Sunday, October 8, 2017

म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय?


 म्युच्युअल फंड म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे अधिक फायद्यासाठी केलेली सामुहिक गुंतवणूक. ही गुंतवणूक तज्ञ माहितगारांमार्फत केली जाते. गुंतवणुकीबाबतचा एरवी व्यक्तीवर येणारा ताण यामुळे नाहीसा होतो. छोट्या छोट्या व्यक्तीगत गुंतवणुकदाराला एरवी जे शक्य नसते ते म्युच्युअल फंडाद्वारे साधले जाते.

आपण येथे एक उदाहरण घेऊ. समजा जमीनीचा एक तुकडा विकत घ्यायचा आहे व त्याला भविष्यात चांगली किंमत येणार आहे हे माहित आहे पण त्यासाठी लागणारे पैसे मात्र एखाद्या व्यक्तीकडे नाहीत. अशा वेळीस काय करायचे? संधी सोडून द्यायची की अनेकांनी एकत्र येत सामुहिक गुंतवणूक करत नफा मिळवायचा? तर समजा काही मित्र एकत्र येतात आणि सामुहिक गुंतवणूक करत सर्वांनी मिळून नफा मिळवायचा असे ठरवतात.

समजा शंभर चौरस फुट जमीनीच्या तुकड्याची किंमत एक लाख रुपये आहे. यासाठी निर्माण केलेल्या फंडाला प्रत्येक युनिटला १० रुपयात वाटले तर १०,००० युनिट बनतील. गुंतवणूकदार व्यक्ती आपल्याला गुंतवता येतील तेवढ्या रकमेचे युनिट विकत घेईल. एखाद्याजवळ हजारच रुपये असतील तर तो शंभर युनिट विकत घेईल. गुंतवणूक क्षमतेनुसार हवे तेवढे युनिट व्यक्ती घेवू शकतील. त्या गुंतवणूकीच्या प्रमाणात त्या जमीनीची मालकी गुंतवणूकदाराकडे असेल.

आता समजा एक लाख रुपये गुंतवणूकीच्या जमीनीची किंमत एक महिन्यानंतर १,२०,००० रुपये झाली तर त्याचा अर्थ असा की गुंतवनूकदाराच्या एका युनिटची किंमत १२ रुपये झाली. ज्या गुंतवणुकदाराने हजार रुपये गुंतवलेत त्याची गुंतवणूक आता १२०० रुपये मुल्याची झालेली असेल.

म्युच्युअल फंडात नेमके असेच होत असते. म्युच्युअल फंडांच्या अनेकविध गुंतवणूक योजना असतात. प्रत्येक योजनेची गुंतवणूक युनिटच्याच प्रमाणात होत असते. गुंतवणुकीत जसजशी वृद्धी होते ती प्रत्येक युनिटधारकास युनिटच्या समप्रमाणात वाटली जात असते. म्हणजेच ज्याच्या जवळ व्यक्तीगत गुंतवणूक मोठी नाही तोही अगदी किमान आवश्यक युनिट विकत घेऊन म्युच्युअल फंडात गुंतवणूकदार बनू शकतो. बाजाराची कसलीही माहिती, त्यातील तज्ञता नसली तरी चालत असून रोजच्या रोज देखरेख करण्याच्या कटकटीही यातून वाचत असतात.

म्युच्युअल फंडाद्वारे पारंपारिक व आधुनिक असे गुंतवणूकीचे सर्व प्रकार आपणास उपलब्ध होतात. त्यात साधारणपणे शेयर बाजार, कर्जरोखे, सोने, इतर वस्तूविनिमय (कमोडिटी मार्केट),
बांधकाम उद्योगातील गुंतवणूक इत्यादि प्रकार येतात. सर्वच फंड एकाच क्षेत्रात अथवा एकाच कंपनीच्या शेयर्स अथवा कर्जरोख्यांत गुंतवणूक करत नसून विविध क्षेत्रातील गुंतवणूकींचा पोर्टफोलियो बनवतात. हा पोर्टफोलियो काय आहे याची आगावू कल्पना गुंतवणूकदारास दिलेली असते. म्युच्युअल फंड कंपन्या बाजाराचा कल पाहून गुंतवणूक वाढवतात अथवा एकातून काढून घेत पोर्टफोलियोतीलच दुस-या क्षेत्रात गुंतवतात. त्यामुळे कोणत्याही बाजारातील होत असलेल्या आकस्मिक उतारांचा तोटा व्यक्तिगत गुंतवणुकीच्या मानाने एवढा गुंतवणूकदाराला सहन करावा लागत नाही. आपल्या आवडीचा, संभाव्य लाभाचा व जोखिमीचा सारासार विचार करून गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या नेमक्या कोणत्या योजनेत पैसे गुंतवायचे याचा निर्णय घेऊ शकतो. खरे तर म्युच्युअल फंड जेवढी गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये व्यापकता उपलब्ध करुन देतात तसे अन्यत्र होत नाही. त्यादृष्टीनेही म्युच्युअल फंड हा सर्व गुंतवणूक पर्यायांवर मात करतो.

आपण गुंतवलेल्या युनिटचे आजचे बाजारमूल्य म्हणजे NAV (एकुण संपत्तीचे मूल्य). यावरून गुंतवणुकदाराला आज आपण आपले युनिट विकले तर काय मूल्य मिळेल याचा अंदाज येत असतो किंवा आपल्या संपत्तीत गुंतवणूक केल्या दिवसापासून तीत काय भर पडली हे समजत असते. थोडक्यात नाव (NAV) म्हणजे आपल्या गुंतवणुकीच्या वृद्धीचा आरसा असतो.

थोडक्यात म्युच्युअल फंड म्हणजे आपल्या योग्य वाटलेल्या क्षेत्रात केलेली सामुहिक गुंतवणूक. म्युच्युअल फंड कंपनी म्हणजे आपल्या गुंतवणूकीचे तज्ञ व्यवस्थापन करणारी संस्था. या संस्था सेबी या भांडवल नियामक संस्थेच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. सामान्य गुंतवणुकदाराच्या हितसंबधांची रक्षा करण्यासाठीच सेबी आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड हा अन्य कोणत्याही क्षेत्रातील गुंतवणूकीपेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडात कशी गुंतवणूक करता येते, त्यातही काय पर्याय उपलब्ध आहेत याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या


(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...