Tuesday, October 10, 2017

म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करावी?


प्रत्येकाला भविष्याची काळजी असते. मुलांचे शिक्षण, आकस्मिक आजारपण, वृद्धापकाळासाठीची तरतूद इत्यादि असंख्य कारणे माणसाला बचत आणि गुंतवणूक करायला प्रेरित करत असतात. आपल्या बचतीवर व गुंतवणूकीवर काय परतावा मिळेल आणि महत्वाचे म्हणजे गुंतवणूक सुरक्षीत राहिल ना ही काळजी प्रत्येक व्यक्ती करत असते. खरे म्हणजे कधीपासून गुंतवणूक सुरु करावी याचे काही निकष नाहीत. म्हणजे ती कधीही करता येते. ती एकाच वेळीस एकरकमी जशी करता येते तशी दैनंदिन, मासिक अथवा जसजसे अतिरिक्त पैसे हातात येत जातील तसतशीही करता येते. हव्या त्या क्षेत्रात करता येते. पारंपारिक गुंतवणुकीच्या मार्गांपेक्षा म्युच्युअल फंड तुम्हाला असंख्य पर्याय देते. थोडक्यात छोट्यात छोट्या गुंतवणुकदारापासून ते मोठ्या गुंतवणुकदारांना बरोबरीचे पर्याय यात उपलब्ध आहेत. अर्थात जनसामान्यांपर्यंत याची जेवढी माहिती पोहोचायला हवी तेवढी पोहोचलेली नाही.

तुम्हाला अगदी कमी पैशांची गुंतवणूक करायची आहे? ते शक्य आहे. पैसे गरज लागली तर लगेच परत मिळायला हवेत? तेही शक्य आहे. तुम्हाला एकरकमी गुंतवणूक न करता हप्त्याने वा टप्प्या-टप्प्यात करायची आहे? तेही शक्य आहे. तुम्हाला करबचत करायची आहे? तेही शक्य आहे. तुम्हाला दरवर्षी लाभांश हवा आहे? तेही शक्य आहे. तुम्हाला कर्जबाजारात (Debt Market) गुंतवणुक करायची आहे? तेही शक्य आहे. खरे म्हणजे जेवढीही क्षेत्रे आहेत त्यात हाताशी फार मोठी रक्कम नसतांनाही तुम्ही त्यांत गुंतवणूक करू शकता. आपल्या सवडीने ती करू शकता आणि हवे तेंव्हा ती विकून बाहेरही पडू शकता.

नुकतेच जे नोकरी किंवा व्यवसायात पडले आहेत त्यांनी आतापासून शिस्तबद्ध गुंतवणूक करायला हवी. सरस परतावा मिळवायचा तर म्युच्युअल फंडाला आज पर्याय नाही. म्हणजे तुम्हीच बघा, गेल्या काही वर्षांत बँकांचे ठेवीवरील व्याजदर कमी होत आहेत व भविष्यातही ते अजून कमी होत जाणार. महागाईचा दर आणि व्याजदर यात तुलना केली तर महागाईदरातील वाढीचे पारडे भारी पडेल अशी आज स्थिती आहे. सोन्याचे दर आता एका पातळीवर येवून थांबल्यासारखे झाले आहेत. स्थावर मालमत्तेतील जोखिम किचकट होत चाललेल्या कायद्यांमुळे वाढतच चालली आहे. व्यक्तीगत पातळीवरील शेयर्समधील गुंतवनूकीत जो शास्त्रशुद्ध अभ्यास लागतो आणि तेवढे भांडवलही लागते. शिवाय वेळही द्यावा लागतो कारण कोणत्या शेयरमधे नेमके काय होईल याचे आगाऊ भाकीत जमतेच असे नाही. म्युच्युअल फंड मात्र तुमच्या वतीने तज्ञ भांडवल व्यवस्थापन करत असल्याने या सर्व कटकटींपासून तुम्ही अलिप्त तर राहता आणि लाभ मिळवू शकता.

भारतीय म्युच्युअल फंड आजमितीला  २० लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवस्थापन यशस्वीपणे करत आहेत. भारताच्या आर्थिक विकासाचा दर पाहता यात दिवसेंदिवस भरच पडत आहे.  खरे तर भारतासारख्या विकासोन्मूख देशातील म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आज आहे त्यापेक्षा अनेक पटींनी व्हायला हवी होती. पण सर्वसामान्य भारतियांपर्यंत मुळात गुंतवणुकींचा हा आधुनिक पर्याय न गेल्याने व्हायला हवी होती तशी वाढ झाली नाही. 

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतांना कोणता सर्वप्रथम आपल्याला खालील बाबींवर निर्णय घ्यायला पाहिजे.

१. किती रक्कम गुंतवायची आहे?

२. की ती टप्प्याटप्प्याने वा मासिक पद्धतीने पण नियमित गुंतवायची?

३. आपल्याला लाभांश हवा आहे कि एकुण वाढीचाच लाभ घ्यायचा आहे?

४. किती काळासाठी आपल्याला ही गुंतवणुक करायची आहे? 


या व तदनुषंगिक प्रश्नांचा विचार करून आपण स्वत: अथवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ शकता. आता अनेक बँकांतील व्यवस्थापकही ही मदत आपल्याला करू शकतात. ते आपल्याला आपल्या गरजेशी जुळणारे म्युच्युअल फंड सुचवू शकतात. त्या म्युच्युअल फंडाने मागील काळात काय परतावा दिला आहे याचा इतिहासही तुम्ही जसे पाहू शकता तसेच त्या फंडाचे व्यवस्थापक कोण आहेत याची माहितीही घेऊ शकता. गुंतवणूक करण्याआधी तत्संबधीचे सारे कागदपत्र काळजीपुर्वक वाचा अथवा समजावून घ्या. मगच गुंतवणूक करा. आपल्या फंडाचे रोजचे मूल्य काय आहे हे तुम्हाला सहज कळू शकते. रिलायंस म्युच्युअल फंडाने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी व म्युच्युअल फंडाबाबत जनजागृतीसाठी देशव्यापी मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्याकडुनही तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या


(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...