Thursday, August 24, 2017

इतिहास गणेशाचा...

Image result for ancient ganesh idols

भारतात गणेशाची आराधना फार पुरातन आहे. त्याची पूजा आधी यक्ष स्वरूपात होत होती. बुद्धीचा संरक्षक असे त्याचे मूळ स्वरूप होते. अर्थात त्यात आरंभापासून अनेक बदल घडत आले असून गणराज असंख्य वळणे घेत आजच्या स्वरुपात आपल्यासमोर आहेत. प्रत्येक संस्कृतीत जे समाज-वैचारिक बदल घडत जातात त्याचे प्रतिबिंब त्यांच्या देवतास्वरुपात पडणे स्वाभाविक आहे. गणपतीची निर्मिती ही तर राजकीय व आध्यात्मिक संस्कृतीच्या मिश्रणातून झाली आहे असे इतिहासावरून दिसते.

 

भारतात अगदी प्राचीन काळात अनेक प्रदेशांत गणराज्य व्यवस्था होती हे सर्वांना माहितच आहे. ही गणराज्ये लोकशाही पद्धतीने चालत. सर्वच नागरिक आपापल्या राज्याचे निर्णय एकत्र घेत. या गणराज्याच्या प्रमुखाला "गणपती" अशी संज्ञा होती. या गणपतीचा अधिकार मोठा असला तरी त्याची पूजा वगैरे मात्र होत असण्याचे काही कारण नव्हते. पण गणांचा अधिपती तो गणपती ही धारणा मात्र कायम राहिली.

 

गणपती सुरुवातीच्या काळात गजमुख नव्हता. गणपती हे स्वतंत्र दैवत जरी बनू लागले असले तरी त्याचे रुप हे यक्ष संस्कृतीतून आलेले होते. तुंदिलतनू पण सोंड नसलेला गणेश हे त्याचे आद्य रुप होय. हा दैवत्स्वरुप गणपती व्रात्य या हरियाना-पंजाबमधील समाजांत पुजला जात होता. गंगेच्या खो-यातही त्याचे यक्षस्वरुपच पुजले जात होते. पण सिंधू संस्कृतीत शेंदूर लावलेल्या गजमुखाचा मुखवटा हडप्पा येथे मिळालेला आहे. तेथील लोक नृत्य करतांना हे गजमूख मुखवटे परिधान करत असावेत असे तज्ञ म्हणतात. तत्कालीन भारतात असंख्य टोळ्या रहात होत्या व प्रत्येक टोळीचे स्वत:चे असे देवक व टोळीचिन्ह अथवा गणचिन्ह असे. हे चिन्ह त्यांना इतरांपासून आपले वेगळे अस्तित्व दाखवायला कामी येत असे व तेच त्यांचे देवक व आराध्य बनत असे. ही देवके विविध प्राणी, पक्षी ते वृक्षही असत. आजही भारतातील अनेकविध हिंदू जातीसमाजांनी ही देवक प्रथा जपलेली आहे. हरप्पा येथील लोक हत्ती हे देवक व गणचिन्ह वापरत असण्याची शक्यता आहे. असे अनेक समाज असू शकतील ज्यांचे हत्ती हे देवक असेल. पुढे विविध टोळ्यांत राज्य विस्तारामुळे सम्मीलन झाल्याने मुख्य दैवतात अन्य टोळ्यांची गणचिन्हेही सामावली गेली. गजमूख, नागबंधन व मुषक वाहन ही चिन्हे गणपतीला याच सम्मीलनाच्या प्रक्रियेतून मिळाली.

गणपती ही वैदिक देवता नाही. गणपती ही मूळची वैदिकेतर एतद्देशिय लोकधर्मातून (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) आलेली देवता आहे याबाबत सर्व विद्वानांत एकमत आहे व ते सिंधू संस्कृतीत पुरा-गणेशाचे भौतिक अस्तित्व सापडले असल्याने यथायोग्यही आहे. काही वेदपुर्व हिंदू गण (मानवसमूह) हत्ती हे आपले देवक मानत असत. टोळी नृत्य, युद्ध ते धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसंगी गजमुख असलेले मुखवटे घालण्याची चाल त्यांच्यात होती. गजमुखाची शिल्पेही देवकप्रथेतून निर्माण झाली. या गजमुखाला पुरातन काळी नरबळी दिला जात असल्याचे पुरावेही आपल्याला मिळतात पुढे ती प्रथा पशुबळीत बदलली आणि मनुष्य जसा पुढे आला तसे बळीप्रकरण थांबले व रक्तवर्णी शेंदुराने गणेशमुर्ती माखली जावू लागली. “पूजा” हा मूळचा प्राकृत शब्द आहे जो वैदिक भाषेत आढळून येत नाही. मूर्ती अथवा प्रतिमापूजाकांड नंतर भारतात आलेल्या वैदिक धर्मात नव्हते. 'पूजा' या शब्दाचा अर्थ आहे 'माखणे/शिंपणे.. म्हणजे मूर्तीला रक्त/तेल माखून अथवा जल शिंपून जी केली जात होती ती 'पूजा'. हरप्पा येथील सापडलेल्या गणेशमुखाकडे बारकाईने पाहिले तर शिरोभूषणावरील शेंदुराचे अस्पष्ट अवशेष पाहता येतात. सिंधुकाळी गणेशाचे शिरोभूषण तत्कालीन प्रचलित शिरोभूषणाप्रमाणेच होते. तशी शिरोभूषणे अनेक प्रतिमांवर आढळून येतात.

 

गज, नाग, मूषकादि देवके असणारे भिन्न गण जसजसे सम्मिलीत होऊ लागले तसतशी ती देवकेही एकाच गणेशात सामावली गेली. म्हणजे नागबंधाच्या रूपात नाग गण, मूषकवाहनाच्या रूपात मूषक गण असे ते सम्मिलन कालौघात झाले, असे इतिहासावरून दिसते.

 

गणेश आणि शिव मूळचे एकच असाही विद्वानांत एक मतप्रवाह आहे. शिव जसा त्रिनेत्र व भालचंद्र आहे तसाच गणेशही आहे. शिवही गणांचा अधिपती आहे तसाच गणपतीही आहे. गणेशाला गजमुख आहे तर शिव गजचर्म नेसतो. शिवाच्या तशा असंख्य प्रतिमा कुशाणकालीन नाण्यांवर मिळतात. किंबहुना काही समुदायांनी शिवालाच गजमुखाच्या स्वरुपातही पाहिले असावे. पुढे कालौघात गणपती ही स्वतंत्र पण शिवपुत्र असलेली देवता म्हणून जनमानसात स्थिर झाली. गणेशाच्या उत्पत्तीच्या पौराणिक भाकडकथा वगळल्या तरी त्याला अयोनिज का मानले जाते, हे यावरून लक्षात यावे.

 

पुरातन काळापासून वैदिक यज्ञधर्मी व हिंदू मूर्तीपूजकांतधार्मिक संघर्ष होता याचे अनेक पुरावे आपल्याला धर्मेतिहासातच पहायला मिळतात. व्रात्य समाज हरियाणात रहात होता. तो तपाला आणि ज्ञानाला महत्व देत होता. गणेशाचे एक नांव 'व्रातपती' असे आहे, हे गणपत्यथर्वशीर्षातून दिसते. व्रत करत ते व्रात्य. हिंदू लोक यज्ञविरोधक होते. हरियाना-पंजाब भागातील व्रात्य यज्ञात व्यत्यय आणत असत. त्यामुळेच की काय, यज्ञ सुरू करण्याआधी विघ्नकर्त्या विनायकाची शांती करणारे मंत्र म्हटले जात व त्याला 'विघ्न न आणता दूर मुंजवत पर्वतावर निघून जा' अशी आवाहने केलेली आढळतात. म्हणजेच वैदिकजनांसाठी गणेश हा प्रारंभी 'विघ्नकर्ता' होता तर हिंदूंसाठी तो 'विघ्नहर्ता' होता असे आपल्याला दिसते. वैदिक साहित्यामध्ये कार्यारंभी अथवा ग्रंथांच्या आरंभी गणेशवंदना दिसत नाही ती यामुळेच. महाभारताची सुरुवातही नारायण-सरस्वती या दैवतांना वंदन करून होते, गणेशाला नाही, हेही येथे लक्षणीय आहे. किंबहुना चारही वेदात हिंदुंना पवित्र असलेला ओंकार येत नाही तसेच योगही येत नाही.

 

तिस-या शतकाच्या आसपास लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नगरांमध्ये कोणत्या देवतांचे मंदिरे असावीत याची यादीच आहे, पण त्यात गणपतीचे नाव नाही. याचा अर्थ गणपती तोवर यक्षश्रेणीतीलच देवता मानली जात होती. गाथा सप्तशतीनुसार गणेशाचे स्थान गावाबाहेर एखाद्या झाडाखाली उघड्यावरच असे. ती पद्धत तिस-या शतकापयंत चालू राहिल्याचे दिसते.

 

गुप्तकाळात मात्र सांस्कृतिक उलथापालथ सुरु झाली. गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला व त्यामुळे त्या धर्माचे वर्चस्व वाढणे स्वाभाविक होते. धर्मप्रचाराची ही संधी पाहून त्यांनी संमिश्रणाची सुरुवात केली. त्यांनी गणपतीला त्याची लोकप्रियता पाहून विघ्नकर्ता नव्हे तर विघ्नहर्ता या रूपात नंतर स्वीकारले, असे महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी प्रतिपादित केले आहे. वैदिक ब्रह्मणस्पति आणि गणपती यांचे तादात्म्य साधण्याचे प्रयत्न झाले असले तरी गणेशाची मूळ अवैदिक रूपे मात्र पुसणे जमले नाही. गणपती अथर्वशीर्ष जरी अथर्ववेदाचा भाग मानण्याची प्रथा असली तरी ते वास्तव नाही. अथर्ववेदात गणपती आढळत नाही. अथर्वशीर्षातील 'गणानां त्वा गणपतिं हवामहे' हे मूळचे ऋग्वेदातील (ऋ. २.२३.१) आवाहन असून ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे, आपण पुजतो त्या गणपतीला नाही. परंतु शब्दसाधर्म्याचा उपयोग येथे करून गणेशाचे वैदिकीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसतो. अर्थात तसाच प्रकार रुद्र या वैदिक देवतेच्या व वेदपूर्व शिवाच्या बाबतीतही करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवाला शक्ती अथवा पार्वती ही पत्नी आहे, वैदिक रुद्राला मात्र नाही. शिवाला पिता नाही, तो अजन्मा मानला जातो पण रुद्राला पिता तर आहेच पण किमान ११ रुद्र असल्याची नोंद वैदिक साहित्यात मिळते.

भारतीय वेदपुर्व हिंदू धर्म हा आगमिक, म्हणजेच तंत्राधारित असल्याने गुढ सांकेतिकता हा त्याचा भाग होता. गुप्त काळात वैदिक धर्माविरुद्ध उठलेल्या प्रतिक्रियेतून आगमिक धर्माने वैदिक स्वरुप दिले जात असलेल्या गणेशाला मुळ तंत्रस्वरुपात वेगवेगळ्या पद्धतीने आणण्याचा हिरीरीने प्रयत्न केला. त्याला तंत्रगणेश काळ असेही म्हणतात व शिव-शक्तीप्रमाणेच गणेशही एक महत्त्वाची तांत्रिक देवता बनला. किंबहुना गणपतीला मिळालेली अनेक नावे ही तंत्रधर्माने दिलेली आहेत. 'शारदातिलक' ग्रंथात गणपतीच्या ४४० ध्यानमूर्ती वर्णिल्या असून त्यांची वेगवेगळी नावे आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच्या सर्व अष्टविनायकाची स्थाने महाराष्ट्रात आहेत. येथूनच ही देवता संपूर्ण देशात व देशाबाहेर पसरली असावी, असा तर्क करायला वाव आहे. भारतात गणपतीची स्वयंभू तशीच लोकप्रसिद्ध स्थाने हजारोंनी आहेत. गणपती म्यानमार, सयाम, कंबोडिया, बाली, तुर्कस्थान व चीनमध्येही तो आढळतो. हा प्रसार आगमीक हिंदुंमुळे झाला अशी मान्यता आहे. काही वाममार्गी तांत्रिकांमुळे गणेशाचीही तशा पद्धतीने काही लोक पुजा करत असत पण लोकांना ती न आवडल्याने वाममार्गी पूजा बंद झाली. चीनमध्ये तर सम्राट चेन्त्सुंगने आज्ञापत्र काढून गणपतीची वाममार्गी तांत्रिक पूजापद्धत बंद पाडली असा दाखला आपल्याला मिळतो.

नवव्या शतकात (किंवा सहाव्या) आदि शंकराचार्यांनी पंचायतन पुजेत गणपतीला स्थान दिले. धर्मांतरित वैदिकासाठी स्मार्त संप्रदायाची स्थापना करून शंकराचार्यांनी धर्मांतरित वैदिकांना मूर्तीपूजेचा त्यांचा परंपरागत हिंदू मार्गही सुरु ठेवण्याची सोय केली. य्त्यामुळे वैदिकांत श्रौत व स्मार्त हे दोन विभाग बनले. श्रौत वैदिक आजही मूर्तीपूजा करत नाहीत हे येथे लक्षणीय आहे.

 

तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेशाला वंदन करून झाली. म्हणजे, तेथवर गणपती देशातील सर्वच मानवी समुदायांचा अधिपती बनल्याचे दिसते. अथर्वशीर्षाची रचना याच दरम्यान कधीतरी केली गेली.

 

मात्र भारतात गणेशाचे एवढे महत्वाचे स्थान असतांनाही गणपती बसवण्याची प्रथा मात्र नव्हती. किंबहुना ही देवता यक्ष श्रेणीतून आली असल्याने ती रक्षक श्रेणीतील देवता होती म्हणून तिचे स्थान गावाबाहेर असायचे. हत्ती हा बुद्धीशाली प्राणी मानला जात असल्याने गणेश बुद्धीचीही देवता बनला. हालाच्या गाथा सप्तशतीनुसार गणेशाचे स्थान हे सीमेवर एखाद्या वृक्षाखाली असे. घरातही त्याचे स्थान होते पण त्याची पूजा ही व्यक्तिगत स्वरुपाची होती.

 

गणपती बसवण्याची व विसर्जन करण्याची प्रथा अर्वाचीन असून ती पेशवाईच्या आगेमागे चालू झाली असे विद्वान मानतात. ही प्रथा कोकणातून घाटावर आली ती पेशव्यांमुळे अथवा कोकणी लोकांमुळे, असे विद्वत्मत आहे. तोवर गणपतीचे स्थान ग्रामदेवता ते गृहदेवता असे स्थायी स्वरूपाचे होते. गणपती बसवण्याची व विसर्जन करण्याची पद्धत वैदिक किंवा हिंदू धर्मग्रंथांत मिळून येत नाही, म्हणजेच ही तशी धार्मिक प्रथा नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

 

गणपती बसवणे हे आपण समजू शकतो, पण मग विसर्जन का हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. पण यामागे गणपतीच्या मूळच्या 'विघ्नकर्ता' या आता धूसर झालेल्या वैदिक दृष्टीकोनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा स्थापना आणि विसर्जनाचा कार्यकारणभाव लागत नाही. म्हणजे विघ्नकर्ता म्हनूनच गणपती बसवून, त्याची पुजा करून त्याने विघ्न आणू नये म्हणून यथासांग पुजा करुन नंतर विसर्जित करण्याची प्रथा विनायकाला आवाहन करुन, विघ्ने आणू नयेत म्हणून हवि देत मुंजवत पर्वतावर निघून जा या विनवण्या आणि गणपतीचे विसर्जन यात मुळचा अस्पष्ट धागा असावा असे मानायला पुष्कळ वाव आहे. शिवाय ही प्रथा वैदिकजनांनीच सुरु केली त्यामुळे विसर्जन प्रथेचा उगम गणेशाबद्दल वैदिकांच्या असलेल्या “विघ्नकर्ता” या समजुतीत दडले असावे असे दिसते. अन्य समाज गणपती बसवत नव्हते. नंतर मात्र ही प्रथाही सर्वांत पसरल्याचे आपण आज पहातो.

 

पेशव्यांच्या काळात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्याचे स्वरूप धार्मिक असून, त्यात मुख्यत: कथा-कीर्तनादी कार्यक्रम केले जात. सवाई माधवरावांच्या वेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात खूपच भव्य स्वरूपात होऊ लागला. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई. पेशव्यांप्रमाणेच पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार, इत्यादी सरदार घराण्यांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्यात कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर, गायन वगैरे कार्यक्रम होत. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई.

 

भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर व नानासाहेब खाजगीवाले यांनी पुण्यात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला १८९३ सालच्या हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी होती. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक मिरवणुकीतून विसर्जन करण्याची प्रथाही त्याच वर्षी सुरु झाली. लो. टिळकांना ही कल्पना आवडली व त्यांनी 'केसरी'त अग्रलेख लिहून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यामुळे १८९४ मध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना होवू लागली. स्वत: टिळकांनीही विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला. अशा रितीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यामुळे जरी सार्वजनिक गणपती सर्वप्रथम बसवण्याचा मान रंगारींचा असला तरी त्याला व्यापक स्वरुप मिळाले ते टिळकांमुळे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय हिंदुंना मुस्लिमांविरुद्ध एकवटणे हा त्याचा मुख्य हेतू होता...राष्ट्रीय नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे.

 

सिंधु काळात विनायक गणांचा अधिपती म्हणून पूजला जाणारा गणपती कालौघात विविध रुपे धारण करत गेला. हिंदुंचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. तंत्र गणेशामुळे तर तो जगभर पसरला. आज मात्र गणेशोत्सवाने जे रूप धारण केले आहे ते मात्र वेदनाकारक आहे. खरे तर गणेशाला आता पुन्हा त्याच्या मुळच्या स्वरुपात नेत घर आणि मंदिर यातच त्याची स्थायी स्थापना हवी. आज आपण सार्वजनिक गणपती स्थापन करत ज्या उथळ पद्धतीने उत्सव (?) साजरा करतो व गणेशाचा अवमानच करतो हे थांबवायला हवे. खरे म्हणजे या प्रथेचेच विसर्जन करण्याची आज गरज आहे.

 

-संजय सोनवणी 

6 comments:

  1. बौद्ध काळ बद्दल काही ही लिहलं नाही? ही आश्चर्य ची बाब आहे.

    ReplyDelete
  2. भुलेश्वर मंदिरात " Female" गणपती ची मूर्ती आढळून येते, त्या बद्दल काही माहिती उपलब्ध आहे का ?

    ReplyDelete
  3. *ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑तिं हवामहे क॒विं क॑वी॒नामु॑प॒मश्र॑वस्तमम् ।*
    * ज्ये॒ष्ठ॒राजं॒ ब्रह्म॑णां ब्रह्मणस्पत॒ आ नः॑ शृ॒ण्वन्नू॒तिभिः॑ सीद॒ साद॑नम् ॥*
    *या सूक्ताची/सूक्तातील ॠचेची देवता ब्रह्मणस्पति आहे.*
    *हे ब्रह्मणस्पति देव आाप गणोंके गणपति तथा कवियोंमें श्रेष्ठ कवि हैं।*

    *आप अनुपमेय् श्रेष्ठ तथा तेजस्वी मंत्रों के स्वामी हैं ।*

    *अत: हम आपका आवाहन करते हैं।*

    *हमारी प्रार्थना को स्वीकार कर रक्षण साधनों सहित हमें संरक्षण प्रदान करें।*

    वरील ठिकाणी गण या शब्दाचा अर्थ नेमका काय ?
    गणपति -- गणांचा स्वामी , गणांचा अधिपति. गणांच्या अधीन ज्या शक्ति आहेत त्या शक्तिंचा स्वामी
    कवीतील श्रेष्ठ कवि म्हणजेच " गण " या शब्दाचा काव्याशी संबंध आहे. काव्यात ८ गण दिलेले आहेत. --
    ( मात्राओं और वर्णों की संख्या और क्रम की सुविधा के लिये तीन वर्णों के समूह को एक गण मान लिया जाता है। गणों की संख्या ८ है - १- यगणः (।ऽऽ),२- मगणः (ऽऽऽ), ३- तगणः (ऽऽ।), ४- रगणः (ऽ।ऽ), ५- जगणः (।ऽ।), ६- भगणः (ऽ।।), ७- नगणः (।।।) ८- सगणः (।।ऽ)
    गणों को आसानी से याद करने के लिए एक सूत्र बना लिया गया है- *"यमाताराजभानसलगा।"*
    अष्ट गण अष्ट वसु है। )

    म्हणजेच या ८ गणांच्या अधीन ज्या शक्ति आहेत त्या शक्तिंचा ईश्वर म्हणजे गणेश गणपति.

    { याशिवाय पुढील माहिती तंत्रशास्त्रातील ग्रंथात मिळते ---
    महाविद्या वाणीयोंमें व्याप्त होने के कारण वाड़्गमयी कहलाती हैं। ( वाणी:-- परा पश्यन्ति मध्यमा वैखरी )
    *वाणीमय यही विद्या वर्ग गणों की स्वामिनी अर्थात गणेश का स्वरुप धारण करलेती है।*
    शक्ति बीज प्रथम गण:-- १६ स्वरकामराज बीज द्वितीय गण:-- क पासू न त पर्यंत १६ अक्षर
    वाग्भव बीज तीतृय गण:-- थ पासून स पर्यंत १६ अक्षर }

    अर्थातच -- आप अनुपमेय् श्रेष्ठ तथा तेजस्वी मंत्रों के स्वामी हैं । ( तेजस्वी मंत्राधीन शक्तिचे स्वामी आहात )

    *अत: हम आपका आवाहन करते हैं।*

    अशा मंत्राधीन शक्तिच्या स्वामीचे आम्ही आवाहन करतो. अर्थातच या गणपति शक्तिचे आवाहन करुनच आम्ही छंदोबद्ध मंत्र म्हणतो. म्हणूनच सर्वप्रथम या शक्तिला मानसन्मान म्हणून सर्वप्रथम या शक्तिची म्हणजेच गणपति गणेशाची पूजा केली जाते, स्मरण केले जाते.

    टीप:--- गणेश गणपति विषयी अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती वाचली पण वेदातील या एका ऋचेच्या सुयोग्य अर्थानेच गणेश गणपति याचा अर्थ समजू शकलो. )
    डॅा. विजय व्यं. कुडतरकर. ९७६७५३४६६८

    ReplyDelete
  4. नक्कीच ...पटतो लेख...
    पन ठीकठीकाणी आपण जो उल्लेख केलेला आहे की 'इतीहासात आढळुन येते' याचा संदर्भ देणार्या /पुराणग्रंथांचीस्तकांची अनुसुची संदर्भसुची खाली दिली असती तर बर झालं असतं

    ReplyDelete
  5. अभ्यास कमी दिसतोय ,आणि विशिष्ट नजरेतून पाहिलं जातंय सगळं गणपतीचं धार्मिक ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून तुम्हाला ते नाकारता येत नाही ही तुमच दुखणे आहे

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...