असूर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात १०५ वेळा असूर शब्द येतो त्यात ९० ठिकाणी त्याचा वापर पुजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असूर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असूर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असूर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते. 

पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गुढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गुढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाड्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतांनाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरत टाकतात ते उचित नाही. "इंद्राने विजय मिळवला" अशा अर्थाची ऋचा येते तेंव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानना-यांनी विजय मिळवला" असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहतांना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली तरीहे मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो. 

मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टीने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टीने असूर दूष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणुनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीट्पणे होणार नाही.

-संजय सोनवणी

Sunday, July 16, 2017

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

उद्ध्वस्त मोसूलचा धडा!

इसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला तो समस्त मानवजातीला काळिमा फासणारा होता यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखांहून अधिक नागरिक ठार झालेले आहेत. इसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती “सैतानी’ या शब्दातच वर्णन करता येईल. पुरातन स्थळांचा इसिसने केलेला विध्वंस अमानवीयच होता. मध्यपूर्वेतील राष्ट्रांपर्यंत मर्यादित असलेला इसिसचा दहशतवाद युरोपच्याच भूमीवर जाऊन पोहोचेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. चार्ली हेब्दो मासिकातील व्यंगचित्रांचा बदला घेण्यासाठी हा दहशतवाद फ्रान्समध्ये घुसला. ब्रुसेल्स या बेल्जियमच्या राजधानीत विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवर झालेल्या दहशतवादी स्फोटांत तीसहून अधिक ठार झाले. युरोपमध्ये आयसिसचे नेटवर्क किती पसरले आहे याचा अंदाज या अनपेक्षित हल्ल्यामुळे आला.

इसिसच्या दहशतवाद्यांनी असिरियन संस्कृतीच्या काळापासून प्रसिद्ध असलेले इराकमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले मोसूल शहर इराकी सैन्याला हुसकावून २०१४ मध्ये ताब्यात घेतले होते. मोसूलला राजधानी बनवत इराकचा जवळपास अर्धा हिस्सा इसिसने व्यापला. मोसूलमधील अल नुरी मशिदीतूनच इसिसचा सर्वेसर्वा अल बगदादी याने इस्लामी खिलाफतीची घोषणा केली होती. धार्मिक पोलिसांनी तेव्हापासून मोसूल व त्या शहराच्या परिसरात धुमाकूळ घातला होता. संगीत ऐकणे या साध्या बाबीसाठी नागरिकांचा छळ करत त्यांना ठार मारले होते. या कालावधीत इंटरनेट व फोन वापरायलाही मोसूलमधील नागरिकांना बंदी होती. गैरइस्लामियांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. इसिसने या शहराला जवळपास आपली राजधानी बनवत एक जागतिक धोका बनायला सुरुवात केल्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेणे इराकसाठी अत्यावश्यक बनले होते. अमेरिकन सैनिकांच्या सहकार्याने सुमारे २२ हजार इराकी सैन्याने मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठी युद्ध सुरू केले. गेले काही महिने यासाठी घमासान युद्ध होत होते. हवाई हल्लेही केले गेले. हरतच चाललेल्या इसिसने शेवटी आत्मघातकी प्रतिहल्लेही केले. पण शेवटी मोसूलवर विजय मिळवण्यात इराकी सैन्याला यश मिळाले. गेल्याच आठवड्यात इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी मोसूलमध्ये आले व इसिसवरील विजय घोषित केला.

पण या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासारखी स्थिती नव्हती. प्राचीन वारसा सांगणाऱ्या मोसूल शहराचा पूर्ण विध्वंस झाला आहे. जवळपास साडेआठ लाख नागरिक शहर सोडून गेले आहेत. मृतांचा आकडा अजून जाहीर झाला नसला तरी ती संख्या लाखाच्या आसपास जाऊ शकते. जेथे नजर जाईल तेथे उद्ध्वस्त घरे आणि रस्त्यांवर डबरांचे ढीग आहेत. ज्या अल नुरा मशिदीतून अल बगदादीने खिलाफतीची घोषणा केली होती ती या खिलाफतीचे प्रतीक असलेली मशीदही जमीनदोस्त झाली आहे. लेनिनग्राडची द्वितीय विश्वयुद्धात जशी दयनीय अवस्था झाली होती त्यापेक्षा भयंकर अवस्था आज मोसूलची आहे. युद्ध कधीच रम्य नसते. मोसूलचा ताबा मिळाला असला तरी इसिसचे अजूनही अंडरग्राउंड असलेले काही आत्मघातकी गट कधीही हल्ला करू शकतात म्हणून आसपासच्या गावांनाही इसिसमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा विजय महत्त्वाचा यासाठी आहे की सैतानी आकांक्षांनी प्रेरित एकापाठोपाठ नृशंस कृत्ये जगभर करणाऱ्या इसिसला सर्वात मोठा झटका मिळाला आहे.

पण इसिसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला असला तरी अजून अबू बक्र अल बगदादी व त्याचे नेटवर्क जिवंत आहे. त्याची पोहोच अद्यापही जगातील इस्लामी मूलतत्त्ववाद्यांपर्यंत आहे. अल नुरा मशिदीचा विध्वंस म्हणजे बगदादीच्या खिलाफतीचा विध्वंस असे मानण्यात येत असले तरी बगदादीमध्ये नवीन दहशतवादी केंद्रे उभी करण्याची शक्ती आणि तसे तत्त्वज्ञानही असल्याचे मान्य करावे लागते. इस्लामिक राज्याची स्थापना हे ध्येय बाळगणारे व त्या ध्येयासाठी जीव धोक्यात घालू पाहणारे मुस्लिम युवक दुर्दैवाने कमी नाहीत. दीर्घकाळ मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष राज्य चालवल्यामुळे अल कायदासारख्या कसलाही भूभाग ताब्यात नसलेल्या दहशतवाद्यांपेक्षा इसिसचा दबदबा पुढेही राहील असा अभ्यासकांचा कयास आहे. मोसूलमधील पीछेहाटीनंतर काही काळ इसिसकडे येणारा भरतीचा ओघ जरी कमी झाला तरी तो पूर्ण थांबणार नाही. याचे कारण म्हणजे मोसूल पडले असले तरी अद्याप ताल अफार, हौज्जासारखी काही शहरे आणि अनबारसारखे विभाग अजून इसिसच्या ताब्यात आहेत. सिरियामधील युफ्राटिस नदीचे बरेचसे खोरे अजूनही इसिसच्याच नियंत्रणात आहे. मोसूलमधील इसिसचे अनेक बडे दहशतवादी पळून तेथे आश्रयाला गेले असण्याची शक्यता आहे. मोसूलमधील विजयामुळे जरी इराकी सैन्याला मोठे यश आले असले तरी हे सर्व इसिसव्याप्त प्रांत ताब्यात घ्यावे लागतील. शिवाय इसिसने लिबिया, इजिप्त, येमेन, अफगाणिस्तानातही आपले जे तळ बनवले आहेत तेही उद्ध्वस्त करावे लागतील. त्याशिवाय इसिसवरील विजय पूर्ण झाला आहे असे म्हणता येणार नाही. जगावरील इसिसचे सैतानी सावट अजूनही गेलेले नाही.

जगासमोरचा विशेषत: युरोपसमोरचा सर्वात मोठा धोका इसिसचा आहे. युरोपमध्ये एखादे फार मोठे दहशतवादी कृत्य करण्याची त्यांच्याकडून शक्यता आहे. मोसूलमधील कंबरडे मोडणारे अपयश इसिस सहजी पचवणे शक्य नाही. इसिसची रानटी पद्धत पाहता अन्यत्र हिंसाचाराची राळ उठवून देत आपली शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही हे दाखवण्याचा इसिसचा प्रयत्न असेल. भारतालाही इसिसच्या या संभाव्य संकटाची दखल घेत त्याला रोखण्याची व्यवस्था करावी लागेल. बगदादी कोठे आश्रय घेतो हे गुप्तचर यंत्रणांना अद्याप तरी माहीत नाही.

ओसामा बिन लादेनप्रमाणे त्याला शोधून ठार मारायची कितीही इच्छा गुप्तचर यंत्रणांची असली व एकदा तसा प्रयत्नही केला गेला असला तरी अद्यापही त्यात यश आलेले नाही. पण प्रश्न येथे केवळ बगदादीचा नसून ज्या विचारसरणीची इमारत रचत, नव-खिलाफतीचे आकर्षण दाखवत त्याने जो प्रभाव निर्माण केला आहे तो कसा हटवायचा हा मुख्य प्रश्न आहे व त्याला पाश्चात्त्य राष्ट्रांकडे किंवा इराक-सिरियाकडेही उत्तर आहे असे दिसत नाही. मोसूलचे ध्वस्त अवशेष व त्यात काही न समजणारी खेळणारी लहानगी मुले, बहिणींचे सांत्वन करणारे आईबाप, गमावलेले भाऊ, कसेबसे जिवंत असलेले जगण्याच्या शोधात किडूकमिडूक सोबत घेऊन मोसूल सोडणारे अभागी सामान्य नागरिक हे दृश्य पाहून तरी कोणाला करुणेचा पान्हा फुटेल अशी आशा बाळगली तरी दहशतवादी हिंसक मनोवृत्तीकडून तशी अपेक्षा करता येत नाही. इसिसने दहशतवाद केला. त्यांना जवळपास तसेच उत्तर मिळाले आहे. पुढेही हा संघर्ष कदाचित असाच चालू राहील. आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायाला यापासून धडा घेत इसिस व तत्सम प्रवृत्तींना एकटे पाडण्याशिवाय गत्यंतर नाही.

कडव्या इस्लामवादाचे इसिस हे जागतिक प्रतीक बनले आहे. सर्वच मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इसिसने दूषित केला. स्थलांतरित झालेलेही मुस्लिमच होते, पण त्यांच्यातही इसिसच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याने त्यांना आसरा देणाऱ्या राष्ट्रांची पंचाईत तर केलीच, पण स्थलांतरितांनाही स्थानिकांच्या द्वेषाचे कारण बनावे लागले. आपल्या देशात परतायचे त्यांचे स्वप्न इसिसचा समूळ बीमोड कधी होतो यावर अवलंबून आहे. इराक-सिरियाचे पुढचे लक्ष्य इसिसचे नेटवर्क समूळ उखडणे हेच असेल व ते लवकर साध्य व्हावे ही अपेक्षा! दहशतवाद्यांचा कधी ना कधी खात्मा होतोच, पण त्यासाठी काय किंमत मोजावी लागते हे मोसूलचे उद्ध्वस्त अवशेष पाहिल्याखेरीज समजणार नाही याचीही दखल सर्व धर्मांतील मूलतत्त्ववाद्यांनी घेतली पाहिजे. हा त्यांच्यासाठीही धडा आहे

Saturday, July 15, 2017

बौद्धिकतेच्या नाशाच्या दिशेने...


Inline image 1
सजीव उत्क्रांती होत होत आजच्या अवस्थेला पोहोचले असे चार्ल्स डार्विनचा सिद्धांत मानतो. उत्क्रांतीचा नियम खरा की खोटा, प्राण्यांमध्ये झालेले बदल क्रमश: विकसीत झाले की आधीचे प्राणी नष्ट होत त्याच मूळ रसायनात बदल करत निसर्गानेच सर्वस्वी नवे सुधारीत जीव तयार केले या वादात जायचे आपल्याला कारण नाही. पण जेंव्हा आपण मानवी समुदायाचा विचार करतो तेंव्हा मानसीक/वैचारीक उत्क्रांती होत माणूस तंत्रज्ञान व सामाजिक विचारांच्या नव्या बदलांना स्विकारत त्यांना सरावत जातो असे मानले जाते. याला ’सामाजिक उत्क्रांतीवाद’ म्हणता येईल. कोणताही वाद जसा आदर्श स्थितीबाबत बोलत असतो तसाच हाही वाद आहे असे क्षणभर वाटू शकते. याचे महत्वाचे कारण म्हणजे मुळात हा सामाजिक उत्क्रांतीवाद आंतरीक आहे की बाह्य यावरच विवाद होऊ शकतो. 

माणसाचे बाह्य जग व रुप प्रचंड बदलले आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. तो नवीन तंत्रज्ञानाच्या घोड्यावर स्वार होत भविष्याकडे धाव घेत आहे आणि लवकरच ग्रहमालांपर्यंत त्याच्या वसतीची मजल जाईल अशी चिन्हेही दिसत आहेत. जगातील एकुणातील संपत्तीची वाढही अत्यंत वेगाने होत असून नवनवीन तंत्रज्ञानांच्या शोधांमुळे मानसाचे जीवन जेवढे बदलेल तेवढ्याच वेगाने त्याच्या एकुणातील संपत्तीतही भर पडेल हेही उघड आहे. परंतू आपण आंतरिक उत्क्रांतीचे चित्र पाहिले तर आपल्याला माणसात काही गुणात्मक फरक पडल्याचे दिसून येणार नाही. उलट तंत्रज्ञानांमुळे मुठभर बुद्धीवंत अमाप जनतेला उथळ-बुद्धी बनवण्याच्या प्रयत्नांत असल्याचे आपल्याला दिसून येईल. म्हणजे हे हेतुपुरस्सर होते आहे असे नाही, पण एकुणातील परिणाम मात्र तसाच आहे. याला कोणी बौद्धिक भांडवलशाही म्हणू शकेल. पण साधनसंपत्तीचे फेरवाटप करा, आर्थिक भांडवलशहा नष्ट करा असे साम्यवादी जसे ओरडू शकतात तसे बौद्धिक फेरवाटप करा असे ते म्हणू शकत नाहीत. साधनसंपत्ती ही वस्तुरुप असते की बुद्धीरुप याचा निर्णय बव्हंशी माणसं करू शकत नाहीत यातच मानवी बुद्धीचा पराभव आहे की काय याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतू बौद्धिक भांडवलशाहीही अस्तित्वात आहे व तीच आजच्या जगाचे एकतर्फी नियंत्रण करते आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. 

म्हणजेच, आमची सामाजिक उत्क्रांती ही बव्हंशी बाह्य आहे. बाह्य घटकांना भला-बुरा प्रतिसाद देण्याइतपतच आमचे अंतरंग बदलले आहे. पण मुलभूत बुद्धीचे काय, तिच्या उत्क्रांतीचे काय आणि या उत्क्रांतीशिवाय आम्ही आमचे सामाजिक जीवन कसे बदलणार याचा विचार आम्ही क्वचितच करत असतो. त्यामुळेच आमचे भविष्यही अनिश्चित बनून जाते व येणा-या प्रत्येक लाटेवर स्वार व्हायची सवय लागते ती यामुळेच. आम्हाला काय उपयुक्त आहे आणि काय नाही हे ठरवण्यासाठी बाह्य फोर्सेस लागतात. मग त्या अगदी दैनंदिन जगण्याच्या वस्तू असोत की आमचे राजकीय-सामाजिक विचार. आम्ही त्या परिघातच आमचे विचारविश्व मर्यादित करतो (किंवा बाह्य फोर्स ते मर्यादित करतात.) आणि या मर्यादितपणाला आम्ही उत्क्रांती म्हणू शकत नाही. गेल्या शतकाच्या आरंभापासून माणुस बदलेल अशी जी तत्वज्ञांना आशा होती ती सर्वच जागतिक समुदायाने खोटी ठरवली आहे ती यामुळेच!

किंबहुना अत्यंत अभिनव तत्वज्ञान, विज्ञान किंवा आर्थिक वा राजकीय विचारांचे सृजन आम्ही करू शकलेलो नाहीत. जे काही झाले आहे ते फार पुर्वीच झाले आहे. आता आम्ही त्याच विचारांना नवी थिगळं लावत वा अनेक विचारांचे मिश्रण करत नव्याचा आव आणत सिद्धांत मांडत आहोत. जगात एकरुपता हवी. जागतिक मानव एक राष्ट्रीयत्वाच्या छत्रछायेखाली यावा हे खरे, पण विचारधारांच्या अप्रगल्भ बजबजपुरीमुळे व त्यांच्यातील सत्ताकारणांच्या संघर्षामुळे आहे तेच समाज व राष्ट्रे आज वैचारिक दृष्ट्या विचित्र विभाजली गेलेली आहेत. हा अर्धवट संघर्ष एवढ्या विकोपाला गेला आहे की आपल्याला नेमके काय हवे आहे, भविष्यातील जग आम्हाला नेमके कसे घडवायचे आहे याचा विचारही लूप्त झालेला दिसतो कारण आमचा सार्वत्रिक बौद्धिक -हास झालेला आहे. आज आम्ही वापरतो ती पोटभरू बुद्धी आहे. कोणाचे कौशल्य यात अधिक तर कोणाचे कमी एवढाच काय तो फरक आहे. परंतू मानवी संस्कृतीच्या विकासाचे बाह्य साधनसंपत्ती हे एकमात्र लक्षण नाही याचे भान आम्ही हरपून बसायला लागलो आहोत. यातच आमची सामाजिक उत्क्रांती की अधोगती हे आम्हालाच शोधायचे आहे.

भारतियांसमोरील आव्हाने अधिक बिकट आहेत. आजचे जग हे विषमतेने ग्रस्त आहे. ही विषमता नुसती आर्थिक नाही तर बौद्धिकही आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीला निसर्गानेच स्वतंत्र अशा बौद्धिक प्रेरणा दिलेल्या असतात. परंतू आमच्या बाह्य जगाची संरचनाच अशी आहे की ती नैसर्गिक बुद्धीमत्तेला नष्ट करत नेत एका कृत्रीमतेच्या चक्रव्यूहात अडकावते. या कृत्रीमतेचा सोस एवढा आहे की तीच आम्हाला नैसर्गिक प्रेरणा वाटू लागते. आणि या कृत्रीमतेच्या अनैसर्गिक सोसात बुद्धीमत्तेचेही मापदंड बदलत जात त्यात विषमता निर्माण होत जाणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. अशा स्थितीत रास्त सामाजिक व्यवस्थेचा जन्म होण्यासाठी, त्यासाठी उचित राजकीय व आर्थिक व्यवस्था असण्यासाठी जी उत्क्रांती अभिप्रेत आहे ती होणे कसे शक्य आहे?

आम्हा भारतियांसमोर आजच्या व्यवस्थेत अनंत आव्हाने आहेत. ते जातीपातींपासून सुरू होत आर्थिक विषमतेशी येऊन ठेपतात. आमची लोकशाही ही जनांची लोकशाही नसून सरंजामदारांची लोकशाही आहे. पण ती बदलावी व खरी लोकशाही आणावी असे लोकांनाच वाटत नाही. जात हे अनेकांना उन्नतीचे साधन वाटते तर काहींना विपन्नावस्थेचे कारण वाटते. उन्नती हा मानवी स्वातंत्र्याशी निगडित असूनही आम्हीच अनेक पारतंत्र्ये स्वत:हून ओढवली आहेत, आणि गंमत म्हणजे ती पारतंत्र्ये आहेत हेच आम्हाला मान्य नाही. आमचे धार्मिक संघर्ष तर कोणत्याही धर्माने लाजेने खाली मान घालावेत असे बनले आहेत. विचारवंतांनी हा गतीरोध नष्ट करत समाजाला मूक्त प्रवाह बनवण्यासाठी प्रेरणा द्यायची तर तेही या संघर्षांची व्याप्ती वाढवण्यात हातभार लावत आहेत. दुसरी गंमत म्हणजे आम्हा भारतियांना मुळात अर्थविचारच नाही. सैद्धांतिक प्रेरणाच नाहीत. आमची उत्क्रांती दहाव्या शतकात जी थांबली ती आजही त्या थांब्यापाशी अडखळलेली आहे. बौद्धिक क्रांतीच्या चर्चा होण्याऐवजी विद्रोही तरुण साधन-संपत्तीच्या फेरवाटपाबाबत अधिक चर्चा करतात. बाकीचे आहे त्या भ्रष्ट व्यवस्थेचे फायदे कसे उचलता येतील या स्पर्धेत पडतात. ज्यांना जमत नाही ते आपल्या नशिबाला दोष देत जगण्याच्या स्पर्धेत हाती येईल ते मिळवत कसेबसे जगतात. आमची व्यवस्था ही नवयुगातील नवनवे वंचित निर्माण करत एकमेकांना शोषणाचे नवे मार्ग वापरते. अशा स्थितीत आम्ही जगाशी स्पर्धा करू शकत नाही. नव्या जगाच्या निर्मितीचे नेतृत्व करू शकत नाही. आजची बौद्धिक भांडवलशाहीही आमच्या आकलनात नाही त्यामुळे तसे भांडवलदार निर्माण करायची क्षमताही आमच्यात नाही. 

आणि या सर्वांचे मूळ कारण म्हणजे आम्ही आमच्या मानसिकतेला आव्हान देत नवे न्याय्य राष्ट्र घडवण्याच्या प्रेरणा देणारे नवे विचारवैभव निर्माण केले नाही. तसा प्रयत्नही होत नाही. मागे चर्चा केल्याप्रमाणे या सर्व अध:पाताची सुरुवात आमच्या शिक्षणव्यवस्थेपासून सुरु होते आणि भ्रष्ट समाजात विलीन होते. मग आमची नीतिमुल्येही भ्रष्टच राहणार हे वेगळे सांगायची गरज नाही. आमच्याच पुर्वसुरीच्या उसण्या तत्वज्ञानांना बासणात बांधत जोवर आम्ही नवतत्वज्ञान बनवत बौद्धिक क्रांतीचे, म्हणजेच मनुष्यक्रांतीचे ध्येय प्रामाणिकपणे जोपासत नाही तोवर आमच्या अवस्थेत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. सामाजिक उत्क्रांती झाली तर यातुनच साध्य होईल! अन्यथा जो काही बौद्धिक -हास झालाच आहे तो आम्हाला नित्यनेमाने रसातळाला नेत राहील एवढेच! मानवी स्वातंत्र्यच नैसर्गिक प्रज्ञेचे/बौद्धिकतेचे स्फोट घडवू शकते आणि आपल्याला तेच आधी मिळवावे लागेल. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.  आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा प्राचीन संस्कृत्यांचे अवशेष आज कष्टाने शोधावे लागतात तसेच आमच्याही आजच्या संस्कृतीचे होईल!